IND vs NZ, 2nd Test : युवा खेळाडूंच्या दमदार कामगिरीमुळे आम्हाला पर्याय मिळाले; राहुल द्रविडच्या विधानानं सीनियर खेळाडू चिंतेत, Follow onच्या निर्णयावरही मांडल मत

India vs New Zealand, 2nd Test Live Updates : मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड ( Rahul Dravid) याच्या कार्यकाळाची सुरुवात दणक्यात झाली. न्यूझीलंडला ट्वेंटी-२० मालिकेत ३-० असे पराभूत केल्यानंतर कसोटी मालिकेत १-० असा विजय मिळवत टीम इंडियानं दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी चांगली तयारी केली.

भारतीय संघ आता ३ कसोटी व ३ वन डे सामन्यांच्या मालिकेसाठी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होणार आहे. त्या दौऱ्यासाठी अद्याप संघ निवडला गेला नसला तरी अनेक गोष्टींवर विचार करावा लागणार असल्याचे स्पष्ट संकेत द्रविडनं दिले. मुंबई कसोटीनंतर द्रविडनं युवा खेळाडूंचं कौतुक करताना सीनियर्स खेळाडूंना अप्रत्यक्षितरित्या संकेत दिल्याची चर्चा सुरू झाली आहे.

भारतानं ठेवलेल्या ५४० धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा दुसरा डाव १६७ धावांवर गडगडला.भारतानं हा सामना ३७२ धावांनी जिंकला. भारताच्या पहिल्या डावातील ३२५ धावांच्या प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा पहिला डाव ६२ धावांवर गडगडला. भारतानं ७ बाद २७६ धावांवर दुसरा डाव घोषित केला. या विजयानंतर राहुल द्रविडनं युवा खेळाडूंची चांगली कामगिरी ही भारतीय संघासाठी चांगली गोष्ट आहे आणि त्यानं संघ अजून मजबूत झालाय, असे विधान केले.

तो म्हणाला,''मालिका विजयाचा आनंद आहेच, कानपूर कसोटीत आम्ही विजयाच्या जवळ आलो होतो, परंतु एक विकेट घेण्यात अपयशी ठरलो. मुंबईत खेळाडूंनी अजून मेहनत घेतली. हा निकाल एकतर्फी वाटत असेल, परंतु संपूर्ण मालिकेत आम्ही खूप परिश्रम घेतले. एक टप्पा असा होता की आम्ही पिछाडीवर गेलो होतो आणि तिथून आम्ही मुसंडी मारली. याचे सर्व श्रेय संघाला जाते. युवा खेळाडू मिळालेल्या संधीचं सोनं करताना पाहून आनंद होतोय.''

तो पुढे म्हणाला,''होय आम्हाला सीनियर खेळाडूंची उणीव जाणवली. पण, ज्यांना संधी मिळाली, त्यांनी त्याचा फायदा उचलला. जयंत यादवसाठी कालचा दिवस खास नव्हता, परंतु त्यानं त्यातून धडा घेत आज कमाल केली. मयांक, श्रेयस, सिराज यांना फार कमी संधी मिळाली आहे. अक्षर वारंवार स्वतःला सिद्ध करतोय आणि फलंदाजीतही त्यानं कमालीची सुधारणा केलीय.''

भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याला २६ डिसेंबरला सुरुवात होणार आहे. ''आता आमच्याकडे बरेच पर्याय उपलब्ध झाले आहेत आणि त्यानं संघ अजून मजबूत झाला आहे. आम्ही फॉलोऑनचा विचारच केला नाही. युवा फलंदाज संघात होते आणि त्यांना संधी देण्याचा आम्ही ठरवले. खडतर परिस्थितीत खेळण्याचा त्यांना सराव मिळावा, यासाठी हा निर्णय घेतला गेला. त्यामुळे खेळाडूचा विकास करण्यात मदत झाली,''असेही द्रविडनं फॉलोऑनच्या प्रश्नावर उत्तर दिले.

''युवा खेळाडूंच्या कामगिरीमुळे संघ निवड करताना आमची डोकेदुखी वाढली आहे. ही चांगली गोष्ट आहे. त्यामुळे आता योग्य संवाद साधला गेला पाहिजे,''असेही द्रविडनं स्पष्ट केलं.