Venkatesh Iyer : 'दादा'चा जबरा फॅन; गांगुलीला अपयश आल्यानं टीम इंडिया हरली अन् तापानं फणफणला होता वेंकटेश अय्यर

Venkatesh Iyer, Saurav Gangul : ऑस्ट्रेलियाविरोधातील सामन्यात पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर वेंकटेश अय्यरला बसला होता धक्का.

अष्टपैलू खेळाडू वेंकटेश अय्यर हा लहानपणापासून भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या फलंदाजीचा चाहता आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात गांगुलीला अधिक धावा करता आल्या नव्हत्या. त्यामुळे भारताला पराभवाला सामोरे जावे लागले होते, तेव्हा छोट्या वेंकटेशला जबर धक्का बसला होता आणि तो चक्क तापाने फणफणला होता.

भारतीय क्रिकेटबद्दलच्या आपल्या मुलाच्या आवडीचा किस्सा वेंकटेश अय्यरचे वडील राजशेखरन अय्यर यांनी शेअर केला. बुधवारी त्यांनी पीटीआयशी संवाद साधताना ही आठवण सांगितली.

२६ वर्षीय वेंकटेश अय्यरला न्यूझीलंडविरोधात होणाऱ्या टी २० मालिकेसाठी निवडण्यात आलं आहे. भारतीय संघ न्यूझीलंड विरोधात ३ टी २० सामने खेळणार आहे.

"माझा मुलगा सहा सात वर्षांचा असल्यापासूनच त्याला क्रिकेटप्रती खुप प्रेम होतं. तो लहान पणापासूनच सौरव गांगुलीचा मोठा फॅन होता. गांगुलीकडूनच प्रेरणा घेत त्यानं लेफ्ट हँड बॅटिंग सुरू केली," असं त्याचे वडील म्हणाले.

"वेंकटेश हा लहान असताना भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया हा सामना पाहत होता. या सामन्यात भारताचा पराभव झाला आणि त्याचा आवडता खेळाडू सौरव गांगुली हादेखील जास्त धावा करू शकला नव्हता. यामुळे तो त्याला खुप दु:ख झालं आणि तो तापानं फणफणला. त्यावेळी मला हे समजलं की तो क्रिकेटप्रती किती गंभीर आहे," असं राजशेखरन अय्यर म्हणाले.

त्याचं क्रिकेटप्रती असलेलं प्रेम पाहून त्याला प्रशिक्षण घेण्यासाठी चांगल्या क्लबमध्ये पाठवलं आणि चांगला खेळण्यासाठी प्रेरितही केलं. त्याच्या सुदैवानं त्याला प्रशिक्षकही चांगले मिळाले. पहिले तो इंदूरच्या महाराजा यशवंतराव क्रिकेट क्लबचे कोच दिनेश शर्मा आणि त्यानंतर मध्यप्रदेश क्रिकेट संघाचे प्रमुख कोच चंद्रकांत पंडित यांच्याकडे प्रशिक्षण घेतल्याचं ते म्हणाले.

क्रिकेटप्रती प्रेम असलं तरी त्यानं शिक्षणासोबत कधी दुजाभाव केला नाही. त्यानं कॉमर्स विषयातून आपलं पदवीचं शिक्षण पूर्ण केलं आहे. त्यापुढे तो चार्टर्ड अकाऊंटंच शिक्षण घेऊ इच्छित होता. परंतु क्रिकेटमध्ये व्यस्त असल्यानं त्याला ते पूर्ण करता आलं नाही. परंतु त्यानं आईच्या मार्गदर्शनाखाली वित्त विषयात एमबीए केल्याचं त्यांनी सांगितलं.

टी २० विश्वचषक सामन्यात भारताचा प्रवास संपल्यानंतर टीममध्ये स्वाभाविकच नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. अशात अय्यर आणि खान यांनी संधीचं सोनं करण्याचे प्रयत्न केले पाहिजे, असे ते म्हणाले.

ट्वेन्टी-२० वर्ल्डकपमधील भारतीय संघाचं आव्हान संपुष्टात आल्यानंतर आता टीम इंडिया द्वीपक्षीय मालिकेवर लक्ष केंद्रीत करत आहे. रोहित शर्मा याला भारतीय ट्वेन्टी-२० संघाचा कर्णधार घोषित करण्यात आलं आहे. तर संघाच्या उप-कर्णधारपदाची धुरा केएल राहुलकडे देण्यात आली आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी मंगळवारी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. भारतीय संघात युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. पण संभाव्य १६ जणांच्या यादीत तब्बल ५ सलामीवीर फलंदाजांना स्थान देण्यात आलं आहे. त्यामुळे संघ निवडीवर आत प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले आहेत.

या संघात रोहित शर्मा, केएल राहुल, ऋतुराज गायकवाड, इशान किशन, वेंकटेश अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, युजवेंद्र चहल, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, हर्षल पटेल, दीपक चाहर, भुवनेश्वर कुमार, आवेश खान यांना संघात स्थान देण्यात आलं आहे.

न्यूझीलंड विरुद्धच्या तीन ट्वेन्टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी भारताच्या १६ संभाव्य खेळाडूंची घोषणा करण्यात आली आहे. संघ निवडीनुसार विचार करायचा झाल्यास भारतीय संघात एकूण पाच सलामीवीरांना निवडण्यात आलं आहे.

तर मधळ्या फळीत फलंदाजी करणारे केवळ ३ खेळाडू निवडण्यात आले आहेत. ट्वेन्टी-२० सामन्यात मोक्याच्या क्षणी सामना खेचून आणण्यासाठी मधल्या फळीतील खेळाडूची कामगिरी अत्यंत महत्त्वाची असते. यासाठी भारतीय संघात आता फिनिशरची भूमिका कोण पार पडणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.