रोहितच्या कसोटी मार्गात युवा फलंदाजाचा अडथळा; गमावू शकतो सलामीला खेळण्याची संधी?

वन डे आणि ट्वेंटी-20नंतर आता कसोटीतही रोहित टीम इंडियासाठी ओपनिंग करणार असल्याचे स्वप्न पाहू लागले आहेत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2019 01:52 PM2019-09-17T13:52:53+5:302019-09-17T13:54:01+5:30

whatsapp join usJoin us
Shubman Gill consistency will be threat to Rohit Sharma Test opening dream against South Africa | रोहितच्या कसोटी मार्गात युवा फलंदाजाचा अडथळा; गमावू शकतो सलामीला खेळण्याची संधी?

रोहितच्या कसोटी मार्गात युवा फलंदाजाचा अडथळा; गमावू शकतो सलामीला खेळण्याची संधी?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : भारतीय निवड समितीनं दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी संघाची नुकतीच घोषणा केली. कामगिरीशी झगडणाऱ्या लोकेश राहुलला कसोटी संघातून डच्चू देण्याचा धाडसी निर्णय निवड घेतला. तीन सामन्यांच्या या मालिकेसाठी राहुलच्या अनुपस्थितीत निवड समिती प्रमुख एमएसके प्रसाद यांनी रोहित शर्माला सलामीला खेळवण्याची संधी दिली जाईल, असे संकेत दिले होते. त्यामुळे वन डे आणि ट्वेंटी-20नंतर आता कसोटीतही रोहित टीम इंडियासाठी ओपनिंग करणार असल्याचे स्वप्न पाहू लागले आहेत. मात्र, या स्वप्नांना तडा जाऊ शकतो. कारण एक युवा खेळाडू आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीनं रोहितच्या या स्वप्नांना सुरुंग लावू शकतो.

वेस्ट इंडिजला त्यांच्याच घरच्या प्रेक्षकांसमोर धुळ चालणारी टीम इंडिया आता मायदेशात दक्षिण आफ्रिकेचा सामना करण्यासाठी सज्ज झाली आहे. तीन ट्वेंटी-20 आणि तीन कसोटी सामन्यांच्या या मालिकेला 15 सप्टेंबरपासून सुरूवात झाली. पण, पहिला ट्वेंटी-20 सामना पावसामुळे रद्द झाला आहे. 2 ऑक्टोबरपासून पहिला कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे आणि या सामन्यातून रोहित कसोटीत प्रथमच सलामीला येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

रोहितनं नोव्हेंबर 2013मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटीत पदार्पण केले. त्यानंतर 2018 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध तो शेवटचा कसोटी सामना खेळला. या पाच वर्षांत रोहितनं 27 कसोटींत 39.62 च्या सरासरीनं 1585 धावा केल्या. त्यात 3 शतकं व 10 अर्धशतकांचा समावेश आहे. रोहितनं आतापर्यंत आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यात 3 ते 6 क्रमांकावर फलंदाजी केली आहे. सहाव्या क्रमांकावर त्यानं सर्वाधिक 16 सामन्यांत 1037 धावा केल्या आहेत. पण, सध्या भारतीय संघाची गरज पाहता आफ्रिकेविरुद्ध तो सलामीला खेळू शकतो.  पण, निवड समितीनं कसोटी संघात राखीव सलामीवीर म्हणून शुबमन गिललाही संधी दिली आहे.

20 वर्षीय गिलने सातत्याच्या जोरावर ही संधी कमावली आहे आणि तोच रोहितसाठी धोका ठरू शकतो. गिल सध्या दक्षिण आफ्रिका अ संघाविरुद्धच्या प्रथम श्रेणी क्रिकेट सामन्यांत भारत अ संघाचे कर्णधारपद भूषवित आहे. पहिल्या सामन्यात भारत अ संघाने दणदणीत विजयाची नोंद केली आणि त्यात गिलनं 90 धावांची खेळी केली होती. त्यात पुन्हा एकदा गिलने आजपासून सुरू झालेल्या दुसऱ्या सामन्यातही अर्धशतकी खेळी करून निवड समितीची डोकेदुखी वाढवली आहे. गिलनं सलग दोन सामन्यांत आफ्रिकेच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला आहे. त्याची ही कामगिरी रोहितच्या सलामीला येण्याच्या मार्गात अडथळा निर्माण करू शकते. 

प्रथम श्रेणी क्रिकेटमधील रोहितची सलामीची कामगिरी
रोहितनं आतापर्यंत तीन प्रथम श्रेणी क्रिकेट सामन्यांत सलामीवीराची भूमिका पार पाडली आहे.  2008-09 च्या रणजी करंडक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत सौराष्ट्रविरुद्ध रोहितनं 40 चेंडूंत नाबाद 30 धावा केल्या होत्या. त्यानंतर 2010-11च्या रणजी स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीच्या राजस्थानविरुद्धच्या सामन्यात त्यानं 73 चेंडूंत 68 धावा केल्या होत्या. 2012-13च्या रणजी स्पर्धेतही पंजाबविरुद्ध त्याला सलामीला खेळण्याची संधी मिळाली होती आणि त्यात त्यानं 11 चेंडूंत 28 धावा केल्या होत्या. पण, या तीनही सामन्यांत अखेरच्या दिवशी रोहितला सलामीला खेळण्याची संधी मिळाली होती. 

भारताचा कसोटी संघ : विराट कोहली, मयांक अग्रवाल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, रिषभ पंत, वृद्धीमान सहा, आर अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, शुबमन गिल.

दक्षिण आफ्रिकेचा कसोटी संघः फॅफ ड्यू प्लेसिस ( कर्णधार), टेंबा बवुमा, थेयूनिस डी ब्रुयन, क्विंटन डी कॉक, डीन एल्गर, झुबायर हम्झा, केशव महाराज, एडन मार्क्राम, सेनुरन मुथूसामी, लुंगी एनगिडी, अॅनरीच नोर्टजे, व्हेर्नोन फिलेंडर, डॅन पिएड्त, कागिसो रबाडा, रुडी सेकंड.

वेळापत्रक
पहिला सामनाः 2 ते 6 ऑक्टोबर - विशाखापट्टणम, वेळ - सकाळी 9.30 वाजल्यापासून
दुसरा सामनाः 10 ते 14 ऑक्टोबर - पुणे, वेळ - सकाळी 9.30 वाजल्यापासून
तिसरा सामनाः 19 ते 23 ऑक्टोबर - रांची, वेळ - सकाळी 9.30 वाजल्यापासून

Web Title: Shubman Gill consistency will be threat to Rohit Sharma Test opening dream against South Africa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.