Virat Kohli posts a cheeky tweet for Shardul Thakur following surprising batting masterclass in Cuttack | तुला मानलं रे ठाकूर... विराट कोहलीकडून शार्दूलचे मराठीतून कौतुक
तुला मानलं रे ठाकूर... विराट कोहलीकडून शार्दूलचे मराठीतून कौतुक

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातला तिसरा व निर्णायक सामना चुरशीचा झाला. टीम इंडियाच्या तुलनेनं कागदावर कमकुवत दिसणाऱ्या वेस्ट इंडिज संघांन चांगली लढत दिली. कटक येथे झालेल्या तिसऱ्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजनं 5 बाद 315 धावा केल्या, प्रत्युत्तरात भारतानं 48.4 षटकांत 6 बाद 316 धावा करून विजय मिळवला. या विजयासह भारतानं मालिका 2-1 अशी खिशात घातली. या सामन्यात शार्दूल ठाकूरनं अनपेक्षित खेळी करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. त्याच्या 17 धावांच्या खेळीमुळे नॉन स्ट्राईकर रवींद्र जडेजावरील तणाव हलका केला आणि भारतानं सहज विजय मिळवला. कर्णधार विराट कोहलीनं सामन्यानंतर खास मराठीत ट्विट करून शार्दूलचे कौतुक केले.

या सामन्यात भारताच्या आघाडीच्या तीनही फलंदाजांनी दमदार खेळ केला. रोहित शर्मा ( 63), लोकेश राहुल ( 77) आणि कर्णधार विराट कोहली ( 85) यांच्या फटकेबाजीनंतर रवींद्र जडेजा ( 39*) आणि  शार्दूल ठाकूर ( 17*) यांच्या फिनिशर भूमिकेनं टीम इंडियाला विजय मिळवून दिला. तत्पूर्वी, विंडीजकडून निकोलस पूरण ( 89), कर्णधार किरॉन पोलार्ड ( 74*), शे होप ( 42), रोस्टन चेस ( 38), शिमरोन हेटमायर ( 37) यांनी दमदार फटकेबाजी केली. 

सामन्याच्या 47व्या षटकात विराट माघारी परतला. त्यानंतर टीम इंडियाच्या हातून सामना निसटतो की काय अशी भीती वाटत होती. पण, शार्दूल आणि जडेजा यांनी दमदार खेळ करताना संघाला विजय मिळवून दिला. शार्दूलनं 2 चौकार व 1 षटकार खेचून नाबाद 17 धावा करताना जडेजावरील भार हलका केला.  त्यामुळेच कोहलीनं ट्विट करून शार्दूलचे कौतुक केले. त्यानं लिहिलं की,''तुला मानलं रे ठाकूर...''  

टीम इंडियाचा 'दस का दम'; विंडीजला नमवून मोडला स्वतःचाच विक्रम

भारताचा वेस्ट इंडिजविरुद्ध सलग दहावा मालिका विजय ठरला.  वेस्ट इंडिजला 2007 पासून ते आतापर्यंत भारताविरुद्ध एकही वन डे मालिका जिंकता आलेली नाही. या विक्रमासह टीम इंडियानं एकाच प्रतिस्पर्धीविरुद्ध सर्वाधिक सलग मालिका विजयाचा विक्रम नावावर करताना स्वतःचाच विक्रम मोडला. यापूर्वी भारतानं 2005 पासून श्रीलंकेविरुद्ध सलग 9 वन डे मालिका जिंकल्या होत्या.

Web Title: Virat Kohli posts a cheeky tweet for Shardul Thakur following surprising batting masterclass in Cuttack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.