कुणी हरले, कुणी जिंकले... पण सभ्य माणसांचा खेळ महानच; आरसीबी-दिल्ली सामन्यानंतर आला प्रत्यय

मंगळवारी आयपीएलच्या सामन्यात या सर्व गोष्टी अनुभवता आल्या.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2021 12:21 AM2021-04-29T00:21:00+5:302021-04-29T00:21:00+5:30

whatsapp join usJoin us
Some lost, some won ... but the game of decent people is great! | कुणी हरले, कुणी जिंकले... पण सभ्य माणसांचा खेळ महानच; आरसीबी-दिल्ली सामन्यानंतर आला प्रत्यय

कुणी हरले, कुणी जिंकले... पण सभ्य माणसांचा खेळ महानच; आरसीबी-दिल्ली सामन्यानंतर आला प्रत्यय

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नागपूर : खेळामध्ये जय, पराजय ठरलेलाच आहे. जिंकणाऱ्यांच्या चेहऱ्यांवर हास्य पहायला मिळते, तर पराभूत झालेले हिरमुसलेले असतात. मैदानावरचे हे चित्र नित्याचेच झाले आहे. मात्र, ‘पराभवातही तुमचा विजय झाला’, असा पराभूतांना धीर देणारे विजयी संघातील खेळाडू पाहिल्यानंतर खेळभावना जिंकल्याची खात्री पटते. ही खेळभावना आधुनिक खेळात अभावानेच पहायला मिळते. 

‘जेंटलमन’ गेम (सभ्य माणसांचा खेळ) अशी क्रिकेटची ख्याती आहे. तो सभ्यतेनेच खेळला जावा, यासाठी नीतिनियमही आहेत. नियमापलीकडे जाऊन खेळाला महान बनविण्याची जबाबदारी मात्र खेळाडूंची असते. स्वत:चे आचरण व प्रतिस्पर्धी खेळाडूचा सन्मान सांभाळून खेळाचा सन्मान वाढविता येतो, हे दाखवून देणारे खेळाडू खेळाला महान बनवितात.

मंगळवारी आयपीएलच्या सामन्यात या सर्व गोष्टी अनुभवता आल्या. रॉयल चॅलेंजर्स बँगलोरकडून दिल्ली कॅपिटल्सचा अवघ्या एका धावेने पराभव झाला. अखेरच्या चेंडूपर्यंत जिद्दीने प्रयत्न करूनही एक धाव कमी पडल्याचे शल्य पराभूत कर्णधार ऋषभ पंतला जाणवत होते. त्याचा साथीदार शिमरोन हेटमायर फारच निराश झाला. दोघांनी क्रमश: नाबाद ५८ व ५३ धावा ठोकल्या; पण एक धाव अपुरी पडल्याने पराभवाचा ठप्पा लागला. दोघांचे चेहरे पडले होते. असा पराभव, तर अनेक वर्षे विसरता येत नाही. पण, दोन्ही संघातील खेळाडूंनी खेळभावनेचा जो परिचय दिला, तो वाखाणण्यासारखा  होता.

सामना अटीतटीचा झाला, मात्र त्यानंतर जे दृश्य पुढे आले ते चाहत्यांना भावुक करून गेले. पराभवानंतर   ऋषभ पंत निराश झाला. त्याचवेळी  विराट कोहली त्याच्याजवळ आला आणि त्याचे सांत्वन केले. त्याचे केस कुरवाळून चांगल्या खेळीबद्दल त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली.   पंतसोबत मैदानात काही वेळसुद्धा घालवला.  

मोहम्मद सिराजने हेटमायरला मिठी मारली. हा व्हिडिओ आयपीएलच्या अधिकृत वेबसाइटवर  शेअर करण्यात आला आहे. चाहते दिलदार कोहलीचे कौतुक करीत आहेत.   सिराजने पंत आणि हेटमायर यांच्या खेळीचे कौतुक केले. त्यावर पंतनेदेखील हास्य चेहऱ्यावर आणून सिराजच्या शब्दांचा सन्मान केला. पराभवाची निराशा दोन्ही फलंदाजांच्या चेहऱ्यांवर जरूर होती, मात्र त्यात कटुता नव्हती. क्रिकेटची खरी ओळख दर्शविणारे ते दृश्य होते.

Web Title: Some lost, some won ... but the game of decent people is great!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.