IPL 2022 Playoffs qualification scenario: गुजरात पात्र, मुंबई व चेन्नई अपात्र!; प्ले ऑफच्या तीन जागांसाठी ७ संघांमध्ये चुरस, जाणून घ्या गणित

IPL 2022 Playoffs qualification scenario: इंडियन प्रीमिअर लीग २०२२मध्ये प्ले ऑफचे पहिले तिकीट गुजरात टायटन्सने पटकावले... त्यात काल मुंबई इंडियन्सने विजय मिळवून चेन्नई सुपर किंग्सचे आव्हान संपुष्टात आणले. ५ वेळचे विजेते मुंबई आणि ४ वेळचे विजेते चेन्नई हे आयपीएल २०२२मधून बाद झाले आहेत. आता प्ले ऑफच्या उर्वरित ३ जागांसाठी ७ संघांमध्ये चुरस आहे.

लखनौ सुपर जायंट्स - लोकेश राहुलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या लखनौ सुपर जायंट्सला प्ले ऑफमधील स्थान पक्के करण्यासाठी केवळ एक विजय पुरेसा आहे. त्यांच्या खात्यात १२ सामन्यांत १६ गुण आहेत. या गुणांसहही ते प्ले ऑफमध्ये पात्र ठरू शकतात, परंतु त्यांना अन्य संघांच्या कामगिरीवर अवलंबून रहावे लागेल.

राजस्थान रॉयल्स - १४ गुणांसह राजस्थान रॉयल्सचा संघ सध्या तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांना दोन सामने खेळायचे आहेत आणि दोन्ही लढती जिंकून ते प्ले ऑफमधील स्थान एकदम पक्के करतील. १२ सामन्यांत त्यांनी ७ विजय मिळवले आहेत. एक विजय मिळवून १६ गुणांसहही त्यांना संधी आहे, पंरतु पुन्हा अन्य संघाच्या कामगिरीवर त्यांची मदार असेल.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - अव्वल चार संघांच्या शर्यतीत RCBही आघाडीवर आहे. त्यांच्या खात्यात १४ गुण आहेत आणि उर्वरित दोन सामन्यांतील विजय त्यांचे स्थान पक्के करेल. त्यांना एक विजयही पुरेसा आहे, पण पुन्हा गणित इतरांच्या कामगिरीवर अवलंबून राहते.

दिल्ली कॅपिटल्स - १२ सामन्यांत ६ विजय मिळवून १२ गुणांसह दिल्ली कॅपिटल्स पाचव्या क्रमांकावर आहेत. त्यांना १६ गुण कमावण्यासाठी उर्वरित दोन्ही लढती जिंकणे आवश्यक आहे. एक विजय मिळवल्यास त्यांचे भविष्य अन्य संघांच्या हाती जाईल.

सनरायझर्स हैदराबाद - सलग चार पराभवांमुळे सनरायझर्स हैदराबादने स्वतःचीच वाट अवघड केली आहे. ११ सामन्यांत ५ विजयांसह त्यांनी १० गुणांची कमाई केली आहे आणि त्यांना प्ले ऑफसाठी आता काही केल्यास उर्वरित तीनही सामने जिंकावे लागतील. आता एक पराभव अन् त्यांचे आव्हान संपुष्टात येईल

कोलकाता नाईट रायडर्स - १२ सामन्यांत ५ विजय मिळवून KKR १० गुणांसह ७व्या क्रमांकावर आहे. त्यांनी उर्वरित दोन्ही लढती जिंकल्या तरी त्यांचे गुण १४ होतील आणि अशा परिस्थितीत अन्य संघांची कामगिरी त्यांच्यासाठी मदतशीर ठरेल.

पंजाब किंग्स - ११ सामन्यांत ५ विजय व १० गुणांसह हा संघ अजूनही शर्यतीत आहे, परंतु त्यांचे चान्सेस फार कमी आहेत. उर्वरित तीन सामने जिंकण्याशिवाय त्यांच्यासमोर दुसरा पर्याय नाही.