T1 World Cup Cricket: Indian Women's second consecutive win | टी२० विश्वचषक क्रिकेट : भारतीय महिलांचा सलग दुसरा विजय

टी२० विश्वचषक क्रिकेट : भारतीय महिलांचा सलग दुसरा विजय

पर्थ : भारतीय महिला क्रिकेट संघाने आयसीसी टी२० विश्वचषक स्पर्धेत सलग दुसरा विजय मिळवताना बांगलादेशचा १८ धावांनी पराभव केला. मात्र त्याचवेळी आघाडीच्या फलंदाजांचे अपयश कायम राहिल्याने या विजयानंतरही भारतीय संघावर चिंतेचे ढग कायम राहिले. चांगल्या सुरुवातीनंतरही भारताला २० षटकांत ६ बाद १४२ धावांची समाधानकारक मजल मारता आली. यानंतर पुन्हा एकदा गोलंदाजांनी केलेल्या टिच्चून माऱ्याच्या जोरावर भारताने बांगलादेशला २० षटकांत ८ बाद १२४ धावांवर रोखत बाजी मारली.

जगातील सर्वात वेगवान ओळखल्या जाणाºया खेळपट्टीवर धुमाकूळ घातला तो पूनम यादवच्या फिरकीने. वाका स्टेडियमवर नाणेफेक जिंकून बांगलादेश कर्णधार सलमा खातून हिने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. भारताच्या आक्रमक सुरुवातीनंतरही बांगलादेशच्या गोलंदाजांनी नियंत्रित मारा करत भारतीयांना मर्यादित धावसंख्येत रोखले. मात्र यानंतरही त्यांना विजय मिळवण्यात यश आले नाही. याआधी आशिया चषक स्पर्धेत भारताला नमविण्यात आलेल्या यशामुळे बांगलादेशकडून धक्कादायक निकालाची अपेक्षा होती आणि त्यांनी त्याप्रमाणे खेळही केला. मात्र भारतीयांनी मोक्याच्या वेळी खेळ उंचावताना दडपणाचा यशस्वीपणे सामना करत सामन्याचे चित्र पालटले.

पुन्हा एकदा पूनम यादव भारताच्या विजयात निर्णायक ठरली. याआधी सलामीच्या सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाचे कंबरडे मोडलेल्या पूनमने सलग दुसºया सामन्यात अचूक मारा करताना ४ षटकांत केवळ १८ धावा देत ३ बळी घेतले. यामुळे बांगलादेशवर कमालीचे दडपण आले. शिखा पांड्ये (२/१४) आणि अरुंधती रेड्डी (२/३३) यांनीही अचूक मारा करत बांगलादेशला दडपणाखाली ठेवले. शिखाने भेदक मारा करताना ४ षटकांत केवळ १४ धावा देत बांगलादेशच्या फलंदाजांना जखडून ठेवले. बांगलादेशकडून मुर्शिदा खातून (३०) आणि निगर सुल्ताना (३५) यांनी विजयाच्या आशा ठेवल्या होत्या. मात्र दुसºया टोकाकडून ठराविक अंतराने फलंदाज बाद होत राहिल्याने दोघींचीही झुंज अखेर अपयशी ठरली.

तत्पूर्वी, युवा सलामीवीर शेफाली वर्माच्या तडाखेबंद सुरुवातीनंतरही भारताला मोठी मजल मारता आली नाही. शेफालीने १७ चेंडूंत २ चौकार व ४ षटकारांसह ३९ धावांचा चोपल्या. त्याचवेळी, हुकमी सलामीवीर स्मृती मानधनाला हलकासा ताप आल्याने या सामन्यात तिच्या जागी युवा रिचा घोषला संधी मिळाली. तिने ही संधी साधताना १४ चेंडूंत २ चौकारांसह १४ धावा केल्या. शेफालीसह सलामीला आलेलीतानिया भाटीया (२) अपयशी ठरली. मुंबईकर युवा जेमिमा रॉड्रिग्जने मात्र भारताला सावरताना ३७ चेंडूंत २ चौकार व एका षटकारासह ३४ धावांची संयमी, परंतु भक्कम खेळी केली.

शेफाली-जेमिमा बाद झाल्यानंतर भारताला ठराविक अंतराने धक्के बसले. कर्णधार हरमनप्रीत कौर (८) पुन्हा अपयशी ठरल्याने भारताच्या चिंतेत भर पडली आहे. अखेरच्या षटकांमध्ये रिचासह वेदा कृष्णमूर्तीने (२०*) केलेल्या आक्रमकतेमुळे भारताला समाधानकारक मजल मारता आली.

शेफाली आणि रिचा ज्या प्रकारे खेळले ते शानदार होते. त्यांनी आपल्यातील क्षमता दाखवून दिली. याशिवाय वेदाची खेळी टर्निंग पॉइंट ठरली. ती ज्या वेळी खेळपट्टीवर आली तेव्हा आम्हाला चौकार-षटकरांची गरज होती आणि तिने त्याप्रमाणेच फटकेबाजी केली. आम्ही सध्या एकावेळी एकाच सामन्याचा विचार करत आहोत आणि पुढील सामन्यात खेळ उंचावण्याचा प्रयत्न असेल. आशा आहे की, पुढच्या न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यासाठी स्मृती मानधना पुनरागमन करेल. तिची प्रकृती आता सुधारत आहे. - हरमनप्रीत कौर, कर्णधार, भारत

पूनमची विक्रमी ‘फिरकी’
पूनम यादवने या सामन्यात विक्रमी कामगिरी करताना आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात भारताकडून एखाद्या संघाविरुद्ध सर्वाधिक बळी मिळवण्याची कामगिरी केली. तिने बांगलादेशविरुद्ध एकूण २० बळी मिळवताना एकता बिस्तचा विक्रम मोडला. एकताने श्रीलंकाविरुद्ध १९ बळी घेतले आहेत.

पॉवरप्लेमध्ये आम्ही चांगला मारा केला नाही. याशिवाय क्षेत्ररक्षणातही आमच्याकडून चुका झाल्या. याआधी आम्ही प्रकाशझोतात केवळ ३-४ सामने खेळलो. आम्हाला पॉवरप्लेमध्ये आमची कामगिरी उंचवावी लागेल.
- सलमा खातून, कर्णधार, बांगलादेश

Web Title: T1 World Cup Cricket: Indian Women's second consecutive win

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.