Pakistan Naseem Shah Attack: पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज नसीम शाहच्या घरावर हल्ला झाला आहे. घरावर गोळ्या झाडण्यात आल्या, ज्यामुळे मोठे नुकसान झाले. गोळीबार झालेल्या नसीम शाहच्या घराचे नाव हुजरा आहे. त्याचे घर खैबर पख्तूनख्वाच्या लोअर दिर जिल्ह्यात आहे. हल्ल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली आहे आणि तपास सुरू केला आहे. मिळालेल्या वृत्तानुसार, नसीम शाह याच्या घरावर उघडपणे गोळ्या झाडण्यात आल्या, ज्यामुळे असंख्य वस्तूंचे नुकसान झाले. हल्ल्यात नसीम शाहच्या घराच्या खिडक्या, मुख्य गेट आणि पार्किंग क्षेत्राचे मोठे नुकसान झाले.
५ जणांना अटक
हल्ल्याच्या वेळी नसीम शाहचे कुटुंब घरी होते. सुदैवाने कुटुंबीयांचे प्राण वाचले. कुटुंब घाबरले होते, पण ते सुरक्षित आहेत. पोलिसांनी या घटनेत सहभागी असलेल्या पाच जणांना अटक केली आहे आणि त्यांची चौकशी करून घटनेचा तपास सुरू केला आहे. हल्ल्यानंतर पोलिसांनी नसीम शाहच्या घराबाहेर सुरक्षाही वाढवली आहे.
हल्ल्याच्या वेळी नसीम शाह पाकिस्तान संघासोबत
नसीम शाहबद्दल बोलायचे झाले तर, हल्ल्याच्या वेळी तो पाकिस्तान क्रिकेट संघासोबत रावळपिंडीमध्ये होता. तो संघासोबतच आहे. नसीम शाहची श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी निवड झाली आहे. ही मालिका ११ ते १५ नोव्हेंबर दरम्यान खेळली जाईल. एकदिवसीय मालिकेनंतर, नसीम शाह तीन देशांच्या टी२० मालिकेतही पाकिस्तानचे प्रतिनिधित्व करेल. पाकिस्तान आणि श्रीलंकेसह झिम्बाब्वे हा टी२० मालिकेतील तिसरा संघ असेल. टी२० सामने १७ ते २९ नोव्हेंबर दरम्यान रावळपिंडी आणि लाहोर येथे खेळले जातील.