Ravi Shastri: कॉमेंट्री की IPL? ट्वेन्टी-२० वर्ल्डकपनंतर काय करणार रवी शास्त्री, ऑफर्सची रांग...

T20 World Cup 2021, Ravi Shastri: ट्वेन्टी-२० वर्ल्डकप स्पर्धेनंतर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आगामी काळात नेमकं कोणत्या भूमिकेत दिसणार याची चर्चा आता सुरू झाली आहे. त्यांना नेमकं कोणकोणत्या ऑफर्स आल्या आहेत ते जाणून घेऊयात...

ट्वेन्टी-२० वर्ल्डकप स्पर्धा संपताच भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपुष्टात येणार आहे. रवि शास्त्री यांच्या जागी आता भारतीय संघाचा माजी फलंदाज राहुल द्रविड याची संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती देखील करण्यात आली आहे.

शास्त्री यांचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर भविष्यात रवी शास्त्री कोणत्या भूमिकेत दिसणार याबाबतची चर्चा आता सुरू झाली आहे. रवी शास्त्री पुन्हा एकदा समालोचकाच्या भूमिकेत दिसण्याची दाट शक्यता आहे.

इतकंच नव्हे, तर आयपीएलमधील काही संघांनी रवी शास्त्री यांच्याकडे फ्रँचायझीच्या प्रशिक्षक पदासाठी देखील विचारणा केली गेल्याची माहिती समोर आली आहे.

क्रिकबझच्या माहितीनुसार आयपीएलच्या पुढील मोसमात अहमदाबादचा नवा संघ दाखल होणार आहे. या नव्या संघाच्या प्रशिक्षकपदासाठी रवी शास्त्री यांच्याशी संपर्क साधण्यात आला आहे. अहमदाबादची फ्रँचायझीला रवी शास्त्री यांना मुख्य प्रशिक्षक, भरत अरुण यांना गोलंदाजी आणि आर.श्रीधर यांना गोलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्याची इच्छा आहे.

वर्ल्डकपनंतरच रवी शास्त्री याबाबतची त्यांची भूमिका जाहीर करण्याची शक्यता आहे. दरम्यान, गेल्या दोन दशकांमध्ये रवी शास्त्री यांनी समालोचन क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यामुळे ते पुन्हा एकदा याच क्षेत्रात परतणार असल्याचंही बोललं जात आहे.

स्टार स्पोर्ट्स आणि सोनी स्पोर्ट्स वाहिन्यांनी रवी शास्त्री यांना समालोचक म्हणून विचारणा केली आहे. या दोन्ही वाहिन्यांकडून भारतातील बहुतांश क्रिकेट सामने प्रसारित केले जातात.

अर्थात रवी शास्त्री यांनी आयपीएलमधील संघाचं प्रशिक्षकपद स्वीकारलं तर त्यांना समालोचन करणं शक्य होणार नाही. सध्या व्हीव्हीएस लक्ष्मण आयपीएलमध्ये हैदराबादच्या संघाचं प्रशिक्षकपद सांभाळत आहेत आणि आयसीसी स्पर्धांमध्ये समालोचक म्हणूनही काम पाहात आहेत. याच पद्धतीनं रवी शास्त्री देखील दोन्ही भूमिकेत दिसू शकतात.

आयपीएलमध्ये अहमदाबादच्या संघाला सीव्हीसी ग्रूपनं ५६०० कोटी रुपयांची बोली लावून विकत घेतलं आहे. तर लखनऊच्या संघाला संजीव गोएंका यांनी ७ हजार कोटींहून अधिक बोली लावत खरेदी केलं आहे. आयपीएलच्या पुढील वर्षीच्या मोसमात एकूण १० संघ खेळणार आहेत.

दरम्यान, रवी शास्त्री यांना समालोचन क्षेत्रात दीर्घ अनुभव आहे. २००७ सालचा ट्वेन्टी-२० वर्ल्डकप, २०११ सालचा वनडे वर्ल्डकप भारतानं जिंकला होता आणि या काळात रवी शास्त्री यांनी समालोचन केलं आहे. २०१७ साली भारतीय संघाच्या प्रशिक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर समालोचन क्षेत्रापासून ते दूर आहेत.