अपहृत मुलीच्या लैंगिक शोषणप्रकरणी ९ जणांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2020 06:46 AM2020-03-16T06:46:13+5:302020-03-16T06:46:29+5:30

ठाणे ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणी पाच आरोपींना अटक केली असून, त्यापैकी चार आरोपींना सोमवारी न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.

9 persons charged for sexual exploitation of abducted girl | अपहृत मुलीच्या लैंगिक शोषणप्रकरणी ९ जणांवर गुन्हा

अपहृत मुलीच्या लैंगिक शोषणप्रकरणी ९ जणांवर गुन्हा

Next

ठाणे: अपहृत अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणात मुलीच्या पालकांसह आजी, आत्या अशा नऊ जणांविरोधात न्यायालयाच्या आदेशानुसार मीरा रोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ठाणे ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणी पाच आरोपींना अटक केली असून, त्यापैकी चार आरोपींना सोमवारी न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. उर्वरित चौघांचा शोध सुरू असून, त्यातील तिघांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयाकडे अर्ज केला आहे. या प्रकरणाचा तपास अतिरिक्त पोलीस अधीक्षक करत आहेत.
पीडित मुलगी ही १६ वर्षे नऊ महिन्यांची असताना मीरा रोड परिसरातील आत्याच्या घरातून १ आॅगस्ट, २०१९ रोजी अचानक बेपत्ता झाली होती. त्या वेळी तिच्या आत्याने मीरा रोड पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार अपहरणाचा गुन्हा दाखल झाला. जवळपास तीन महिन्यांनंतर वसईतील ३७ वर्षीय इसम तिला घेऊन पोलीस ठाण्यात दाखल झाला. त्या वेळी पोलिसांनी मुलीच्या आईवडिलांना बोलावून मुलीची वैद्यकीय तपासणी करून गुन्हा दाखल करायचा का, अशी विचारणा केली; परंतु तिच्या पालकांनी तक्रार करण्यास नकार दिला. त्यामुळे पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदवून मुलीला त्यांच्या ताब्यात दिले.
दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयात दाखल झालेल्या एका याचिकेत पीडित मुलगी ही आपली पत्नी असल्याचा दावा तिला पोलीस ठाण्यात दाखल करणाऱ्या इसमाने केला. त्या वेळी याचिकेसोबत मतदार ओळखपत्र, आधार कार्ड आणि विवाह प्रमाणपत्रही जोडले. मात्र, एकूणच प्रकरणाविषयी न्यायालयाला शंका आल्याने न्यायालयाने पीडित मुलीला न्यायालयात हजर करण्याचे आदेश दिले. ती न्यायालयात आल्यावर तिच्या आईवडिलांची चौकशी, तसेच डीएनए चाचणी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
चौकशीदरम्यान पीडित मुलीला तिचे आईवडील, आत्या आणि आजीने अनैतिक व्यवसाय करण्यास भाग पाडून तो पैसा स्वत:साठी वापरल्याचे उघड झाले. त्यानुसार, अपहरणाची तक्रार करणारी आत्या यात आरोपी असून, मुलीला पळवून नेणाºया इसमानेही तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी मीरा रोड पोलीस ठाण्यात नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. त्यापैकी पाच जणांना अटक करण्यात आली असून, चार आरोपी पोलीस कोठडीत, तर एक जण न्यायालयीन कोठडीत आहे. पीडित मुलीच्या पतीसह दोन आत्या व एक महिला असे चौघे फरार आहेत. चौघांना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

२० मार्चला अटकपूर्व जामिनावर सुनावणी
फरार असलेल्या तिघांनी ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. त्यावर २० मार्च रोजी सुनावणी होणार आहे. या गंभीर गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षकांनी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते. त्यानुसार, या गुन्ह्याचा तपास अतिरिक्त पोलीस अधीक्षक करत असल्याची माहिती सरकारी वकील संजय मोरे यांनी दिली.

Web Title: 9 persons charged for sexual exploitation of abducted girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.