T20 Cricket clean sweep: T20 सामन्यात ७२ चेंडूत बनली नाही एकही रन; लाजिरवाण्या फलंदाजीमुळे संघाचा झाला दारूण पराभव

अतिशय वाईट दर्जाच्या फलंदाजीचा संघाला बसला फटका

T20 Cricket हा फलंदाजांचा खेळ आहे असं म्हटलं जातं. पण काही वेळा गोलंदाज संपूर्ण सामन्यावर वर्चस्व गाजवतात आणि फलंदाजांना काहीच करता येत नाही. असाच एक सामना नुकताच पाहायला मिळाला.

युएईच्या महिला क्रिकेट संघाने हाँगकाँगच्या संघाला टी२० मालिकेत एकतर्फी पराभूत केले. मलेक क्रिकेट ग्राऊंडवर झालेला चौथा टी२० सामना युएईने ९ गडी राखून जिंकला आणि प्रतिस्पर्धी संघाला क्लीन स्विप दिला.

युएईच्या संघाने टी२० मालिकेतील चारही सामने एकतर्फी जिंकले. चौथ्या टी२० सामन्यात तर युएईने तब्बल ६९ चेंडू राखून टी२० सामना जिंकला. हाँगकाँगच्या संघाने प्रथम फलंदाजी करत फक्त ६२ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात युएईच्या संघाने एका गड्याच्या मोबदल्यात विजय मिळवला.

हाँगकाँगच्या फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली. त्यांनी त्यांच्या डावात तब्बल ७२ डॉट बॉल्स खेळले. संघातील केवळ तिघांना दोन आकडी संख्या गाठता आली तर एकाच फलंदाजाचा स्ट्राईक रेट १००पेक्षा जास्त होता.

युएईकडून सिया गोखलेने सामन्यात एकूण १४ धावांत ३ बळी टिपले. तर वैष्णवी महेश आणि छाया यांनी २-२ गडी बाद केले. मालिकेतील सर्वोत्तम गोलंदाज ठरलेल्या चमानी सेनेविर्तानाने एकूण ६ गडी बाद केले. तर हाँगकाँगच्या मारिको हिल हिनेही ६ गडी माघारी पाठवले.

फलंदाजीत युएईच्या ईगोदागेने मालिकेत सर्वाधिक १४३ धावा केल्या. तर ओझाने ११९ धावा केल्या. हाँगकाँगकडून सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या यिंग चॅनला संपूर्ण चार सामन्यांच्या मालिकेत ९२ धावा करता आल्या.