T20 World Cup: नामिबिया, स्कॉटलंडमुळे टीम इंडियाला 'मौका', न्यूझीलंडचा संघ फसला; भारत उपांत्य फेरीत?

T20 World Cup: लागोपाठ दोन मोठ्या विजयांमुळे भारताच्या आशा उंचावल्या

टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्या दोन सामन्यांत दारुण पराभव पत्करल्यानंतर टीम इंडियानं जोरदार कमबॅक केलं आहे. पाकिस्तान, न्यूझीलंडविरुद्ध मोठा पराभव पदरी पत्करावा लागल्यानंतर भारतानं अफगाणिस्तान आणि स्कॉटलँडला धूळ चारत नेट रनरेट वाढवत थेट तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली.

पहिल्या दोन सामन्यांनंतर भारताचं विश्वचषक स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आल्याचं म्हटलं जात होतं. मात्र अफगाणिस्तान आणि स्कॉटलँडला भारतानं अक्षरश: लोळवलं. त्यामुळे भारताचा समावेश असलेल्या ब गटात आता चांगलीच चुरस निर्माण झाली आहे. गटातून दोन संघ उपांत्य फेरीत जातील. पाकिस्तानचा उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित आहे. तर दुसऱ्या जागेसाठी तीन संघ शर्यतीत आहे.

ब गटात आता तीन सामने शिल्लक आहेत. पाकिस्तानचा संघ स्कॉटलंडशी भिडेल. पण पाकिस्तानचा संघ उपांत्य फेरीत पोहोचला असल्यानं आणि स्कॉटलंडचं आव्हान संपुष्टात आल्यानं या सामन्याला फारसं महत्त्व नाही. ७ नोव्हेंबरला दोन महत्त्वाचे सामने होत आहे. अफगाणिस्तान वि. न्यूझीलँड आणि भारत वि. नामिबिया.

काल न्यूझीलंडनं नामिबियाला ५२ धावांनी पराभूत केलं. त्यामुळे ६ गुणांसह न्यूझीलंड आता ब गटात दुसऱ्या स्थानी आहे. न्यूझीलंड सामना जिंकला असला, तरीही त्यांना मोठा विजय नोंदवता आला नाही. नामिबियानं १६ षटकांपर्यंत टिच्चून गोलंदाजी केली. त्यामुळे न्यूझीलंडला मोठी धावसंख्या उभारता आली नाही.

नेट रनरेटच्या बाबतीत अफगाणिस्तानला मागे टाकण्यासाठी न्यूझीलंडनं नामिबियाला ९४ किंवा त्यापेक्षा कमी धावसंख्येवर रोखणं गरजेचं होतं. मात्र नामिबियानं १११ धावा केल्या. न्यूझीलंडनं प्रथम फलंदाजी करताना ४ बाद १६३ धावा उभारल्या. नामिबियाच्या शानदार गोलंदाजीमुळे एक वेळ किवी संघ ४ बाद ८७ अशा अडचणीत होता. मात्र फिलिप्स आणि निशामनं शेवटच्या ४ षटकांत ६० हून अधिक धावा काढल्या.

न्यूझीलंड वि. अफगाणिस्तान सामना ७ नोव्हेंबरला होईल. तर भारत वि. नामिबिया सामना ८ नोव्हेंबरला होईल. अफगाणिस्ताननं न्यूझीलंडचा पराभव केल्यास भारताला लॉटरी लागेल. या स्थितीत अफगाणिस्तान, न्यूझीलंडचे प्रत्येकी ६ गुण होतील. भारतानं नामिबियाला मोठ्या फरकानं नमवल्यास भारताचेदेखील ६ गुण होतील. पण नेट रनरेट जास्त असल्यानं भारत उपांत्य फेरीत जाईल.

नामिबियाच्या आधी स्कॉटलँडनं न्यूझीलंडला चांगलंच झुंजवलं. स्कॉटलँडच्या खेळाडूंनी जोरदार फटकेबाजी केली. त्यामुळे न्यूझीलंड पराभूत होईल असं वाटत होतं. मात्र मधल्या षटकात किवींनी चांगली गोलंदाजी केली. शेवटच्या षटकांमध्ये किवींनी स्कॉटलँडच्या फलंदाजीला वेसण घातली. त्यामुळे न्यूझीलंडचा संघ १६ धावांनी विजयी झाला.

नामिबिया आणि स्कॉटलँडविरुद्धचे सामने किवींना मोठ्या फरकानं जिंकता आले नाहीत. भारतानं स्कॉटलँडचा अक्षरश: धुव्वा उडवला. पण न्यूझीलँडला स्कॉटलँडनं चांगलंच झुंजवलं. याचाच परिणाम आता किवींच्या नेट रनरेटवर झाला आहे. न्यूझीलंडचा संघ गुण तालिकेत ब गटात दुसऱ्या स्थानी आहे. मात्र त्यांचा नेट रनरेट अफगाणिस्तान आणि भारतापेक्षा कमी आहे.

अफगाणिस्ताननं न्यूझीलंडला पराभवाचा धक्का दिल्यास भारताला नामिबियाचा पराभूत करून उपांत्य फेरी गाठता येईल. अफगाणिस्तान संघानं न्यूझीलंडविरुद्ध १६० धावा उभारून सामना ३० धावांनी जिंकल्यास भारताला नामिबियाला २१ धावांनी पराभूत करावं लागेल.

अफगाणिस्तान वि. न्यूझीलंड सामना ७ नोव्हेंबरला होत आहे. तर भारत वि. नामिबिया सामना ८ तारखेला होणार आहे. त्यामुळे उपांत्य फेरीसाठी नेमकं काय करायचं याचं समीकरण भारताला माहीत असेल. भारतासाठी ही जमेची बाजू आहे.

Read in English