T20 World Cup Final, NZ vs AUS Live Updates : न्यूझीलंडचं नेमकं कुठे चुकलं?; सलग तिसऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं

T20 World Cup Final, New Zealand vs Australia Live Updates : आणखी एका वर्ल्ड कप फायनलमध्ये न्यूझीलंड संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. टॅलेंटेड खेळाडूंचा भरणा असून अगदी अखेरच्या क्षणाला न्यूझीलंडचं असं काय बिनसतं की त्यांना जेतेपदावर पाणी सोडावं लागतं.

T20 World Cup Final, New Zealand vs Australia Live Updates : आणखी एका वर्ल्ड कप फायनलमध्ये न्यूझीलंड संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. टॅलेंटेड खेळाडूंचा भरणा असून अगदी अखेरच्या क्षणाला न्यूझीलंडचं असं काय बिनसतं की त्यांना जेतेपदावर पाणी सोडावं लागतं. न्यूझीलंड हा असा संघ आहे की त्याच्या समोर टीम इंडिया जरी असली तरी मनाच्या एका कोपऱ्यात केन विलियम्सननं बाजी मारावी, असं सततं वाटतं. कारण क्रिकेटमधील खरा जंटलमनपणा त्यांना जपलाय आणि केन विलियम्सच्या मार्गदर्शनाखाली त्याला शिस्तीची आणखी जोड मिळालीय. पण, तरीही हा संघ अंतिम फेरीत का हरतो..

२०१५, २०१९ चे वन डे वर्ल्ड आणि आज ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या फायनलमध्ये किवींना सरस खेळूनही हार मानावी लागली. न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन ( Kane Williamson) यानं झुंझार खेळ करून ऑस्ट्रेलियासमोर तगडं आव्हान केलं. पण, डेव्हिड वॉर्नर व मिचेल मार्श यांच्या वैयक्तिक अर्धशतकांनी न्यूझीलंडचे स्वप्न अधुरेच ठेवले.

११-१६ षटकांत न्यूझीलंडनं १ विकेट गमावून ७९ धावा चोपल्या. मार्टीन २८ धावांवर माघारी परतला अन् केनसह त्याची ४५ धावांची भागीदारी संपुष्टात आली. केन व ग्लेन फिलिप्स यांनी तिसऱ्या विकेटसाठी ३७ चेंडूंत ६८ धावा जोडल्या आणि त्यापैकी ४६ धावा या केनच्याच होत्या. केननं ४८ चेंडूंत १० चौकार व ३ षटकारांसह ८५ धावा केल्या. हेझलवूनंच त्याची विकेट घेतली. हेझलवूडनं ४ षटकांत १६ धावांत ३ विकेट्स घेतल्या. न्यूझीलंडनं २० षटकांत ४ बाद १७२ धावा केल्या.

प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरोन फिंच ( ५) अपयशी ठरला. डॅरील मिचेलनं अप्रतिम झेल टिपला. १५ धावांवर पहिला धक्का बसल्यानंतर डेव्हिड वॉर्नर व मिचेल मार्श यांनी ऑस्ट्रेलियाचा डाव सारवला. इथे न्यूझीलंडच्या गोलंदाजांना विकेट घेण्यात अपयश आले, अर्थात खेळपट्टी व दव फॅक्टर हा त्रासदायक असेल याची जाण त्यांनाही होती.

वॉर्नर व मार्श यांनी पहिल्या १० षटकांत १ बाद ८२ धावा उभारून दिल्या. त्यांना ६० चेंडूंत विजयासाठी ९१ धावा करायच्या होत्या. वॉर्नरला रोखणं अवघड झाले होते आणि त्यानं ३४ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. वॉर्नरच हा सामना संपवेल असे वाटत असताना ट्रेंट बोल्टनं १३व्या षटकात त्याचा त्रिफळा उडवला. वॉर्नर ३८ चेंडूंत ४ चौकार व ३ षटकारांसह ५३ धावांवर माघारी परतला. वॉर्नरपाठोपाठ मिचेल मार्शनं अर्धशतक पूर्ण केलं.

किवींकडून ट्रेंट बोल्टनं १८ धावांत २ विकेट्स घेतल्या. त्याच्या चौथ्या षटकात मार्शचा झेल त्यानंच सोडला. ऑस्ट्रेलियानं ८ विकेट्स राखून हा सामना जिंकला. मार्श ५० चेंडूंत ६ चौकार व ४ षटकारांसह ७७ धावांवर नाबाद राहिला. मॅक्सवेलनं नाबाद २८ धावा केल्या. ऑस्ट्रेलियानं १८.५ षटकांत विजय मिळवला.

पहिल्या दहा षटकांतील कमी धावा आणि गोलंदाजांना आलेले अपयश हे न्यूझीलंडच्या पराभवाचे प्रमुख कारण ठरले. ऑस्ट्रेलियाचे हे सहावे जागतिक जेतेपद ठरले. त्यांनी पाच वेळा ( 1987, 1999, 2003, 2007, 2015) वन डे वर्ल्ड कप जिंकला आहे.