२०११ च्या विश्वचषक स्पर्धेतील विश्वविजेते नंतर एकत्र खेळू शकले नाहीत

2011 World Cup : मुंबईतील वानखेडे स्टेडियम... उपस्थित विशाल जनसागर... फडकणारे तिरंगे... विजयानंतर देशभर साजरी झालेली दिवाळी... दहा वर्षांपूर्वी दोन एप्रिल २०११ ला भारताने श्रीलंकेचा सहा गडी राखून पराभव करीत विश्वचषकावर २८ वर्षांनंतर पुन्हा एकदा नाव कोरले...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2021 05:16 AM2021-04-03T05:16:21+5:302021-04-03T05:17:42+5:30

whatsapp join usJoin us
The world champions could not play together later | २०११ च्या विश्वचषक स्पर्धेतील विश्वविजेते नंतर एकत्र खेळू शकले नाहीत

२०११ च्या विश्वचषक स्पर्धेतील विश्वविजेते नंतर एकत्र खेळू शकले नाहीत

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : मुंबईतील वानखेडे स्टेडियम... उपस्थित विशाल जनसागर... फडकणारे तिरंगे... विजयानंतर देशभर साजरी झालेली दिवाळी... दहा वर्षांपूर्वी दोन एप्रिल २०११ ला भारताने श्रीलंकेचा सहा गडी राखून पराभव करीत विश्वचषकावर २८ वर्षांनंतर पुन्हा एकदा नाव कोरले... धोनीच्या विजयी षटकारानंतर सुरू झालेला जल्लोष देशवासीयांनी साजरा केला. त्या घटनेला आज दहा वर्षे पूर्ण झाली. विश्वविजेत्या संघातील ११ खेळाडू पुन्हा कधीही एकत्र खेळू शकले नाहीत, ही सर्वांत वाईट गोष्ट म्हणावी लागेल.

फायनलमध्ये ९७ धावांची विजयी खेळी करणारा माजी सलामीवीर गौतम गंभीर याने या स्मृतींना शुक्रवारी उजाळा दिला. विश्वविजेत्या अंतिम संघात खेळलेले सर्व जण पुन्हा एकत्र खेळू शकले नाही, ही जागतिक क्रिकेटमधील अपवादात्मक घटना ठरावी. झहीर खान, मुनाफ पटेल, एस. श्रीसंत, हरभजन सिंग, युवराज सिंग यांनी अप्रतिम मारा करीत श्रीलंकेला ३०० च्या आत रोखले. यानंतर सेहवाग आणि सचिन लवकर बाद झाल्यानंतर गंभीरने विराट कोहलीच्या सोबतीने किल्ला लढविला. 

महेंद्रिसंह धोनी आणि युवराज सिंग यांनी विजयावर कळस चढविला. दुर्दैवाने त्या संघातील खेळाडू कधीही देशासाठी एकत्र खेळू शकले नाहीत, ही सर्वांत वाईट गोष्ट म्हणावी लागेल,’ असे मत गंभीरने व्यक्त केले. ‘यासंदर्भात भज्जी मला एकदा म्हणाला होता, हे आपले दुर्दैव आहे, विश्वचषक जिंकताच कोच गॅरी कर्स्टन यांनी पद सोडले. त्यांची जागा नंतर डंकन फ्लेचर यांनी घेतली. 

कर्णधार धोनी आणि तत्कालीन निवडकर्ते कृष्णम्माचारी श्रीकांत यांना याबाबत विचारणा केली पाहिजे. ते या गोष्टीचे योग्य उत्तर देतील. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये याआधी असे कधी घडले असेल, असे मला तरी वाटत नाही. ज्या संघाने विश्वचषक जिंकून दिला तो पुन्हा कधी एत्र खेळू नये, याचे वाईट वाटते,’ असे गंभीरने म्हटले आहे. 

दोनदा झाली नाणेफेक
सामना सुरू होण्याआधी मॅच रेफ्री जेफ क्रो यांनी धोनी आणि संगकारा यांना नाणेफेकीसाठी आमंत्रित केले. रेफ्रीने नाणे हवेत उंचावले. दोन्ही कर्णधारांना आपण नाणेफेक जिंकल्याचा भास झाला. त्याचवेळी क्रो यांनी आपण संगकाराचा आवाज ऐकलाच नाही, असे सांगून पुन्हा एकदा नाणेफेक केली. यावेळी संगकाराने नाणेफेक जिंकली. 

धोनीची ‘ती’ बॅट  सर्वांत महागडी
धोनीने अंतिम सामन्यात ज्या बॅटने फटकेबाजी केली ती क्रिकेट इतिहासात सर्वांत महागडी बॅट ठरली. ही बॅट मुंबईतील आर. के. ग्लोबल या फर्मने लंडनमध्ये लिलावात ७२ लाखांत खरेदी केली. ही रक्कम धोनीची पत्नी साक्षी धोनी हिच्या चॅरिटी फाऊंडेशनला सोपविण्यात आली होती. 

त्या एका षटकाराने विश्वचषक जिंकला नाही
‘विश्वविजयाचे १४ हीरो होते. त्यांची नावे पुढे आली नाहीत. मुनाफ पटेल, मी स्वत:, हरभजनसिंग, पहिल्या सामन्यातील शतकवीर विराट कोहली, पाकविरुद्ध महत्त्वपूर्ण धावा काढणारा सुरेश रैना या सर्व खेळाडूंचे योगदान मोठे होते. आज दहा वर्षांनंतर मी हे पाहतो जेव्हा मालिकावीर पुरस्कार मिळविल्यानंतरदेखील युवराजचे नाव मागे पडले. लोक त्याच्याबद्दल बोलत नाहीत. लोक फक्त त्या ‘एका’ षटकाराबद्दल बोलतात.’    - गौतम गंभीर 

धोनीचा तो निर्णय साहसी - उपटन 
वन डे विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात कर्णधार महेंद्रसिंह धोनीने युवराजसिंग याच्याआधी खेळायला येण्याचा घेतलेला निर्णय अत्यंत साहसी होता, असे २०११ च्या विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचे कंडिशनिंग कोच पॅडी उपटन यांनी म्हटले आहे. ‘युवराज फॉर्ममध्ये असताना पडझड थोपविण्यासाठी धोनी पाचव्या स्थानावर फलंदाजीला आला. त्याआधी धोनी फारशा धावा काढू शकला नव्हता. कोच गॅरी कर्स्टन यांनीदेखील धोनीच्या निर्णयास तात्काळ मान्यता दिली. धोनीने नाबाद ९१ धावा ठोकून विजय खेचून आणला. हा शानदार निर्णय होता,’असे उपटन यांनी सांगितले. विजयाची योजना आम्ही तीन वर्षे आधीपासून सुरू केली होती. आम्ही शारीरिक, मानसिक आणि रणनीतीच्या दृष्टीने बऱ्याच नवीन गोष्टी अंमलात आणल्या.  

थोडेफार योगदान दिल्याचा आनंद - युवी
भारताच्या या विश्वविजेतेपदाचा शिल्पकार ठरलेल्या युवराज सिंगने एक व्हिडिओ अपलोड करून सर्व देशवासीयांचे आभार मानतानाच हा क्षण सर्व खेळाडूंच्या आयुष्यातील सर्वोत्तम असल्याचे म्हटले. ‘या विश्वविजेतेपदासाठी मीही थोडेफार योगदान देऊ शकलो याचा आनंद आहे,’ असेही युवीने म्हटले. 
भारताच्या २०११ सालच्या विश्वचषक स्पर्धेतील जर्सी परिधान करून युवीने म्हटले की, ‘विश्वचषक जिंकून दहा वर्षे झाली आहेत आणि हा कालावधी पटकन निघून गेला. संपूर्ण संघ हा विश्वचषक जिंकण्यास खूप उत्सुक होता, खासकरून सचिन तेंडुलकरसाठी. कारण हा विश्वचषक त्याच्या कारकिर्दीतील अखेरचा विश्वचषक होता. शिवाय भारतातच जिंकण्याची आमचीही इच्छा होती. कारण कोणत्याच देशाने मायदेशात अशी कामगिरी केली नव्हती.’
युवी पुढे म्हणाला, ‘तो क्षण शब्दांत व्यक्त करता येणार नाही. अनेकांनी वैयक्तिकरीत्या मोठे योगदान दिले. खासकरून महेंद्रसिंग धोनी व गौतम गंभीर यांनी अंतिम सामन्यात दिलेले योगदान निर्णायक ठरले. वीरेंद्र सेहवागने सचिनसोबत जबरदस्त सलामी दिली. या सर्व प्रवासात सचिनची साथ अत्यंत मोलाची आणि महत्त्वपूर्ण ठरली. झहीर खानने नेहमी मोक्याच्या वेळी बळी मिळवून दिले. मीही माझ्या परीने थोडेफार योगदान देण्यात यशस्वी ठरलो.’ 

Web Title: The world champions could not play together later

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.