भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील डे नाइट कसोटी 22 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. कोलकाताच्या ऐतिहासिक इडन गार्डनवर हा सामना होणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष आणि माजी कर्णधार सौरव गांगुली यानं या कसोटीसाठी सर्व तयारी केली आहे. टीम इंडिया आणि बांगलादेशच्या खेळाडूंना गुलाबी चेंडूवर खेळण्याचा पुरेसा सराव मिळावा म्हणून संघांसाठी विशेष रात्रीचे सराव शिबीरही भरवण्यात आले आहे. विराट कोहली आणि अन्य खेळाडू या सामन्यासाठी कसून सराव करत असताना टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री उज्जैन येथील महाकालेश्वर मंदिरात होम हवन करताना पाहायला मिळाले.

भारतीय संघ प्रथमच डे नाइट कसोटी खेळणार आहे आणि या आव्हानाचा टीम इंडियानं यशस्वीपणे सामना करावा यासाठी शास्त्रींनी ही पूजा केल्याचं म्हटलं जात आहे. शास्त्रींचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शास्त्री यांच्यासह टीम इंडियाचे गोलंदाज प्रशिक्षक भारत अरूण हेही दिसत आहेत.   

दुसरा सामना कोलकात्यात, पण तरीही टीम इंडिया अजूनही इंदूरमध्येच
भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील दुसरा कसोटी सामना कोलकाताच्या इडन गार्डनवर होणार आहे. टीम इंडियानं इंदूर येथे झालेल्या पहिल्या सामन्यात एक डाव आणि 130 धावांनी विजय मिळवून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. भारतानं पहिली कसोटी अडीच दिवसातच खिशात घातली. दुसरा कसोटी सामना 22 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. तरीही भारतीय संघ इंदूरमध्येच आहे. 

कोलकाता येथे टीम इंडिया पहिल्यांदाच डे नाइट कसोटी ( दिवस रात्र) सामना खेळणार आहे. गुलाबी चेंडूचा सामना करण्यापूर्वी भारतीय संघांनं इंदूरमध्ये कसून सराव केला. इंदूर कसोटीचा निकाल लवकर लागल्यामुळे दोन्ही संघांकडे डे नाइट कसोटीसाठी सराव करण्यासाठी भरपूर वेळ मिळाला आहे. विराट कोहली आणि संघानं सोमवारी इंदूर येथे गुलाबी चेंडूवर कसून सराव केला. इंदूर येथे रात्रीचे सराव शिबीर आयोजित करण्यात आले होते. 


भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी सांगितले की,''आम्ही येथे गुलाबी चेंडूवर खेळण्याचा कसून सराव करत आहे. कोलकाता येथेही आम्ही विशेष सराव सत्राचे आयोजन केले आहे. पहिल्या कसोटीसाठी येथे दाखल झाल्यापासून आम्ही रात्रीच्या सत्रात गुलाबी चेंडूवर खेळण्याचा सराव करत आहोत.'' 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Video: Ravi Shastri offers prayers at Mahakaleshwar temple ahead of Day Night Test vs Bangladesh in Kolkata

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.