"सॉरी पप्पा, 'त्या' मुलीनं माझ्या भावनांचा खेळ केला..."; २६ वर्षीय युवकानं केला आयुष्याचा शेवट
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 12:49 IST2025-12-02T12:48:41+5:302025-12-02T12:49:12+5:30
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांना तातडीने बोलवण्यात आले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत पोस्टमोर्टमला पाठवला.

"सॉरी पप्पा, 'त्या' मुलीनं माझ्या भावनांचा खेळ केला..."; २६ वर्षीय युवकानं केला आयुष्याचा शेवट
सतना - "सॉरी पप्पा...त्या मुलीने माझ्या भावनांशी खेळ केला, त्यामुळे मला दुसरा काहीच विचार येत नाहीये.." हे अखेरचे शब्द आहेत एका २६ वर्षीय युवकाचे, ज्याने आत्महत्येपूर्वी एक पानी सुसाईड नोट लिहिली आहे. सतना जिल्ह्यातील ट्रान्सपोर्ट नगरमध्ये फायनान्स कंपनीतील मॅनेजर शिवमोहन सिंहने सोमवारी ऑफिसच्या चेंबरमध्ये गळफास घेत आत्महत्या केली. या मृतकाजवळ एक भावूक सुसाईड नोट सापडली ज्यात त्याने एका मुलीला आत्महत्येसाठी जबाबदार असल्याचं म्हटलं आहे. त्याशिवाय मृत्यूनंतर अवयव दान करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
मध्य प्रदेशातील रिवा जिल्ह्यातील सतना येथे शिवमोहन सिंह कंपनीत काम करत होता. सुसाईड नोटमध्ये त्याने लिहिलंय की, पप्पा, मी तुमचा चांगला मुलगा बनू शकलो नाही. एकटेपणा दूर करण्यासाठी मी दारू पिणे सुरू केले होते. मी माझ्या मर्जीने आत्महत्या करत आहे. परंतु या जगात ज्याच्यावर भरवसा ठेवला, त्यांनी विश्वासघात केला. माझ्या मृत्यूसाठी ती मुलगी जबाबदार आहे, जी माझ्या भावनांशी खेळली असं त्याने सांगितले आहे.
तसेच शिवमोहनने वडिलांना आवाहन करत पत्नीचे दुसरे लग्न लावण्याची विनंती केल. त्याशिवाय गोलूची स्कूटी सोडवून आणा, मी ती गहाण ठेवली होती. माझ्या मृत्यूनंतर माझे अवयव दान करा, जे इतरांच्या कामाला येतील असंही शिवमोहनने सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे. शिवमोहन सोमवारी दुपारी २ वाजता चेंबरमध्ये गेला होता आणि आतून दरवाजा बंद केला. संध्याकाळी ७ वाजता जेव्हा कुठलीही हालचाल झाली नाही, त्याचा फोनही बंद येत होता तेव्हा सहकर्मचाऱ्यांनी चिंता व्यक्त केली. तिथे जवळच राहणारा शिवमोहनच्या मामाला बोलवण्यात आले. जेव्हा चेंबरचा दरवाजा उघडला तेव्हा शिवमोहनचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत सापडला.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांना तातडीने बोलवण्यात आले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत पोस्टमोर्टमला पाठवला. शिवमोहनच्या सुसाईड नोटमध्ये ज्या मुलीचा उल्लेख करण्यात आला आहे तिचा तपास सुरू आहे. पोलीस अन्य अँगलनेही या घटनेचा शोध घेत आहेत.