सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२५-२६ स्पर्धेतील साखळी सामन्यांमध्ये आज (८ डिसेंबर २०२५) वडोदरा आणि सर्व्हिसेस यांच्यात एक हाय-स्कोअरिंग आणि थरारक सामना पाहायला मिळाला. हैदराबादच्या जिमखाना मैदानावर झालेल्या एलिट ग्रुप सी च्या या सामन्यात वडोदराने १३ धावांनी विजय मिळवला. वडोदराचा यष्टीरक्षक-फलंदाज अमित पासी या सामन्याचा खरा हिरो ठरला. त्याने आपल्या टी-२० पदार्पणातच ११४ धावांची अविश्वसनीय खेळी करून इतिहास रचला
वडोदरा संघाने प्रथम फलंदाजी करताना ५ विकेट्स गमावून २२० धावांचा मोठा डोंगर उभा केला. यामध्ये अमित पासीच्या खेळीचा सिंहाचा वाटा होता. अमित पासीने केवळ ५५ चेंडूत ११४ धावा केल्या. त्याच्या स्फोटक खेळीत १० चौकार आणि ९ उत्तुंग षटकारांचा समावेश होता. त्याने अवघ्या ४४ चेंडूत शतक पूर्ण केले.
पाकिस्तानी खेळाडूच्या विक्रमाची बरोबरी
२६ वर्षीय अमित पासीने आता टी-२० पदार्पणाच्या सामन्यात सर्वाधिक धावा करण्याच्या पाकिस्तानी क्रिकेटपटू बिलाल असिफच्या विक्रमाची बरोबरी केली. बिलाल असिफने याच वर्षी मे महिन्यात सियालकोट स्टॅलियन्सकडून खेळताना फाल्कन्सविरुद्ध ४८ चेंडूत ११४ धावा केल्या होत्या.
वडोदराचं सर्व्हिसेससमोर २२१ धावांचे लक्ष्य
पासीच्या शतकी खेळीमुळे वडोदरा संघाने मोठी धावसंख्या उभारली. पासीने विष्णू सोलंकी (१२ चेंडूत २५ धावा) सोबत चौथ्या विकेटसाठी ५.२ षटकात ७५ धावांची जलद भागीदारी रचली. तसेच, भानू पानियाने १५ चेंडूत नाबाद २८ धावांचे उत्कृष्ट योगदान दिले. सर्व्हिसेसकडून अभिषेक तिवारीने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या.
अटीतटीच्या सामन्यात सर्व्हिसेसचा १३ धावांनी पराभव
दरम्यान, २२१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सर्व्हिसेस संघानेही कडवी झुंज दिली. कुंवर पाठक आणि रवी चौहान यांनी ८.२ षटकात ८४ धावांची सलामी भागीदारी करत संघाला चांगली सुरुवात करून दिली. कुंवर पाठक आणि रवी चौहान या दोन्ही सलामीवीरांनी प्रत्येकी ५१ धावा केल्या. कर्णधार मोहित अहलावतने (२२ चेंडूत ४१ धावा) संघाच्या आशा जिवंत ठेवल्या. मात्र, मधल्या फळीतील नकुल शर्मा वगळता इतर फलंदाज अपयशी ठरले आणि सर्व्हिसेसचा संघ फक्त २०७ धावा करू शकला. वडोदराकडून राज लिंबानी सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला, त्याने ३७ धावांत ३ महत्त्वपूर्ण विकेट्स घेतल्या. सर्व्हिसेसचा हा सात सामन्यांतील सहावा पराभव होता, तर वडोदराने हा सामना १३ धावांनी जिंकला.