practice game also played with seriousness says sachin tendulkar | सराव सामनाही गांभीर्यानेच खेळला जातो- तेंडुलकर
सराव सामनाही गांभीर्यानेच खेळला जातो- तेंडुलकर

- रोहित नाईक

मुंबई : ‘सराव सामना असल्याने आपला संघ गांभीर्याने खेळला नाही किंवा पूर्ण ताकदीने खेळला नसेल, असे काही नसते. मैदानावर कोणीही आपला खराब खेळ करत नसतो. त्यामुळे मला हे स्पष्टपणे सांगायचे आहे की सामना कोणताही असो, सराव असो किंवा प्रेक्षणीय आम्ही खेळाडू तो सामना पूर्ण गांभीर्यानेच खेळतो,’ असे स्पष्ट मत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.

इंग्लंडमध्ये ३० मेपासून सुरु होणाऱ्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने सचिनने रविवारी संवाद साधला. विश्वचषक स्पर्धेच्या आधी सराव सामन्यात शनिवारी भारताला न्यूझीलंडविरुद्ध मोठा पराभव पत्करावा लागला. याविषयी सचिनने म्हटले की, ‘सराव सामना असल्याने भारतीय संघ मुद्दामहून हरला असे नाही. कोणीही मैदानावर खराब खेळण्यासाठी उतरत नाही. तसेच, कोणीही मुद्दामहून हरत नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्व खेळाडू देशाचे प्रतिनिधित्व करत असतात, ही खूप अभिमानाची बाब आहे. कधीही खेळासोबत मस्ती करु नका, ही शिकवण आम्हाला आचरेकर सरांनी दिली आहे. त्याचे आम्ही तंतोतंत पालन केले. त्यामुळे प्रत्येक सामना आमच्यासाठी महत्त्वाचा असतो.’  

१० संघांचा समावेश असलेल्या यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत प्रत्येक संघाला राऊंड रॉबिन पद्धतीने प्रत्येक संघाविरुद्ध खेळायचे आहे. याविषयी सचिन म्हणाला, ‘यंदाच्या स्पर्धेचे स्वरुप अत्यंत आव्हानात्मक असून प्रत्येक संघाला कामगिरीत सातत्य राखावे लागेल. २००७ साली झालेल्या विश्वचषकाच्या लहान स्वरुपाच्या स्पर्धेत आपण पाहिले की, साखळी सामन्यातून दोन अनपेक्षित संघ पुढे आले होते. त्यामुळे अशा स्पर्धांत काहीही घडू शकते. यंदा तग धरण्यासाठी प्रत्येक संघाला सातत्याने चांगला खेळ करावा लागेल.’ 

इंग्लंडमधील सातत्याने बदलत राहणाऱ्या हवामानाविषयी सचिनने सांगितले की, ‘इंग्लंडमध्ये नेहमीच हवामानाकडे लक्ष ठेवणे महत्त्वाचे असते. कारण तिथे कधीकधी नाणेफेक करताना निरभ्र आकाश असू शकते. पण सामना सुरु होताना ढगाळ वातावरणही होऊ शकते. त्यामुळे निर्णय घेताना प्रत्येक कर्णधाराला स्मार्ट व्हावे लागेल. यासाठी कर्णधारांना थोडेफार संशोधन करावेच लागेल. तिथे हवामान लगेच बदलत राहत असल्याने याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. थोडक्यात आपल्याला हवामानाच्या एक पाऊल पुढे रहावे लागेल.’ 

नियमांत बदल होणे गरजेचे..
विश्वचषक स्पर्धांमध्ये धावांचा एव्हरेस्ट उभारला जाईल, असे भाकीत अनेकांनी केले. याविषयी सचिनने म्हटले की, ‘इंग्लंडमध्ये सातत्याने भल्यामोठ्या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग झाला.  याचा अर्थ कुठेतरी गडबड होत आहे. यासाठी नियमात बदल होणे गरजेचे आहे. नव्या नियमानुसार एकदिवसीय सामन्यात दोन नवे चेंडू वापरता येतात. अशा वेळी खेळपट्टी सपाट असेल,आणि क्षेत्ररक्षणावरही बंधणे असतील, तर नक्कीच गोलंदाज अडचणीत येतात. चेंडू अपेक्षित स्विंग होणार नाही. शिवाय चेंडू जुना होत नसल्याने रिव्हर्स स्विंग हा प्रकारच आता एकदिवसीय सामन्यांतून गायब झाला आहे. पूर्वी रिव्हर्स स्विंगमुळे सामना बरोबरीचा व्हायचा.’ 

२००३ साली आमच्याकडे आशिष नेहरा, झहीर खान, जवागल श्रीनाथ, अनिल कुंबळे व हरभजन सिंग अशी गोलंदाजी होती. याहून अजून किती मजबूत गोलंदाजी पाहिजे. त्या काळात ही मजबूत गोलंदाजी होती. त्यामुळे त्यांच्या कामगिरीचाही आदर झाला पाहिजे. आजही आपल्याकडे उत्तम मारा आहे. भुवनेश्वर स्विंग करतो, शमी वेगवान आहे, बुमराह अव्वल असून त्याच्याकडे वैविध्य आहेत. हार्दिक आणि विजय शंकर यांचा पाठिंबा मिळेल.  कुलदीप-युझवेंद्र यांच्याकडे वैविधता असून जडेजा भेदक मारा करु शकतो. याशिवाय केदार जाधवचा ऑफ स्पिन मारा वेगळाआहे. एकूणच यंदाही आपली गोलंदाजी चांगली असून कर्णधार विराट कोहलीकडे पर्याय खूप चांगले आहेत. 
- सचिन तेंडुलकर


Web Title: practice game also played with seriousness says sachin tendulkar
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.