स्मृती मानधनाचा वन डेत विश्वविक्रम, जगात पटकावलं तिसरं स्थान

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील महिला क्रिकेट संघांच्या वन डे मालिकेत भारतीय संघाने बाजी मारली.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2019 04:32 PM2019-11-07T16:32:02+5:302019-11-07T16:32:31+5:30

whatsapp join usJoin us
Smriti Mandhana Fastest Indian Women Cricketer to Score 2000 ODI Runs, third in world | स्मृती मानधनाचा वन डेत विश्वविक्रम, जगात पटकावलं तिसरं स्थान

स्मृती मानधनाचा वन डेत विश्वविक्रम, जगात पटकावलं तिसरं स्थान

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील महिला क्रिकेट संघांच्या वन डे मालिकेत भारतीय संघाने बाजी मारली. तिसऱ्या वन डे सामन्यात भारताने 6 विकेट राखून विजय मिळवला आणि तीन सामन्यांची मालिका 2-1 अशी खिशात घातली. वेस्ट इंडिजच्या 194 धावांचा पाठलाग भारतीय महिलांनी 42.1 षटकांत 4 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केले. दुखापतीमुळे काही काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर असलेल्या स्मृती मानधनानं या सामन्यात धमाकेदार खेळी केली. स्मृतीच्या येण्यानं जेमिमा रॉड्रीग्जची बॅटची चांगलीच तळपली. स्मृतीनं या सामन्यात विश्वविक्रमाला गवसणी घातली. 

प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजचा संपूर्ण संघ 194 धावांत माघारी परतला. कर्णधार स्टेफनी टेलरने 112 चेंडूंत 5 चौकार व 2 षटकार खेचून सर्वाधिक 79 धावा केल्या. तिला सॅसी-अॅन किंग ( 38) आणि हॅली मॅथ्यूज ( 26) यांनी साथ दिली. भारताकडून झुलन गोस्वामी व पूनम यादव यांनी प्रत्येकी दोन, तर शिखा पांडे, राजेश्वरी गायकवाड व दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतल्या.


या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना जेमिमा आणि स्मृती यांनी संघाला 141 धावांची सलामी उभारून दिली. जेमिमा 92 चेंडूंत 69 ( 6 चौकार) धावा करून माघारी परतली. स्मृतीनं 63 चेंडूंत 9 चौकार व 3 षटकार खेचून 74 धावा केल्या. पूनम राऊत ( 24) आणि मिताली राज ( 20) यांनी छोटेखानी खेळ करून संघाला विजय मिळवून दिला. या विजयासह भारतीय संघाने आयसीसी महिला अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी आगेकूच केली आहे. भारताच्या खात्यात 18 सामन्यांत 20 गुण झाले आहेत. 


स्मृतीनं या सामन्यात 74 धावा चोपून वन डे क्रिकेटमध्ये 2000 धावांचा पल्ला पार केला. तिनं 51 डावांत 2000+ धावा केल्या. भारताकडून सर्वात जलद 2000 धावा करणाऱ्या महिला फलंदाजांत तिनं  बाजी मारली. तिनं कर्णधार मिताली राजचा ( 58 डाव) विक्रम मोडला. आता स्मृती जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. या विक्रमात बेलिंडा क्लार्क ( 41 डाव) आणि मेग लॅनिंग ( 45 डाव) अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या स्थानावर आहेत.

Web Title: Smriti Mandhana Fastest Indian Women Cricketer to Score 2000 ODI Runs, third in world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.