Virat Kohli : शास्त्री आणि कोचिंग स्टाफसाठी विराटचं इमोशनल ट्वीट; म्हणाला, "या आठवणींसाठी..."

Virat Kohli : टी २० विश्वचषकानंतर टी २० संघाचं कर्णधारपद सोडणार असल्याची घोषणा यापूर्वी विराटनं केली होती. कर्णधारपदाच्या अखेरच्या टी २० सामन्यानंतर विराटनं आपल्या कोचसाठी एक भावनिक ट्वीट केलं आहे.

Virat Kohli Emotional Tweet : टी २० विश्वचषक स्पर्धेत सुरूवातीचे दोन सामने गमावल्यानंतर भारताचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं होतं. अखेरचे तीन सामने जिंकले असले तरी अफगाणिस्तान न्यूझीलंड सामन्यावर भारताच्या आशा होत्या. परंतु न्यूझीलंडनं सामना जिंकल्यानं भारताला स्पर्धेतून बाहेर जावं लागलं.

या स्पर्धेतील भारत विरुद्ध नामिबिया हा सामना विराट कोहलीचा टी २० चा कर्णधार म्हणून अखेरचा सामना ठरला. तर दुसरीकडे या नंतर टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री यांच्या जागी टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी राहुल द्रविडकडे सोपवण्यात आली आहे.

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर यांच्यासाठी एक भावनिक ट्विट केलं आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) सोबतचे तिघांचेही करार T20 विश्वचषकासोबत संपुष्टात आले.

टीम इंडियाचा नवा मुख्य प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविडची नियुक्ती करण्यात आली आहे. विराटने ट्विटरवर या तिघांसोबतचे फोटो शेअर करून त्यांचे आभार मानले आहेत. टी-20 विश्वचषकातील भारताचा प्रवास संपल्याने पुढील सामन्यांमध्ये टी २० संघाचं नेतृत्वही विराटकडे नसेल.

"तुमच्या सोबतच्या आठवणी आणि आजवरच्या प्रवासासाठी तुमचे सर्वांचे आभार. तुमचं योगदान हे अमूल्य होतं आणि भारतीय क्रिकेटच्या इतिहासात ते कायम आठवणीत ठेवलं जाईल. जीवनातील पुढील प्रवासासाठी तुम्हाला शुभेच्छा. Until next time ⭐" असं विराटनं म्हटलं आहे.

भारतीय ट्वेंटी-२० संघाचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आगामी न्यूझीलंडविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत खेळणार नाही. मागील सहा महिन्यांपासून बायो बबलमध्ये असल्याकारणानं त्यानं १७ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या मालिकेतून विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला. वर्ल्ड कपनंतर टीम इंडियाच्या ट्वेंटी-२० संघाच्या नेतृत्वाची जबाबदारीही रोहित शर्माच्या ( Rohit Sharma) खांद्यावर सोपवण्यात आली आहे.

कर्णधार म्हणून अखेरच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत विराट जेतेपदाचा दुष्काळ संपवेल, असे वाटले होते. पण, प्रत्यक्षात टीम इंडियाला साखळी फेरीतच गाशा गुंडाळावा लागला. आता ना कर्णधारपद, ना ट्वेंटी-२० वर्ल्ड कपचे जेतेपद... त्यात विराटनं न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतून घेतलीय विश्रांती. या सर्व गोष्टींचा विराटला मोठा फटका बसला आहे.

कर्णधार म्हणून अखेरच्या वर्ल्ड कप स्पर्धेत विराटला अपयश आलं. २०१७च्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे उपविजेतेपद, २०१९च्या वन डे वर्ल्ड कपची उपांत्य फेरी आणि २०२१च्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे उपविजेतेपद, अशी आयसीसी स्पर्धांमधील विराटची कामगिरी. त्यामुळे यंदातरी हा दुष्काळ संपेल असे वाटले होते, परंतु पाकिस्ताननं पहिल्याच सामन्यात १० विकेट्स राखून विजय मिळवला अन् टीम इंडियाच्या दृढनिश्चयाचा चुराडा झाला. न्यूझीलंडनंही ८ विकेट्स राखून भारताचे आव्हान साखळीतच गुंडाळले.

आयसीसीनं आज जाहीर केलेल्या ट्वेंटी-२० क्रमवारीत फलंदाजांमध्ये विराट कोहलीला मोठा फटका बसला आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम ( Babar Azam) हा अव्वल स्थानावर कायम आहे आणि इंग्लंडचा डेविड मलान दुसऱ्या क्रमांकावर आहे.

दक्षिण आफ्रिकेचे वर्ल्ड कप स्पर्धेतील आव्हान साखळीतच संपुष्टात आले असले तरी त्यांचा फलंदाज एडन मार्कराम यानं जोरदार मुसंडी मारली आहे. त्यानं तीन क्रमांकाच्या सुधारणेसह थेट तिसऱ्या स्थानी झेप घेतली.

इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात मार्करामनं २५ चेंडूंत ५२ धावा कुटल्या होत्या. भारताच्या लोकेश राहुलनंही ( KL Rahul) वर्ल्ड कप स्पर्धेत दमदार फलंदाजी केली आणि त्याचा फायदा म्हणून तोही ८व्या क्रमांकावरून पाचव्या स्थानावर आला. पण, माजी कर्णधार विराट चौथ्या क्रमांकावरून थेट ८व्या स्थानी फेकला गेला.