Virat Kohli : 'यापूर्वीही सांगितलंय, आताही सांगतोय विराट टेस्टमधील...' माजी क्रिकेटपटूचं मोठं विधान

Ind Vs NZ Virat Kohli : भारतीय संघानं मुंबईत खेळवल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडचा ३७२ धावांनी केला पराभव.

न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत भारतीय संघाने ३७२ धावांनी विजय मिळवत मालिकेवर १-० ने कब्जा केला. भारताने दिलेल्या ५४० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ अवघ्या १६७ धावांत गारद झाला. न्यूझीलंडवर मिळवलेला हा विजय हा विराट कोहलीचा कर्णधार म्हणून ५० वा कसोटी विजय ठरला.

त्याबरोबरच कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० अशा क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये ५० हून अधिक विजय मिळवणारा विराट कोहली हा जगातील पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. सचिन तेंडुलकर, एम.एस. धोनी आणि रिकी पाँटिंग अशा दिग्गज खेळाडूंनाही अशी कामगिरी करता आलेली नाही.

विराट कोहलीचा विचार केल्यास त्याने कसोटीमध्ये ५०, एकदिवसीय क्रिकेटमध्ये १५३ आणि टी-२० मध्ये ५९ सामने जिंकले आहेत. त्यामुळे क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये विराटने बोलबाला प्रस्थापित केला आहे.

मुंबईतील कसोटी सामन्यात विराट कोहलीच्या बॅटचा जलवा दिसला नाही. परंतु कर्णधार म्हणून त्याचे निर्णय संघाच्या कामी आले. यानंतर भारतीय संघाचा माजी जलदगती गोलंदाज इरफान पठाण यानं कोहलीचं कौतुक केलं आहे. विराट कोहली हा सर्वोत्कृष्ठ कर्णधार असल्याचं त्यानं सांगितलं.

"जसं मी यापूर्वीही सांगितलं आणि आताही सांगतोय विराट कोहली भारताचा आतापर्यंत सर्वोत्कृष्ठ कसोटी कर्णधार आहे. तो ५९.९० टक्के विजयांसह टॉपवर आहे आणि दुसऱ्या स्थानावर असलेल्या कर्णधाराचा विजयी टक्का ४५ इतका आहे," असं इरफान म्हणाला. त्यानं यासंदर्भात एक ट्वीट केलं आहे.

भारताकडून सचिन तेंडुलकरने सर्वाधिक कसोटी सामने जिंकण्याचा विक्रम केला आहे. सचिनने कसोटीमध्ये ७२ विजयांची नोंद केली आहे. तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये २३४ विजय मिळवले आहेत. मात्र टी-२० मध्ये सचिनला केवळ एका सामन्यात विजय मिळवता आला आहे.

तर महेंद्र सिंग धोनीने कसोटीत ३६, एकदिवसीय क्रिकेटमध्ये २०५ आणि टी-२० मध्ये ५७ विजय मिळवले आहेत. म्हणजेच धोनीला कसोटीमध्ये ५० विजय मिळवता आले नव्हते. धोनी कर्णधारपदावरून बाजूला झाल्यानंतर विराटने भारतीय संघाचे नेतृत्व सांभाळले होते.

दरम्यान, टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांचा विचार केल्यास पाकिस्तानच्या शोएब मलिकच्या नावावर सर्वाधिक विजयांची नोंद आहे. मलिकने सर्वाधिक ८६ टी-२० सामने जिंकले आहेत. तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने १५६ सामने जिंकले आहेत. तर कसोटीमध्ये १३ विजय मिळवले आहेत.

रोहित शर्माचा विचार केल्यास त्याने टी-२० मध्ये ७८, एकदिवसीय क्रिकेटमध्ये १३८ आणि कसोटी क्रिकेटमध्ये केवळ २४ सामने जिंकले आहेत. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांचा विचार केल्यास विराट कोहली या सर्वांना वरचढ दिसून येत आहे.

भारतानं या विजयासह WTCमध्ये १२ गुण कमावले. त्यांच्या खात्यात एकूण ३ विजय, १ पराभव व २ ड्रॉ अशा निकालांसह ४२ गुण जमा झाले आहेत. भारतीय संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे. श्रीलंका व पाकिस्तान यांच्या खात्यात प्रत्येकी २४ गुण असले तरी त्यांची विजयाची टक्केवारी भारतापेक्षा वरचढ आहे. भारतानं कानपूर कसोटी जिंकली असती तर ते या क्रमवारीत पुढे गेले असते.