मोबाइल टॉर्चच्या प्रकाशात सराव, द्विशतक ठोकूनही संधी नाही; मग रोहित शर्मामुळे पालटलं नशीब!

मुंबई इंडियन्स संघाची यंदा निराशाजनक कामगिरी पाहायला मिळाली असली तरी युवा खेळाडूंना संधी देण्यात मुंबईनं सर्वांचं मन जिंकलं आहे.

आयपीएलचं तब्बल पाचवेळा जेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाची कामगिरी यंदाच्या सीझनमध्ये खूप निराशाजनक राहिली आहे. पण असं असलं तरी युवा खेळाडूंना संधी देण्यात मुंबई इंडियन्स संघानं सर्वांचं मन जिंकलं आहे.

मुंबईच्या संघाला यंदा हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या, क्विंटन डी कॉक यांसारख्या दिग्गज खेळाडूंच्या अनुपस्थितीत सलग आठ सामन्यांत पराभवाला सामोरं जावं लागलं. यंदा मुंबईनं अनेक युवा खेळाडूंना संधी दिली. यात तिलक वर्मा, कार्तिकेय सिंह आणि दिल्लीच्या हृतिक शौकिन यांचा समावेश आहे.

दिल्लीचा हृतिक शौकिन आता लीग राऊंड संपुष्टात येईपर्यंत मुंबई इंडियन्सचा महत्वाचा खेळाडू बनला आहे. २१ वर्षीय हृतिक शौकिनचा जन्म दिल्लीला झाला आहे. तो एक उत्तम फिरकीपटू आहे. मुंबईनं यंदा लीगच्या ३३ व्या सामन्यात चेन्नई विरुद्धच्या सामन्यात हृतिकला संधी दिली.

हृतिकनं याच सामन्यात २५ धावा केल्या आणि चांगली गोलंदाजी देखील केली. हृतिकनं ४ षटकांमध्ये २३ धावा दिल्या. हृतिकच्या आजवरच्या यशात त्याच्या वडिलांचं फार मोठं योगदान राहिलं आहे. हृतिकचं लहानपणापासूनच अभ्यासात मन रमत नव्हतं. त्यामुळे वडिलांना त्याला क्रिकेट अकादमी टाकण्याचा निर्णय घेतला होता.

हृतिक आपल्या क्रिकेट करिअरबाबत इतका गंभीर होता की तो कुटुंबाच्या कोणत्याही कार्यक्रमात, लग्न समारंभात देखील जात नव्हता. दिवसरात्र तो आपल्या वडिलांसोबत क्रिकेट अकादमीत प्रशिक्षणाला जात असे.

क्रिकेटच्या ग्राऊंडमध्ये खेळपट्टीवर मोबाइल टॉर्च हृतिकचे वडील लावून ठेवायचे आणि याच प्रकाशात अचूक टप्प्यात गोलंदाजी करण्याचा तासनतास सराव करायचा. हृतिकचा आजवरचा प्रवास नक्कीच सोपा नव्हता.

हृतिकचं आजवर अनेकदा ग्रूप टीममध्ये सिलेक्शन झालं होतं. पण त्याला कधीच खेळण्याची संधी मिळायची नाही. एकदा तर क्लब क्रिकेटमध्ये हृतिकनं २६३ धावांची तुफान खेळी साकारली होती. त्यानंतर त्याचं अंडर १६ संघात निवड झाली होती. पण तिथंही खेळण्याची संधी त्याला मिळाली नाही.

भारताच्या अंडर-१९ संघात सहभागी होण्याची संधी हृतिकला मिळाली आणि द.आफ्रिकेचा दौरा त्यानं केला होता. तत्कालीन प्रशिक्षक राहुल द्रविडनं हृतिकच्या कामगिरीनं प्रभावित होऊन त्याला बांगलादेश विरुद्धच्या एका सामन्यात खेळण्याची संधी दिली. या सामन्यात हृतिकनं लक्षवेधी कामगिरी केली. पण त्यानंतरही पुढील सामन्यांमध्ये तो अंतिम ११ खेळाडूंमध्ये स्थान प्राप्त करू शकला नाही.

सैय्यद मुश्ताक अली आणि विज हजारे करंडक स्पर्धेच्या ट्रायल्समध्येही शानदार कामगिरीकरुनही हृतिक शौकिन अपेक्षित संधी मिळत नव्हती. अखेर मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मानं त्याच्यावर विश्वास दाखवून संघात संधी दिली. हृतिक शौकिनला यामुळे आयपीएलच्या व्यासपीठावर आपलं कौशल्या दाखवण्याची नामी संधी मिळाली.