एका सिनिअर खेळाडूनं जय शाह यांच्याकडे केली होती कोहलीची तक्रार, विराट करत होता 'ही' चूक!

Virat Kohli: कोहलीनं टी-२० वर्ल्डकपनंतर भारतीय संघाच्या कर्णधारपदावरुन पायऊतार होण्याची घोषणा केल्यानंतर बऱ्याच गोष्टी आता समोर येऊ लागल्या आहेत.

टी-२० वर्ल्डकपनंतर भारतीय टी-२० संघाच्या कर्णधारपदावरुन पायऊतार होणार असल्याची घोषणा केली आहे. त्यानंतर भारतीय संघाबाबत आता वेगवेगळ्या गोष्टी समोर येत आहेत. गेल्या काही दिवसांपासून भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुममधील वातावरण ठीक नव्हतं, अशी माहिती समोर आली आहे.

सुत्रांच्या माहितीनुसार मैदानातील सामन्यानंतर विराट कोहली संघातील सदस्यांना सहज उपलब्ध होत नव्हता. त्यामुळे खेळाडूंसोबतच्या संवादाचा अभाव निर्माण झाला होता.

खासकरुन न्यूझीलंडविरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमधील पराभवानंतर भारतीय संघातील वातावरण काही आलबेल नव्हतं. पराभवानंतर कोहलीच्या एकूणच स्वभावात संवादाचा अभाव निर्माण झाला होता. याची संघातील एका सिनिअर खेळाडूनंही गंभीर दखल घेतली होती.

संघातील एका सिनिअर खेळाडूनं याबाबत बीसीसीआयचे सचिव जय शाह यांच्याशीही चर्चा केली होती. सुत्रांच्या माहितीनुसार संघातील काही खेळाडू कोहलीच्या स्वभावावर नाखुश होते. कोहलीनं स्वत:वरील नियंत्रण गमावत असल्याचं खेळाडूंचं म्हणणं होतं.

कोहलीनं संघातील त्याचा मानसन्मान गमावला असून काही खेळाडूंना त्याचं वागणं पसंत नव्हतं. जेव्हा कोहलीशी काही संवाद साधायचा प्रश्न येतो तेव्हा हे खेळाडू स्वत:ला दूर ठेवण्याचा प्रयत्न करतात अशीही माहिती समोर आली आहे.

सुत्रांच्या माहितीनुसार, जेव्हा नेट्समध्ये फलंदाजीच्या सरावावेळी कोहलीला प्रशिक्षकांनी त्याच्या फलंदाजीबाबत काही सल्ले दिले असता कोहली त्यांच्यावर भडकला होता. याशिवाय कोहलीनं त्याच्या खराब फॉर्मचा मुद्दा खूपच गुंतागुंतीचा केला आहे.

कोहलीला गेल्या अनेक सामन्यांमध्ये एकही शतकी खेळी साकारता न आल्यानं त्याच्या वागण्यात बदल झाला आहे. त्याला प्रशिक्षकांनी काही सल्ले देण्याचा प्रयत्न केल्यावर त्यानं मला तुम्ही गोंधळात टाकू नका असा संताप प्रशिक्षकांवर व्यक्त केला होता.

कोहली त्याच्या रागावर नियंत्रण मिळविण्यात अपयशी ठरत असल्याची माहिती समोर येत आहे. गेल्या बऱ्याच काळापासूनचा खराब फॉर्ममुळे त्याच्या स्वभावातील आक्रमकपणा नियंत्रणाबाहेर गेला आहे अशीही त्याच्याबाबतची तक्रार करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

दरम्यान, कोहलीनं वर्ल्डकप स्पर्धेनंतर टी-२० प्रकारात भारतीय संघाचं नेतृत्त्व करणार नसल्याचं जाहीर करुन बीसीसीआयलाच धक्का दिला आहे. कोहलीच्या या निर्णयावर बीसीसीआय देखील नाराज असून कोहलीकडून आता एकदिवसीय संघाचं कर्णधारपद देखील काढून घेतलं जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.

Read in English