9people cheated by saying that they get land of Mhada | म्हाडाचा भूखंड देतो असे सांगून ९ जणांची फसवणूक
म्हाडाचा भूखंड देतो असे सांगून ९ जणांची फसवणूक

नालासोपारा : विरार पश्चिमेकडील परिसरात म्हाडाचा भूखंड मिळवून देतो, असे सांगून बनावट कागदपत्रे तयार करून तब्बल नऊ लोकांना फसवणाऱ्या प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक महेश भोईर याच्यावर अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याविरुद्ध दाखल झालेला हा दुसरा फसवणुकीचा गुन्हा आहे.


महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरण अर्थात म्हाडा या प्राधिकरणाने १३ मार्च २००४ मध्ये ‘घर, दुकान, भूखंड वाजवी दरात मिळण्याची उत्कृष्ट संधी’ अशी जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्यात विरार बोळींज येथील सर्व्हे क्रमांक ३९२ मधील भूखंड क्र मांक ०७, क्षेत्र १०२६ चौरस मीटर या क्षेत्रफळाच्या भूखंडाचा समावेश होता. ही जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर महेश यशवंत भोईर याने त्याच्या ओळखीच्या विरारमधील काही व्यक्तींशी संपर्क साधून त्यांना म्हाडाची वरील योजना समजावून सांगितली. आपण सर्वजण मिळून एक सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन करू आणि सदरचा भूखंड मिळावा, यासाठी म्हाडाकडे अर्ज करू असा आग्रह त्यांच्याकडे धरला.


नियोजित सहकारी गृहनिर्माण सोसायटीचा महेश भोईर हा स्वत: प्रमुख प्रवर्तक होता. हा भूखंड मिळावा, यासाठी स्वत:बरोबर इतर नऊ जणांच्या नावाने त्याने म्हाडाकडे अर्ज केला होता. या नऊ व्यक्तींकडून त्याने काही ठरावीक रक्कम जमा करून ती रक्कम कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ यांच्या नावाने जमा केली होती. या सोडतीमध्ये सदरचा भूखंड महेश भोईर आणि इतर ९ सभासद यांना मिळाल्याचे म्हाडाने जाहीर केले होते.
त्यानंतर महेश भोईर याने सर्व सभासदांच्या नावाने नियोजित यशवंत कृपा सहकारी गृहनिर्माण सोसायटीच्या सभासदत्वाचा राजीनामा तयार करून त्यावर सर्व नऊ सभासदांच्या खोट्या सह्या करून सदरचा बोगस आणि बनावट दस्तऐवज खरा आहे, असे भासवून तो म्हाडाच्या बांद्रा येथील कार्यालयांमध्ये जमा केला. उर्वरित नऊ सभासदांचे सभासदत्व रद्द करून त्यांची तसेच म्हाडा या सरकारी यंत्रणेची फसवणूक केली. नंतर विरार बोळींज यशवंत कृपा सहकारी गृहनिर्माण संस्था या नावाने नवीन संस्था स्थापन करून २६ जणांची एक नवीन समिती स्थापन केली. मात्र, यावेळी जुन्या समितीच्या सभासदांकडून घेतलेल्या रकमांचा कोणताही हिशोब न देता ही रक्कम हडप केली. जुन्या सभासदांनी म्हाडाच्या भूखंडाबद्दल त्यांच्याकडे विचारणा केली असता त्यानी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने संशय आल्यावर माहिती अधिकारामध्ये माहिती घेतली असता आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले.


म्हाडाचा भूखंड देतो म्हणून ९ लोकांची फसवणूक केल्याप्रकरणी महेश भोईरवर ८ आॅक्टोबरला गुन्हा दाखल केला आहे. याबाबत म्हाडाकडून पेपर मागवले आहेत पण ते अद्याप आलेले नाही. नेमके किती जणांना फसवले याचा तपास सुरू आहे.
- आप्पासाहेब लेंगरे,
वरिष्ठ पोलीस निरीक्षक,
अर्नाळा सागरी पोलीस ठाणे

Web Title: 9people cheated by saying that they get land of Mhada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.