Why Virat Kohli was Sacked?: विराट कोहलीकडून वन डे संघाचे कर्णधारपद का काढून घेतले गेले?; जाणून घ्या Inside Story

Why Virat Kohli was Sacked?: विराट कोहलीला दिलेली ४८ तासांची मुदत संपताच बीसीसीआयनं टीम इंडियाच्या वन डे संघाचे नेतृत्व रोहित शर्माकडे सोपवण्याची घोषणा केली.

विराट कोहलीला दिलेली ४८ तासांची मुदत संपताच बीसीसीआयनं टीम इंडियाच्या वन डे संघाचे नेतृत्व रोहित शर्माकडे सोपवण्याची घोषणा केली. बीसीसीआय अधिकारी आणि निवड समिती प्रमुख चेतन शर्मा यांनी विराट कोहलीला वन डे कर्णधारपद सोडण्यास सांगितले होते, परंतु विराटकडून त्यावर काहीच रिप्लाय आला नाही. त्यामुळे त्याला कर्णधारपदावरून हटवले गेले. पण, खरंच असे घडले का?

विराट हा भारताचा वन डे संघातील सर्वात यशस्वी कर्णधार आहे. त्याच्या नावावर आयसीसी स्पर्धेचे जेतेपद नसले तरी दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया येथे वन डे मालिका जिंकण्याचा इतिहास विराटच्याच नेतृत्वाखाली घडवला गेलाय. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं 95 वन डे सामन्यांत 65 विजय मिळवले आहेत, तर 27 पराभव पत्करले आहेत. त्यानं कर्णधार म्हणून 72.65च्या सरासरीनं 5449 धावाही केल्या आहेत.

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेला काही दिवस शिल्लक असताना विराट कोहलीनं ट्वेंटी-२० संघाचे नेतृत्व सोडण्याचा निर्णय जाहीर केला. पण, त्यावेळी त्यानं वन डे व कसोटी संघाचे नेतृत्व करण्याची इच्छा कायम असल्याचेही स्पष्ट केले होते. त्याला २०२३च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियाचे नेतृत्व सांभाळायचे होते. पण, दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी विराटकडून ही जबाबदारी काढून रोहित शर्माकडे सोपवली गेली.

''ट्वेंटी-२० व वन डे संघाला वेगवेगळे कर्णधार नको हवे होते. नेतृत्वात सातत्य आणि विचार प्रक्रिया यात सातत्य राखायला हवं, असे बीसीसीआयला नेहमी वाटते. प्रत्येकानं पाहिलंय की मोठ्या स्पर्धांमध्ये आम्हाला अपयश आलंय आणि ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील कामगिरीनंतर हा वादच संपला. रोहित शर्मानं मर्यादित षटकाच्या संघाचं नेतृत्व सांभाळावं अशी निवड समितीचीही इच्छा होती. त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया आयसीसी स्पर्धेत यश मिळवेल, असा विश्वास त्यांना वाटतोय,''अशी माहिती बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानं InsideSport शी बोलताना दिली.

भारतीय क्रिकेटचं हित लक्षात घेऊनच हा निर्णय घेतला गेलाय, असेही बीसीसीआयनं स्पष्ट केलं.

'' विराट कोहलीवर बीसीसीआय नाराज होते, हे स्पष्ट आहे. त्यामुळे त्याची हकालपट्टी झालीय, हे स्पष्ट आहे. जर तसं नसेल मग रोहित शर्माला वन डे कर्णधार बनवण्याची गरजच काय. बीसीसीआय आणि कोहली यांच्यात आलबेल नाही,''असे मत भारताच्या कसोटी क्रिकेटपटूनं व्यक्त केलं.