Quinton de Kock KL Rahul IPL 2022 LSG vs KKR Live Update : क्विंटन डी कॉक- लोकेश राहुल नाबाद २१०; आयपीएलमध्ये इतिहास घडला; LSGच्या ओपनर्सनी मोडले विक्रम

IPL 2022 Lucknow Super Giants vs Kolkata Knight Riders Live Update : लोकेश राहुल ( KL Rahul ) व क्विंटन डी कॉक ( Quinton de Kock) या जोडीने KKR विरुद्ध मोठ्या विक्रमाला गवसणी घातली.

IPL 2022 Lucknow Super Giants vs Kolkata Knight Riders Live Update :लोकेश राहुल ( KL Rahul ) व क्विंटन डी कॉक ( Quinton de Kock) या जोडीने KKR विरुद्ध मोठ्या विक्रमाला गवसणी घातली. या दोघांमुळे LSG ने एकही विकेट न गमावता २० षटकांत २१० धावांचा डोंगर उभा केला. आयपीएलच्या इतिहासात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने एकही विकेट न गमावण्याची ही पहिलीच वेळ ठरली.

लखनौ सुपर जायंट्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा घेतला निर्णय. तिसऱ्या षटकात पदार्पणवीर अभिजित तोमरने १२ धावांवर खेळत असलेल्या क्विंटन डी कॉकचा झेल टाकला. त्याचा फटका त्यांना बसला. लोकेशने यंदाच्या पर्वातही ५०० धावांचा टप्पा ओलांडला. आयपीएलमध्ये सलग पाचव्या पर्वात ५००+ धावा करणारा तो भारताचा पहिलाच फलंदाज ठरला आहे.

क्विंटननं ३६ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक ४९ वेळा ५०+ धावा करण्याचा विक्रम क्विंटनने नावावर केला. त्याने पाकिस्तानच्या कामरान अकमलचा ( ४८ ) विक्रम मोडला. त्यापाठोपाठ लोकेशनेही ४१ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. आयपीएलच्या ९९ डावांत लोकेशने ३० अर्धशतकं व ४ शतकं झळकावली आहेत.

क्विंटनने ५९ चेंडूंत आयपीएलमधील दुसरे शतक पूर्ण केले. त्यात ६ चौकार व ७ षटकारांचा समावेश होता. या दोघांनी २०० धावांची भागीदारी करताना इतिहास रचला. आयपीएलच्या इतिहासातील ही सलामीवीरांची सर्वोत्तम भागीदारी ठरली. त्यांनी जॉनी बेअरस्टो व डेव्हिड वॉर्नर यांचा १८५ धावांचा विक्रम मोडला.

संपूर्ण २० षटके खेळून त्यांनी विक्रमांची नोंद केली. क्विंटन ७० चेंडूंत १० चौकार व १० षटकारांसह १४० धावांवर, तर लोकेश ५१ चेंडूत ६८ धावांवर नाबाद राहिला. लखनौने २१० धावा केल्या. आयपीएलमध्ये प्रथम फलंदाजी करताना एकही विकेट न गेल्याची ही पहिलीच वेळ ठरली.

क्विंटन डी कॉकची नाबाद १४० धावांची खेळी ही आयपीएलमधील तिसरी सर्वोत्तम वैयक्तिक खेळी ठरली. ख्रिस गेलने २०१३मध्ये नाबाद १७५ धावा केल्या होता आणि त्याआधी २००८मध्ये ब्रेंडन मॅक्युलमने नाबाद १५८ धावांची खेळी केली होती. क्विंटन या क्रमात तिसरा आला.

आयपीएल २०२२मधील हे सहावे शतक ठरले. जोस बटलरने तीन व लोकेश राहुलने दोन शतकं झळकावली आहेत. आयपीएलच्या इतिहासातील नाबाद २१० ही तिसरी सर्वोत्तम भागीदारी ठरली. या विक्रमात एबी डिव्हिलियर्स व विराट कोहली ( २२९ वि. गुजरात लायन्स, २०१६) आणि विराट कोहली व एबी डिव्हिलियर्स (२१५* वि. मुंबई इंडियन्स, २०१५) हे आघाडीवर आहेत.