IND vs NZ: सूर्यकुमार यादव की श्रेयस अय्यर, अजिंक्य रहाणेनं सांगितलं कोण करणार पहिल्या कसोटीत डेब्यू

IND vs NZ Test Series: टी २० मालिकेत न्यूझीलंडचा सुपडा साफ केल्यानंतर आता टीम इंडिया कसोटी मालिकाही जिंकण्याच्या जिद्दीनं मैदानात उतरणार आहे.

टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेत न्यूझीलंडचा पराभव केल्यानंतर आता अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया कसोटी मालिका आपल्या खिशात टाकण्याच्या जिद्दीनं मैदानात उतरणार आहे. विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि ऋषभ पंत या स्टार खेळाडूंच्या अनुपस्थितीतही संघ खूप मजबूत दिसत आहे.

हा सामना कानपूरच्या ऐतिहासिक ग्रीनपार्क स्टेडियमवर खेळवला जाईल. सामना सुरू होण्याच्या एक दिवस आधी कर्णधार अजिंक्य रहाणेने श्रेयर अय्यर हा कसोटी सामन्यात पदार्पण करणार असल्याची पुष्टी केली. यासह श्रेयस अय्यर हा टेस्ट कॅप मिळवणारा भारताचा ३०३ वा खेळाडू ठरणार आहे.

भविष्यातील टीमकडे पाहता श्रेयस अय्यरची निवड करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. पदार्पणाच्या सामन्यात आपल्या दमदार कामगिरीतून श्रेयर अय्यरला मीडल ऑर्डरमध्ये आपली जागा पक्की करण्याची चांगली संधी आहे.

जर नेट प्रॅक्टिसकडे पाहिलं तर शुभमन गिल आणि मयंक अग्रवाल भारतीय फलंदाजीची सुरूवात करू शकतात. यानंतर पुजारा आणि रहाणे फलंदाजीसाठी उतरण्याची शक्यता आहे. यानंतर श्रेयस अय्यर हा सरावासाठी उतरला होता.

२५ नोव्हेंबरपासून कानपूरमध्ये दोन्ही संघांमध्ये कसोटी सामना रंगेल. ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा भाग असेल. त्यामुळे दोन्ही संघ कसोटी मालिका जिंकण्यासाठी सर्वस्व पणाला लावतील. पहिल्यावहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम स्पर्धेत न्यूझीलंडनंच भारताचा पराभव करत जेतेपद पटकावलं होतं.

कानपूरच्या पहिल्या कसोटीआधी न्यूझीलंडचे प्रशिक्षक गॅरी स्टिड यांनी संघाची रणनीती सांगितली. भारताला त्यांच्याच जाळ्यात फसवण्याची योजना किवींनी आखली आहे.

न्यूझीलंडचा संघ पहिल्या कसोटीत तीन फिरकीपटूंसह मैदानावर उतरणार असल्याचे संकेत स्टिड यांनी दिले. भारतात येऊन विजयी होणं सोपं नाही. इथे चार वेगवान गोलंदाज, एक फिरकीपटू घेऊन उतरता येणार नाही, असं स्टिड म्हणाले.

भारतातील खेळपट्ट्या फिरकीपटूंना मदत करतात. त्यामुळेच परदेशी संघांना भारतात विजय मिळवणं अवघड जातं. मात्र न्यूझीलंडचा संघ तीन फिरकीपटूंसोबत मैदानात उतरल्यास फायदा होऊ शकतो. तुम्ही आम्हाला तीन फिरकीपटूंसोबत खेळताना पाहू शकता. मात्र याचा निर्णय खेळपट्टी पाहूनच घेतला जाऊ शकतो. परिस्थिती पाहून आम्हाला रणनीती बदलावी लागेल, असं स्टिड यांनी सांगितलं.