The final stretch in Group 2, Which team will join Pakistan in the semis?: भारतीय संघानं ६.३ षटकांत सामना जिंकला, अफगाणिस्तान-न्यूझीलंड यांचं वाढवलं टेंशन, पण आता पुढे काय?;

T20 World Cup 2021 Scenarios for India to Qualify: भारतीय संघानं आज जगाला दाखवून दिलं की तो जागतिक क्रिकेटमधील सर्वात अव्वल संघ का आहे. पहिल्या दोन सामन्यांत लाजीरवाण्या पराभवानंतर टीम इंडियानं फिनिक्स भरारी घेतली. आज तर त्यांनी स्कॉटलंडचा पालापाचोळा केला. नेट रन रेट सुधारून उपांत्य फेरीच्या शर्यतीत मोठी आघाडी घेण्यासाठी ७.१ षटकांत सामना जिंकयचा होता आणि त्यांनी ६.३ षटकांत तो जिंकला.

भारताचा नेट रन रेट आता न्यूझीलंड व अफगाणिस्तान यांच्यापेक्षा सरस आहे. भारतानं आता ४ गुण व १.६१९ नेट रन रेटसह तिसऱ्या स्थानी झेप घेत, अफगाणिस्तानला ( ४ गुण व १.४८१) चौथ्या क्रमांकावर ढकलले. ६ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या न्यूझीलंडचाही नेट रन रेट ( १.२७७) हा भारतापेक्षा कमीच आहे.

मोहम्मद शमी, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह यांच्या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर टीम इंडियानं स्कॉटलंडला गुडघे टेकण्यास भाग पाडले. त्यानंतर रोहित शर्मा व लोकेश राहुल यांनी तुफान फटकेबाजी करताना भारताला दणदणीत विजय मिळवून दिला. ही दोघं समोर आलेला प्रत्येक चेंडू सीमारेषेपार सहजतेनं टोलवंत होते. भारताला हा सामना ७.१ षटकांत जिंकायचा होता, परंतु त्यांनी त्यापेक्षा कमी षटकांतच बाजी मारून.

तीन फिरकीपटूंसह मैदानावर उतरण्याचा विराट कोहलीचा ( Virat Kohli) निर्णय योग्य ठरला. रवींद्र जडेजा ( Ravindra Jadeja)नं आज ट्वेंटी-२०तील त्याची सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी करताना स्कॉटलंडचे कंबरडे मोडले. त्याला अन्य गोलंदाजांची चांगली साथ मिळाली. मोहम्मद शमी ( Mohammed Shami) पुन्हा स्टार ठरला आणि त्यानं सलग तीन विकेट्स घेतल्या परंतु यापैकी एक रन आऊट असल्यानं ही टीमची हॅटट्रिक ठरली. जसप्रीत बुमराहनं दोन विकेट्स घेत ट्वेंटी-२०त भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेण्याचा पराक्रम केला.

जसप्रीत बुमराहनं ३.४ षटकांत १० धावा देत २ विकेट्स घेतल्या. रवींद्र जडेजा ( ३-१५) नं ट्वेंटी-२०तील वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी नोंदवली, तर मोहम्मद शमीनं ३ षटकांत १ निर्धाव षटक फेकताना १५ धावांत तीन विकेट्स घेतल्या. बुमराहनं ५४ सामन्यांत ६४ विकेट्स घेताना ट्वेंटी-२०त सर्वाधिक विकेट घेणाऱ्या भारतीय गोलंदाजाचा मान पटकावला. युझवेंद्र चहल ६३ विकेट्ससह आघाडीवर होता. आर अश्विननं २९ धावांत १ विकेट घेतली. स्कॉटलंडकडून जॉर्ज मुन्सी ( २४), मिचेल लिस्क ( २१) हे चांगले खेळले. स्कॉटलंडचा संपूर्ण संघ १७.४ षटकांत ८५ धावांवर माघारी परतला.

लोकेश राहुलनं हे गणित डोळ्यासमोर ठेऊन सुसाट खेळ केला. रोहित-राहुल जोडीनं चार षटकांत धावफलकावर अर्धशतकी धावा फडकवल्या. ट्वेंटी-२० क्रिकेटमधील टीम इंडियाची ही सर्वात जलद अर्धशतकी भागीदारी ठरली. रोहित १६ चेंडूंत ५ चौकार व १ षटकारासह ३० धावांवर बाद झाला. राहुलनं १८ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केलं. पण, पुढच्याच चेंडूवर तो बाद झाला.

राहुलनं १९ चेंडूंत ६ चौकार व ३ षटकार खेचून ५० धावा केल्या. ट्वेंटी-२०तील हे भारताकडून दुसरे जलद अर्धशतक ठरले. युवराज सिंगनं २००७मध्ये १२ चेंडूंत इंग्लंडविरुद्ध अर्धशतक झळकावले होते. २००९मध्ये गौतम गंभीरनं श्रीलंकेविरुद्ध १९ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केलं होतं. भारतानं हा सामना ८ विकेट्स व ८१ चेंडू राखून जिंकला. भारतानं ६.३ षटकांत २ बाद ८९ धावा केल्या.

भारतानं या सामन्यात विजय मिळवला असला तरी त्यांचे भवितव्य हे अफगाणिस्तानच्या हातात आहे. न्यूझीलंडनं ७ नोव्हेंबरला जर अफगाणिस्तानला पराभूत केलं, तर पाकिस्तान व किवी उपांत्य फेरीत जातील. पण, अफगाणिस्ताननं धक्कादायक निकाल नोंदवल्यास आणि भारतानं नामिबियाला पराभूत केल्यास तिन्ही संघांचे सहा गुण होतील आणि नेट रन रेटवर ग्रुप २ मधील दुसरा उपांत्य फेरीत जाणारा संघ ठरेल.

अफगाणिस्ताननं न्यूझीलंडला ५० पेक्षा कमी धावांत पराभूत केल्यास भारताला नामिबियाविरुद्ध ३७ पेक्षा अधिक धावांनी किंवा १५.५ षटकांत विजय मिळवायला हवा. जर अफगाणिस्ताननं २५पेक्षा कमी धावांत पराभूत केलं, तर भारताला नामिबियावर १४ धावांपेक्षा अधिक धावांनी किंवा १८ षटकांत विजय मिळवायला हवा.