Mumbai Indians : रोहित, जसप्रीत, हार्दिक, सूर्यकुमार, इशान शेवटचे एकत्र खेळले, यापुढे हे चित्र दिसणे अवघड; जाणून घ्या कारण

Mumbai Indians : पाच वेळा इंडियन प्रीमिअर लीगचे जेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्सला ( MI officially out of the IPL 2021) शुक्रवारी आयपीएल २०२१मधून गाशा गुंडाळावा लागला.

Mumbai Indians : पाच वेळा इंडियन प्रीमिअर लीगचे जेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्सला ( MI officially out of the IPL 2021) शुक्रवारी आयपीएल २०२१मधून गाशा गुंडाळावा लागला. मुंबई इंडियन्सनं अखेरच्या साखळी सामन्यात सनरायझर्स हैदराबादवर विजय मिळवला असला तरी त्यांचे प्ले ऑफचे स्वप्न भंगले.

मुंबई इंडियन्सच्या ९ बाद २३५ धावांच्या प्रत्युत्तरात हैदराबादनं ८ बाद १९३ धावा केल्या. पण, लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या SRHनं ६४ धावा करताच मुंबईचे प्ले ऑफचे स्वप्न भंगले. नेट रन रेटमुळे त्यांना पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले. या सामन्यात इशान किशन व सूर्यकुमार यादव यांची वादळी नेत्रदिपक ठरली आणि ती डोळ्यांत साठवून ठेवणारीच होती.

आजच्या सामन्यात इशान किशननं ३२ चेंडूंत ११ चौकार व ४ षटकारांसह ८४, तर सूर्यकुमार यादवनं ४० चेंडूंत १३ चौकार व ३ षटकारांसह ८२ धावा करताना मुंबईला ९ बाद २३५ धावांपर्यंत मजल मारून दिली. त्यानंतर जसप्रीत बुमराह, जिमी निशॅम व नॅथन कोल्टर नाइल यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेत मुंबईला ४२ धावांनी विजय मिळवून दिला.

मुंबई इंडियन्सचे आव्हान संपण्यासोबतच चाहत्यांसाठी एक वाईट बातमीही समोर आली आहे. रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, इशान किशन, सूर्यकुमार यादव हे खेळाडू म्हणजे MI चे आन बान शान... पण, आज ही सर्व मुंबई इंडियन्ससाठी शेवटचे एकत्र खेळले.

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2022 ) पुढील पर्वात दोन नव्या संघांचा समावेश केला जाणार आहे आणि त्याची घोषणा येत्या २५ ऑक्टोबरला केली जाईल. त्यानंतर डिसेंबरमध्ये मेगा ऑक्शन केले जाणार आहे. आयपीएलमध्ये दोन नव्या फ्रँचायझी, खेळाडूंचे रिटेंशन, मेगा ऑक्शन, फ्रँचायझीच्या सॅलरी पर्समध्ये वाढ आणि मीडिया राईट्स याबाबत बीसीसीआयनं काही निर्णय घेतले आहेत.

मेगा ऑक्शनपूर्वी प्रत्येक फ्रँचायझीला फक्त चार खेळाडूंना संघात कायम राखता येईल. या चारपैकी तीन खेळाडू भारतीय असतील व एक परदेशी किंवा दोन भारतीय व दोन परदेशी असे असू शकतील. त्यामुळे आता आयपीएल २०२२त सर्वच संघांमध्ये मोठे बदल पाहायला मिळतील.

बीसीसीआयच्या प्लेअर रिटेशन नियमानुसार प्रत्येक संघाला चार प्रमुख खेळाडूंनाच कायम राखता येईल. त्यानुसार जर फक्त मुंबई इंडियन्सचाच विचार केल्यास रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, किरॉन पोलार्ड व क्विंटन डी कॉक किंवा रोहित, जसप्रीत, हार्दिक पांड्या व किरॉन असे चार खेळाडूच रिटेन केले जाऊ शकतात.