Ind Vs NZ: रोहित शर्मा, विराट कोहलीच्या अनुपस्थितीत कशी असेल पहिल्या कसोटीत बॅटिंग ऑर्डर; गौतम गंभीरनं केली भविष्यवाणी

Ind Vs NZ: २५ नोव्हेंबरपासून कानपूरमध्ये पहिल्या कसोटी सामन्याला सुरूवात होणार आहे. या सामन्यात रोहित शर्मा आणि विराट कोहली खेळताना दिसणार नाहीत.

IND vs NZ Test Series: भारत विरुद्ध न्यूझीलंड कसोटी सामन्याला (India Vs New Zealand Test Cricket) २३ नोव्हेंबरपासून सुरूवात होणार आहे. कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाच्या कर्णधारपदाची धुरा अजिंक्य रहाणेकडे सोपवण्यात आली आहे. या सामन्यात रोहित शर्मा आणि विराट कोहली मात्र खेळताना दिसणार नाहीत.

दरम्यान, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या अनुपस्थितीत टीम इंडियाची बॅटिंग ऑर्डर कशी असेल याबाबत सध्या मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. दरम्यान, रोहित शर्माच्या जागी कोणत्या खेळाडूनं सुरूवात करावी आणि चौथ्या क्रमांकावर कोणत्या खेळाडूनं उतरावं याबाबत गौतम गंभीरनं आपलं मत व्यक्त केलं आहे.

बॅटिंग ऑर्डर कशी असावी यावर भारताचा माजी गोलंदाज इरफान पठाण यानंदेखील आपलं मत व्यक्त केलं आहे. "अजिंक्य रहाणेच्या कामगिरीवर नजर ठेवायला हली. गेल्या काही सामन्यांमध्ये त्याची कामगिरी निराशाजनक होती. गेलं वर्ष त्याच्यासाठी चांगलं नव्हतं. अशात केवळ न्यूझीलंडसोबतच नाही तर दक्षिण आफ्रिकेसोबतही मीडल ऑर्डरमध्ये कोण फलंदाजी करेल हे पाहावं लागेल," असं तो म्हणाला.

"जर तुम्हाला असं वाटतं की शुभमन गिल तो खेळाडू आहे, तर त्याला मीडल ऑर्डरमध्ये फलंदाजीसाठी पाठवलं पाहिजे. यात तो कशी कामगिरी करतो हे पाहिलं पाहिजे," असंही इरफान म्हणाला. यावेळी गौतम गंभीरनं हनुमा विहारीला संधी न दिल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं.

रोहितच्या जागी मयंक अग्रवाल किंवा केएल राहुल सोबत भारतीय संघानं सुरूवात केली पाहिजे. राहुलनं इंग्लंडविरोधातही सुरूवात केली होती. याशिवाय शुभमन गिलला चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना पाहायला आवडेल, असं गंभीरनं स्टार स्पोर्ट्सच्या क्रिकेट लाईव्ह शोदरम्यान सांगितलं.

भारतीय संघ आता न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी सज्ज होत आहे. दोन सामन्यांच्या या मालिकेतील पहिल्या लढतीसाठी स्टार खेळाडूंना विश्रांती देण्यात आली असून मुंबईकर अजिंक्य रहाणे याच्याकडे भारताचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. चेतेश्वर पुजारा उपकर्णधार म्हणून रहाणेला साथ देईल. नियमित कर्णधार विराट कोहली मुंबईत होणाऱ्या दुसऱ्या कसोटीत संघाचे नेतृत्व करेल.

केवळ कोहलीच नाही, तर हिटमॅन रोहित शर्मा, यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह व मोहम्मद शमी यांनाही बीसीसीआयने विश्रांती दिली आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी सांगितले की, ‘विराट कोहली दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी संघासोबत जुळेल आणि संघाचे नेतृत्व करेल.’ मुंबईचा भरवशाचा फलंदाज श्रेयस अय्यर याच्यासह फिरकीपटू जयंत यादवने भारतीय कसोटी संघात पुनरागमन केलं आहे.

यष्टीरक्षक हनुमा विहारी याला भारतीय कसोटी संघातील स्थान गमवावे लागले आहे. त्याचा समावेश डिसेंबरच्या अखेरीस दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणाऱ्या भारत अ संघात करण्यात आला आहे. या मालिकेत छाप पाडून पुन्हा एकदा भारताच्या राष्ट्रीय संघात स्थान मिळवण्याची संधी विहारीकडे असेल.

याबाबत बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, ‘आम्ही विहारीला भारत अ संघातून दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर पाठवीत आहोत. तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत त्याच्या कामगिरीवर आमची नजर असेल.’

मुंबईकर श्रेयस अय्यरला आणखी एक संधी मिळाली असून अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीत मधल्या फळीला मजबूती देण्याची मोठी जबाबदारी त्याच्यावर असेल. त्याचप्रमाणे, डावातील दुसऱ्या नव्या चेंडूवर प्रतिआक्रमण करत संघावरील दडपण कमी करण्याची आणखी जबाबदारी त्याच्यावर असेल.

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघातून एकाचवेळी लोकेश राहुल, मयांक अग्रवाल आणि शुभमन गिल हे तीन सलामीवीर खेळतील. या तिघांनाही आपल्या कारकिर्दीत कसोटी सामन्यात किंवा प्रथम श्रेणी लढतीत कधीना कधी मधल्या फळीत फलंदाजी करण्याचा अनुभव आहे. त्यामुळे तिघांची उपस्थिती भारतीय फलंदाजीला बळकटी देईल.

अजिंक्य रहाणे (कर्णधार), चेतेश्वर पुजारा (उपकर्णधार), लोकेश राहुल, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, रिद्धिमान साहा (यष्टीरक्षक), के. एस. भरत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, जयंत यादव, इशांत शर्मा, उमेश यादव, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यांची पहिल्या कसोटीसाठी निवड करण्यात आली आहे.