Ind Vs Nz Test Series: अजेय! किवींविरुद्ध भारताचा ६६ वर्षांचा रेकॉर्ड; मायदेशात एकही टेस्ट सीरिज हरली नाही, टीम ‘अजिंक्य’ राहणार?

Ind Vs Nz Test Series: किवींविरुद्धचा रेकॉर्ड कायम राहतो की, टीम इंडियाची विजयी परंपरा खंडीत होते, याकडे आता लक्ष लागले आहे.

अलीकडेच झालेल्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचे प्रदर्शन चांगले राहिले नाही. त्यामुळेच साखळी फेरीतच टीम इंडियाला विश्वचषक स्पर्धेतून बाद व्हावे लागले होते.

मात्र, त्या हाराकिरीचा बदला टीम इंडियाने न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या टी-२० मालिकेत घेतला. भारत दौऱ्यावर आलेल्या न्यूझीलंडला व्हाइट व्हॉश देत यजमान टीम इंडियाने तीन सामन्यांची टी-२० मालिका ३-० ने खिशात घातली.

न्यूझीलंडला टी-२० सामन्यांच्या मालिकेत धोबीपछाड दिल्यानंतर आता टीम इंडिया आपला ६६ वर्षांची रेकॉर्ड ब्रेक कामगिरी कायम ठेवते का, याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

टीम इंडिया न्यूझीलंडविरुद्ध टेस्ट सीरिज खेळणार आहे. दोन टेस्ट मॅचच्या सीरिजची सुरुवात २५ नोव्हेंबरपासून कानपूर येथे होणार आहे. गेल्या काही वर्षातील टीम इंडियाच्या कामगिरीवर नजर टाकली, तर न्यूझीलंडविरुद्ध मायदेशात भारतीय संघ एकदाही टेस्ट सीरिज पराभूत झालेला नाही आणि हा रेकॉर्ड गेल्या ६६ वर्षांपासून कायम आहे.

सन १९५५-५६ ते २०२१ या कालावधीचा विचार केल्यास आतापर्यंत न्यूझीलंड आणि भारत यांच्यात २२ टेस्ट सीरिज खेळवण्यात आल्या आहेत. पैकी ११ भारताने जिंकल्या असून, ७ सीरिजमध्ये न्यूझीलंडला यश मिळाले आहे. ४ सीरिज ड्रॉ म्हणजेच अनिर्णित राहिल्या आहेत.

भारतात खेळवण्यात आलेल्या टेस्ट सीरिजबाबत बोलायचे झाले, तर एकदाही भारतीय संघ न्यूझीलंडकडून टेस्ट सीरिज हरलेला नाही. भारतात आतापर्यंत टीम इंडिया आणि न्यूझीलंड संघात ११ टेस्ट सीरिज खेळवण्यात आल्या. यापैकी ९ टेस्ट सीरिजवर भारताने निर्विवाद वर्चस्व मिळवले. तर २ टेस्ट सीरिज ड्रॉ म्हणजेच अनिर्णित राहिल्या.

विशेष आणि मजेशीर बाब म्हणजे न्यूझीलंडविरुद्ध खेळवण्यात आलेल्या मागील तीनही सीरिज टीम इंडियाने जिंकल्या आहेत. ओव्हरऑल आढावा घेतल्यास टीम इंडियाने न्यूझीलंडविरुद्ध ६० कसोटी सामने खेळले आहेत.

या एकूण कसोटी सामन्यांपैकी २१ सामने टीम इंडियाने तर १३ सामने न्यूझीलंडने जिंकले आहेत. तर तब्बल २६ सामने अनिर्णित राहिले आहेत.

तसेच न्यूझीलंडने भारतात येऊन आतापर्यंत म्हणजेच १९५५ ते २०२१ या कालावधीत ३४ कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये केवळ २ कसोटी सामने न्यूझीलंड संघाने जिंकलेत आणि भारताने १६ सामने जिंकले. तर, १६ सामने अनिर्णित म्हणजेच ड्रॉ राहिले. इतिहासाची पुनरावृत्ती होते की, विजयाची परंपरा खंडीत होते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.