विराट काढतोय एका चेंडूत दोन विकेट?; लोकेशला यष्टीमागे उभं करण्यामागे 'सिक्रेट गेम'

भारतीय संघानं प्रथमच पाच सामन्यांच्या ट्वेंटी-20 मालिकेत अविश्वसनीय कामगिरी केली. भारताच्या विजयात जेवढा वाटा गोलंदाजांचा आहे त्याहून अधिक 'भार' हा लोकेश राहुलनं आपल्या खांद्यावर उचलला.

By स्वदेश घाणेकर | Published: February 3, 2020 12:12 PM2020-02-03T12:12:57+5:302020-02-03T12:13:58+5:30

whatsapp join usJoin us
Virat kohli take two wickets in one ball ?; 'Secret game' behind to give keeping gloves to KL Rahul | विराट काढतोय एका चेंडूत दोन विकेट?; लोकेशला यष्टीमागे उभं करण्यामागे 'सिक्रेट गेम'

विराट काढतोय एका चेंडूत दोन विकेट?; लोकेशला यष्टीमागे उभं करण्यामागे 'सिक्रेट गेम'

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

न्यूझीलंडच्या खेळपट्टीवर भारतीय संघ निर्विवाद वर्चस्व गाजवेल अशी पुसटची कल्पनाही कोणी केली नसेल. न्यूझीलंडमधील टीम इंडियाचा इतिहास आणि फलंदाजांची उडालेली भंबेरी, हे त्यामागचं कारण. पण, विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडियानं केवळ पाच सामन्यांच्या मालिकेत निर्भेळ यशच मिळवले नाही, तर जगातल्या कोणत्याही खेळपट्टींवर आता टीम इंडियाचंच वर्चस्व असेल, याची गर्जनाच केली. या सामन्यात भारतानं सर्व आघाडींवरी सर्वोत्तम कामगिरी केली. या मालिकेत भारतीय गोलंदाजांनी दोन सामन्यांत न्यूझीलंडच्या तोंडाजवळ असलेला विजयाचा घास हिरावण्याचे कौशल्य दाखवले. त्याचे कौतुक करावे तितके कमी. पण, या मालिकेतून कर्णधार विराट कोहलीनं एका चेंडूंत दोन विकेट काढल्याची बाब, कोणाच्या लक्ष्यात आतापर्यंत नक्की आली नसेल. या मालिकेत आखलेले डावपेच किंवा व्यूहरचना कोहलीच्या इतक्या पथ्यावर पडत गेली की, त्याचा हा 'डाव' कुणालाच कळला नाही. सुंठी वाचून खोकला गेला, काय असतं हे कोहलीच्या डावपेचातून अधोरेखित होते. 

भारतीय संघानं प्रथमच पाच सामन्यांच्या ट्वेंटी-20 मालिकेत अविश्वसनीय कामगिरी केली. भारताच्या विजयात जेवढा वाटा गोलंदाजांचा आहे त्याहून अधिक 'भार' हा लोकेश राहुलनं आपल्या खांद्यावर उचलला. या मालिकेत लोकेश राहुल फलंदाज आणि यष्टिरक्षक अशा दुहेरी भूमिकेत होता. या दोन्ही भूमिका त्यानं चोख पार पाडल्या. या मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये लोकेश अव्वल स्थानी आहे. त्यानं 56 च्या सरासरीनं 2 अर्धशतकांसह 224 धावा चोपल्या. विशेष म्हणजे या मालिकेतून दोनशेहून अधिक धावा करणारा तो एकमेव फलंदाज आहे. टॉप फाईव्हमध्ये लोकेश आणि श्रेयस अय्यर ( 153) वगळता भारताचा तिसरा खेळाडू नाही. यष्टिंमागेही लोकेशनं तीन झेल घेतले आणि एक स्टम्पिंग केले. लोकेशच्या याच खेळीनं कर्णधार विराटचा 'सिक्रेट गेम' यशस्वी ठरला आणि एका चेंडूंत दोन विकेट काढण्याचा हेतू सफल झाला...

मुंबईतील सामन्यानं विराटला मिळाली आयडिया अन्...
न्यूझीलंड दौऱ्यावर येण्यापूर्वी भारतीय संघानं 2020 वर्षाच्या पहिल्याच ट्वेंटी-20 मालिकेत श्रीलंकेवर ( 2-0) विजय मिळवला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे मालिकेत भारताचाच बोलबाला राहिला. या मालिकेतील पहिल्याच सामन्यात भारताला पराभवाचा धक्का बसला. त्याच सामन्यात भारताला आणखी एक धक्का बसला आणि तो म्हणजे रिषभ पंतच्या दुखापतीचा... पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर दुखापतग्रस्त झालेला रिषभ क्षेत्ररक्षणासाठी मैदानावर आलाच नाही. या मालिकेत अतिरिक्त यष्टिरक्षक न निवडल्यामुळे ती जबाबदारी लोकेश राहुलच्या खांद्यावर आली.


येथून विराटच्या व्यूहरचनेला सुरुवात झाली. मुंबईत लोकेशच्या हातात यष्टिरक्षकाचे ग्लोज सोपवल्यानंतर विराटनं पुढील दोन्ही सामन्यांत तोच संघ कायम राखला. राजकोट आणि बंगळुरु वन डे सामन्यातही लोकेश यष्टिंमागे उभा राहिलेला दिसला. बॅक अप यष्टिरक्षक म्हणून के एस भारत याला संघात घेतले, पण विराटचा विश्वास हा लोकेशवरच होता. हीच ती वेळ... फॉर्मात नसलेल्या लोकेशकडे अतिरिक्त जबाबदारी सोपवून त्याच्यावर टीका करणाऱ्यांना थोडं शांत करण्याची. त्यात शिखर धवनची दुखापतही पथ्यावर पडणारा ठरला. 

न्यूझीलंड दौऱ्यातून गब्बरची माघार, संजू सॅमसनची पुन्हा एन्ट्री
टीम इंडिया किवींच्या देशात रवाना होण्यापूर्वी सलामीचा फलंदाज शिखर धवन दुखापतग्रस्त झाला आणि त्यानं दौऱ्यातून माघार घेतली. धवन गेल्या अनेक महिन्यांपासून दुखापतीशी संघर्ष करत आहे. त्यामुळे टीम इंडियाला सलामीला रोहित शर्मासोबत एक सक्षम पर्याय शोधणं भाग होतं. लोकेशच्या रुपानं तो पर्याय होता, परंतु धवनच्या पुनरागमनानं लोकेशला ती संधी मिळत नव्हती. पण, अखेरीस विराटला त्याच्या फलंदाजाला सलामीला खेळवण्याची संधी देता आली. लोकेशनंही मौके पे चौका मारून विराटचा विश्वास सार्थ ठरवला. लोकेश सलामीला आल्यानंतर रिषभ पंत यष्टिंमागे दिसेल असे वाटत होते, परंतु तसेही घडले नाही. विराटच्या फेव्हरिट लिस्टमध्ये असलेल्या रिषभला संपूर्ण मालिकेत बाकावर बसून रहावे लागले.

विराटचा एक चेंडू अन् दोन विकेट्स...
सलामीची संधी आणि यष्टिरक्षक अशा दुहेरी भूमिकेत लोकेश राहुलनं स्वतःला सिद्ध केलं. विराटचा हा विश्वास लोकेशनं सार्थ ठरवला. त्यामुळे आता शिखर धवनला टीम इंडियात कमबॅक करणे अवघड झाले आहे. महेंद्रसिंग धोनीला सक्षम पर्याय रिषभ पंतमध्ये शोधणाऱ्या विराटलाही त्याची चूक समजली. त्यामुळे निवड समितीच्या खांद्यावर बंदूक ठेवून त्यांनी रिषभला ताकिदच दिली. त्यात लोकेशचं यष्टिमागे यशस्वी होणं हे रिषभसाठी धोक्याचा इशारा आहे. संजू सॅमसनला अखेरच्या दोन सामन्यांत संधी दिली, पण त्याला अपयश आलं आणि हेही विराटच्या पथ्यावर पडलं आहे. रिषभच्या जागी संजूला संधी द्या, तो योग्य पर्याय आहे, अशी बोंब आता काही काळ तरी थांबेल. त्यामुळे या मालिकेन नीट विचार केल्यास लोकेशला यष्टिंमागे उभं करण्यामागे विराटचा 'सिक्रेट गेम' लक्षात येईल. 

Web Title: Virat kohli take two wickets in one ball ?; 'Secret game' behind to give keeping gloves to KL Rahul

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.