Lisa Sthalekar:पुण्याच्या अनाथआश्रमात वाढलेली 'लैला' बनली ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाची कर्णधार

पुण्याच्या अनाथआश्रमात काही दिवस वाढलेली लिसा स्टालेकर पुढे जाऊन ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाची कर्णधार बनली.

ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाची माजी कर्णधार लिसा स्टालेकर जगभर प्रसिद्ध आहे. एक महान क्रिकेटपटू म्हणून क्रिकेट विश्वात तिची ख्याती आहे. फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल क्रिकेटर्सची (FICA) पहिली महिला अध्यक्षा म्हणून लिसाला ओळखले जाते. लिसा स्टालेकरचा आज म्हणजेच १३ ऑगस्ट रोजी वाढदिवस असून लिसाने ४४ व्या वर्षात पदार्पण केले आहे. जगभर आपल्या खेळीचा ठसा उमटवणाऱ्या लिसाच्या आयुष्याची कहाणी फारच संघर्षमय आहे.

लिसाचे भारतासोबत एक खास नाते आहे. लक्षणीय बाब म्हणजे तिचा जन्म देखील भारतातच झाला आहे. मात्र ती केवळ २१ दिवसांची असताना तिला अनाथआश्रमात सोडण्यात आले होते. पुण्यातील अनाथआश्रमात ती वाढली आणि तिथूनच तिच्या आयुष्याचा संघर्ष सुरू झाला. इथेच एका डॉक्टर जोडप्याने तिला दत्तक घेतले आणि लिसाचे आयुष्यच बदलून गेले.

लिसाला भारतीय वंशाचे डॉक्टर हॅरेन आणि त्यांची इंग्लिश पत्नी सू यांनी दत्तक घेतले होते. लिसाला अनाथआश्रमात लैला या नावाने ओळखले जात होते. सर्वप्रथम हे दोघेजण चिमुकल्या लैलाला घेऊन मिशिगन येथे राहायला लागले आणि तिथेच त्यांनी तिचे लिसा हे नाव ठेवले. काही कालावधीनंतर हे डॉक्टर दाम्पत्य ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे स्थायिक झाले.

विशेष म्हणजे लिसाचे आजही त्या अनाथआश्रमासोबत खास नाते आहे. ती भारतात आल्यावर इथे भेट देते. मागील वर्षीच लिसाने पुण्यातील या अनाथआश्रमाला भेट दिली होती, जिथे तिचे अतिशय भावनिक स्वागत करण्यात आले. तिने याचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर शेअर केला होता.

लिसाने क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये एकूण १८७ सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघाचे कर्णधारपद भूषवले आहे. तिची सर्वोत्तम कामगिरी एकदिवसीय क्रिकेटमध्ये राहिली आहे. तिने १२५ एकदिवसीय सामन्यांमध्ये २ शतके आणि १५ अर्धशतकी खेळींच्या जोरावर एकूण २,७२८ धावा केल्या आहेत. २०१३ साली विश्वचषक विजेती कर्णधार म्हणून लिसाने आपल्या क्रिकेट कारकिर्दिला निरोप दिला. मात्र लिसाच्या नेतृत्वामुळे ऑस्ट्रेलियन संघ जगातील सर्वोत्तम संघ बनला आहे. अलीकडेच ऑस्ट्रेलियाच्या महिलांनी राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला अंतिम फेरीत पराभूत करून सुवर्ण पदक जिंकले होते.