Virat Kohli Rohit Sharma : विराट, रोहितच्या बॅटिंग फॉर्मबद्दल पहिल्यांदाच बोलला BCCI अध्यक्ष Sourav Ganguly, म्हणाला...

रोहित, विराटला आगामी टी२० मालिकेसाठी विश्रांती

Virat Kohli Rohit Sharma, Sourav Ganguly : गेल्या काही महिन्यांपासून विराट कोहली आणि रोहित शर्मा हे टीम इंडियाचे दोन दमदार फलंदाज सातत्याने फ्लॉप ठरताना दिसत आहेत.

कर्णधार रोहित शर्माने यंदा IPLच्या हंगामात एकही अर्धशतक ठोकलं नाही. तर माजी कर्णधार विराट कोहलीने १४ सामन्यांमध्ये केवळ दोन अर्धशतके ठोकली.

विराट आणि रोहित यांनी आगामी टी२० मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. पण त्यांचा हरवलेला फॉर्म हा चिंतेचा विषय आहे. अशा वेळी BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीने त्या दोघांच्या बाबतीत महत्त्वाचे विधान केले आहे.

रोहित शर्माबद्दल गांगुली म्हणाला, "प्रत्येक जण माणूस आहे. त्यामुळे चुका होणारच. पण कर्णधार म्हणून रोहितचे रेकॉर्ड खूप चांगले आहे. 5 IPL विजेतेपदे, आशिय कप विजेतेपद... रोहितने जेव्हा-जेव्हा नेतृत्व केलंय त्यावेळी विजेतेपद मिळवलंय."

सौरव गांगुली आणि विराट कोहली यांच्यात टीम इंडियाच्या कर्णधारपदावरून काही वाद झाल्याची चर्चा होती. मात्र, विराटच्या फॉर्मबद्दल गांगुलीने सकारात्मक मत व्यक्त केलं.

"विराट कोहली एक उत्तम खेळाडू आहे. मला विश्वास आहे की तो लवकरच मोठ्या खेळी खेळण्यास सुरूवात करेल. विराटने गेल्या काही वर्षात प्रचंड क्रिकेट खेळलं आहे. त्यामुळे कदाचित त्याच्या खेळावर परिणाम झाला असावा. पण RCBला गरज असताना विराट तुफान खेळला होता. तो लवकरच फॉर्म परत मिळवेल", असं गांगुली म्हणाला.