Preity Zinta Shikhar Dhawan, IPL 2022 PBKS vs CSK: पंजाबची 'प्रिटी वूमन' स्टेडियममध्ये परतली... प्रिती झिंटा अन् गालावरली खळी सोशल मीडियावर पुन्हा हिट

प्रिती झिंटाच्या हजेरीने चाहते सुखावले...

Preity Zinta smile Shikhar Dhawan, IPL 2022 PBKS vs CSK: पंजाब किंग्जचा अनुभवी सलामीवीर शिखर धवन याने ठोकलेल्या धडाकेबाज ८८ धावांच्या जोरावर संघाला २० षटकांत ४ बाद १८७ धावांपर्यंत मजल मारली.

चेन्नईचा कर्णधार जाडेजाने घेतलेला प्रथम गोलंदाजीचा निर्णय शिखर धवनने चुकीचा ठरवलाय त्याने CSKच्या गोलंदाजांची धुलाई करत ५५ चेंडूत ९ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने नाबाद ८८ धावा कुटल्या.

शिखर धवनची डोळ्याचे पारणे फेडणारी खेळी पाहण्यासाठी आज संघांच्या मालकीणबाई प्रिती झिंटानेही हजेरी लावली. सुमारे अर्धी स्पर्धा संपल्यानंतर, अखेर पंजाबच्या चाहत्यांची प्रिती झिंटाला स्टेडियममध्ये संघाला चीअर कराताना पाहण्याची इच्छा पूर्ण झाली.

प्रिती झिंटा आपल्या जुळ्या मुलांच्या जन्मानंतर त्यांच्या संगोपनात व्यस्त होती. त्यामुळे IPL Mega Auction साठीही ती गैरहजर राहिली. तसेच, पंजाबच्या पहिल्या सात सामन्यांतही ती नव्हती.

पण पंजाब किंग्जच्या आजच्या सामन्याला मात्र प्रितीने आवर्जुन हजेरी लावली. IPL सामन्यांना प्रिती पहिल्यापासूनच हजेरी लावते. त्यामुळे तिला स्टेडियममध्ये पाहण्याची चाहत्यांना जणू सवयच लागली होती.

ती सवय सुटते की काय असं वाटत असतानाच मालकीण बाईं पुन्हा संघाला चीअर करण्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थित राहिल्या. सोशल मीडियावरदेखील प्रिती झिंटाचीच चर्चा रंगल्याचे दिसून आले.

प्रिती झिंटाने स्टेडियममध्ये हजर राहून शिखर धवनच्या खेळीचं कौतुक केलं. पंजाबच्या फलंदाजांनी चौकार षटकार लगावताच ती उभी राहून टाळ्या वाजवून खेळाडूंचं कौतुक करताना दिसली.