'अनसोल्ड' पृथ्वी-सरफराज जोडी कोट्यवधींची प्राइज टॅग असलेल्या खेळाडूंच्या गटात; बेस प्राइज किती?

यावेळी तरी या भारतीय फलंदाजांना मिळेल का भाव?

२०२५ च्या मेगा लिलावात अनसोल्डचा टॅग लागलेला पृथ्वी शॉ आणि सरफराज खान पुन्हा एकदा मिनी लिलावात उतरले आहेत.

आगामी मिनी लिलावात पृथ्वी शॉ आणि सरफराज खान दोघांच्या नावाचा समावेश हा कॅप्ड बॅटरच्या पहिल्या सेटमध्ये करण्यात आला आहे.

मिनी लिलावात त्यांच्या सेटमध्ये जे अन्य खेळाडू आहेत त्यात कॅमरून ग्रीनसह डेव्हॉन कॉन्वे, जेक फ्रेझर मॅकगर्क, आणि डेविड मिलर यांचा समावेश आहे. या परदेशी खेळाडूंनी २ कोटी या बेस प्राइजसह नाव नोंदणी केली आहे.

पृथ्वी शॉनं गतवर्षी प्रमाणेच यंदाच्या लिलावातही ७५ लाख या मूळ किंमतीसह नाव नोंदणी केली आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये महाराष्ट्र संघाकडून त्याने कमालीची कामगिरी करून दाखवली आहे. त्यामुळे गतवर्षी अनसोल्ड राहिलेल्या पृथ्वीला यावेळी चांगला भाव मिळेल अशी अपेक्षा आहे.

२०१८ मध्ये दिल्लीच्या संघाकडून १ कोटी २० लाख रुपयांसह IPL पदार्पण करणाऱ्या पृथ्वीसाठी याच फ्रँचायझी संघाने २०२३ आणि २०२४ मध्ये प्रत्येकी ८-८ कोटी रुपये मोजले होते. पण २०२५ च्या मेगा लिलावात मूळ किंमत ७५ लाख ठेवूनही त्याला कुणीच भाव दिला नव्हता.

आयपीएलच्या आगामी हंगामासाठी त्याच्यावर मोठी बोली लागली नाही तरी यावेळी त्याच्यावर अनसोल्ड राहण्याची वेळ येणार नाही, असे चित्र दिसते. तो पुन्हा दिल्लीच्या ताफ्यात जाणार की, नवा फ्रँचायझीसोबत खेळताना दिसणार ते पाहण्याजोगे असेल.

सरफराज खानला २०१८ मध्ये पदार्पणाच्या हंगामात RCB च्या संघाने ३ कोटींचे पॅकेज दिले होते. पण त्यानंतर मात्र त्याची प्राइज टॅग घसरली. पुढच्या तीन हंगामात २५ लाख रुपयांसह तो पंजाबचा भाग होता. २०२२ आणि २०१३ मध्ये २० लाख रुपयांसह तो दिल्लीच्या ताफ्यात होता.

देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने कमालीच्या कामगिरीसह मैदानात तग धरण्याच्या क्षमतेसोबतच उत्तुंग फटकेबाजी करण्याची धमक असल्याचे दाखवून दिले आहे. त्यामुळे यावेळी त्यालाची चांगला भाव मिळू शकतो. ७५ लाख या मूळ किंमतीसह लिलावात उतरुन तो पुन्हा 'करोडपती' होणार का? ते पाहण्याजोगे असेल.