सैराट झालं जी... साडेतीन वर्षांत १५४ मुलींचे पलायन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 10:25 AM2021-07-29T10:25:27+5:302021-07-29T10:26:09+5:30

Crime News : ९० टक्के मुलींना पोलिसांनी शोधून काढले आणि त्यांचे समुपदेशन करून त्यांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले.

154 girls escape in three and a half years | सैराट झालं जी... साडेतीन वर्षांत १५४ मुलींचे पलायन

सैराट झालं जी... साडेतीन वर्षांत १५४ मुलींचे पलायन

Next

- सचिन राऊत

अकाेला : कोरोनाच्या रूपातील महामारीने सर्वत्र थैमान घातले असताना आणि लॉकडाऊनमुळे दळणवळणाची साधने उपलब्ध नसतानादेखील अल्पवयीन मुलींचे घरून पळून जाण्याचे प्रकार वाढले आहेत. अकाेला जिल्ह्यात गेल्या दीड वर्षांत ४९ मुली घरून पळून गेल्या. साडेतीन वर्षांत मुली पळून जाण्याचा आकडा १५४ एवढा आहे. पोलिसांच्या तक्रारीच्या रूपाने हा आकडा रेकॉर्डवर आला असला, तरी त्याच्या कितीतरी पट जास्त मुली पळून गेल्याचे अनेक जण मान्य करतात. यात चांगली बाब अशी की, पळून गेलेल्या ९० टक्के मुलींना पोलिसांनी शोधून काढले आणि त्यांचे समुपदेशन करून त्यांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले.

किशोरवयात आल्यानंतर मुला-मुलींना नैसर्गिक भिन्न आकर्षण असते. एक प्रकारची ती वेगळी धुंद असते. यामुळे काय बरे, काय वाईट, याबाबत फारसा विचार करण्याची किंवा निर्णय घेण्याची योग्य ती क्षमता मुलींमध्ये नसते. केवळ शारीरिक आकर्षणातून त्या पळून जातात. पळवून नेणाराही परिपक्व नसतोच. तोही तिला शारीरिक आकर्षणातूनच पळवून नेतो. मुली पळून जाण्यासाठी घरची परिस्थिती, आजूबाजूचे वातावरण, मैत्रिणींचा झगमगाट, शानशाैक अन्‌ वेगवेगळे आकर्षणही कारणीभूत असते. एकदाचे आकर्षण संपले की अनेकजणी नंतर स्वत:हून घरीही परततात; मात्र यामुळे त्यांच्या पालकांना होणारा मानसिक त्रास, सामाजिक टीकेला नाहक सामोरे जावे लागते. एका चुकीमुळे तिचे भविष्यही अंधकारमय होते.

 

मुली पळून गेल्याच्या घटना

२०१८ - ४९ मुली, पोलिसांनी शोधल्या ३९, स्वत:हून परतल्या ७

२०१९ - ५६ मुली, पोलिसांनी शोधल्या ४४, स्वत:हून परतल्या ११

२०२० - ३२ मुली, पोलिसांनी शोधल्या २४, स्वत:हून परतल्या ६

२०२१ - (जून अखेरपर्यंत) १७ मुली, पोलिसांनी शोधल्या ११, स्वत:हून परतल्या ५

 

१) स्वत:चे आयुष्य उद्‌ध्वस्त केले

वयाच्या १५ व्या वर्षीच तिने आई-वडिलांचे घर सोडले. ती मित्र-मैत्रिणींसोबत राहू लागली. मित्र-मैत्रिणी व्यसनी. त्यामुळे तिलाही व्यसन जडले. प्रारंभी छोट्यामोठ्या चोऱ्या करून ती स्वत:चे शाैक पूर्ण करू लागली. त्यातून ती चांगली निर्ढावली. मोठा हात मारावा अन् नंतर अय्याशीचे जीवन जगावे, असे तिला वाटत होते. त्यामुळे तिने घरातच चाेरी केली.

 

वडिलांच्या वयाच्या व्यक्तीसोबत पळाली

२) ती फक्त १६ वर्षांची. बाजूला एक ४० वर्षीय व्यक्ती राहायला आला. त्याची पत्नी त्याच्या घरून पळून गेली. त्याने हिच्यावर जाळे फेकले अन् पळून गेली. ती त्याच्यासोबत बाहेरगावी जाऊन पत्नीसारखी राहू लागली. तिच्या पालकांनी तक्रार दिली. ती अल्पवयीन असल्याने पोलिसांनी तिला आणि त्याला पकडून आणले. योग्य समुपदेशनानंतर आता तिला तिची चूक कळली आहे.

 

ज्याच्यासाठी आप्तांना सोडले, त्यानेच जगणे नकोसे केले

३) कुटुंबाचा विरोध पत्करून ती आपले गाव, आपला प्रांत सोडून पळून गेली़. ज्याच्यावर तिने विश्वास टाकला तो प्रियकरच तिच्यावर आता अविश्वास दाखवू लागला. चारित्र्यावर संशय घेऊन तिला नेहमी मारहाण करू लागला. घरी परतण्याची तिच्यात हिम्मत नव्हती अन् ज्याला नवरा म्हणून स्वीकारला त्याच्याकडून होणारा छळ असह्य होत होता. तो जगू देत नव्हता. त्यामुळे तिने आत्महत्या केली.

 

पालकांनो, मित्र व्हा!

मुला-मुलींचे चुकीचे पाऊल पडू नये म्हणून पालकांनी किशोरवयापासूनच मुला-मुलींचे मित्र होऊन वागण्याची गरज आहे. फाजील लाड पुरवायचे नाहीत. त्यांना नकार ऐकण्याची सवय लावणे खूप आवश्यक आहे. त्यांना खूप मोकळीक देणे योग्य नाही. मात्र, प्रत्येक बाबतीत टोकणेही योग्य नाही. काय चांगले, काय वाईट हे समजून सांगितल्यास मुले, खास करून मुली सहज ऐकतील.

Web Title: 154 girls escape in three and a half years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.