इंग्लंडच्या जिम लेकरने कसोटीत पहिल्यांदा टिपले होते डावात १० पैकी १० बळी, संपूर्ण सामन्यात घेतल्या होत्या १९ विकेट्स...

IND Vs NZ 2nd Test: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात मुंबईत सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीत न्यूझीलंडच्या Ajaz Patel ने डावात १० पैकी १० बळी टिपत इतिहास रचला आहे. त्याबरोबरच एजाज हा Jim Laker आणि Anil Kumble यांच्यानंतर तिसरा गोलंदाज ठरला आहे.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात मुंबईत सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीत न्यूझीलंडच्या एजाज पटेलने डावात १० पैकी १० बळी टिपत इतिहास रचला आहे. त्याबरोबरच एजाज हा जिम लेकर आणि अनिल कुंबळे यांच्यानंतर तिसरा गोलंदाज ठरला आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये एका डावात १० च्या १० विकेट टिपण्याचा पहिला मान इंग्लंडचे फिरकीपटू जिम लेकर यांनी मिळवला होता. त्यांनी १९५६ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीत एका डावात १० विकेट टिपण्याची किमया साधली होती. एवढेच नाही तर संपूर्ण कसोटीत तब्बल १९ बळी टिपत त्यांनी हा सामना इंग्लंडला जिंकून दिला होता.

एका कसोटीत १९ बळी टिपणारे जिम लेकर हे एकमेव गोलंदाज आहेत. त्यांचा हा विक्रम आतापर्यंत कुणालाही मोडता आला नाही. लेकर यांनी आपल्या कसोटी कारकिर्दीत १९३ तर प्रथमश्रेणी कारकिर्दीमध्ये १ हजार ९४४ बळी टिपले होते.

दरम्यान, लेकर यांच्यानंतर तब्बल ५२ वर्षांनी भारताच्या अनिल कुंबळेने त्यांच्या कसोटीतील एका डावात १० च्या १० बळी टिपण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली होती. अनिल कुंबळेने १९९९ मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या दिल्ली कसोटीत पाकिस्तानच्या दुसऱ्या डावात १० पैकी १० विकेट्स घेतल्या होत्या. त्याच्या या भेदक माऱ्याच्या जोरावर भारताने पाकिस्तानवर विजय मिळवला होता.

त्यानंतर आता मुंबई कसोटीत न्यूझीलंडच्या एजाज पटेलने भारताविरुद्ध १० पैकी १० बळी मिळवून या विक्रमाशी बरोबरी साधली. आता दुसऱ्या डावातही अशीच कामगिरी करून लेकर यांच्या विक्रमाशी बरोबरी करण्याची संधी त्याच्याकडे असेल.

तसेच कसोटीत एका डावामध्ये १० पैकी १० बळी घेणाऱ्या गोलंदाजांवर नजर टाकली तर एक खास योगायोग दिसून येतो. तो म्हणजे जिम लेकर, अनिल कुंबळे आणि एजाज पटेल हे तिघेही फिरकी गोलंदाज आहेत.