IPL 2022: मेगा ऑक्शनपूर्वी आकाश चोप्राची भविष्यवाणी; 'या' खेळाडूला मिळू शकते २० कोटींपेक्षा अधिक रक्कम

IPL 2022: मेगा ऑक्शनपूर्वी भारतीय खेळाडूचं नाव घेत त्याला २० कोटींपेक्षा अधिक रक्कम मिळू शकते अशी भविष्यवाणी आकाश चोप्रानं केली आहे.

IPL 2022: आयपीएलचा २०२१ (IPL 2021) चा हंगाम संयुक्त अरब अमिरातीमध्ये नुकताच पार पडला. यानंतर आता आयपीएल २०२२ (IPL 2022) चे वेध लागले आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू आणि कमेंट्रेटर आकाश चोप्रा यानं आयपीएलच्या मेगा ऑक्शनपूर्वी सर्वात महागड्या खेळाडूची भविष्यवाणी केली आहे.

इंडियन प्रीमिअर लीगच्या (Indian Premier League) आगामी हंगामात त्यांनी टीम इंडियाचा विकेटकिपर फलंदाज केएल राहुल (KL Rahul) हा सर्वात महागडा खेळाडू ठरू शकतो अशी भविष्यवाणी केली आहे.

न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेल्या टी २० मालिकेच्या दुसऱ्या सामन्यानंतर आकाश चोप्रानं यासंदर्भात वक्तव्य केलं. केएल राहुलनं न्यूझीलंडविरोधातील दुसऱ्या सामन्यात जबरदस्त फलंदाजी करत ४९ चेडूंमध्ये ६५ धावा ठोकल्या होत्या.

"जर तो आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये गेला आणि ड्राफ्ट सिस्टममध्ये कोणत्याही खेळाडूचं मानधन निश्चित केलं गेलं नाही तर केएल राहुल हा सर्वात महागडा खेळाडू ठरू शकतो. त्याला २० कोटी रूपयांपेक्षा अधिक रक्कम मिळू शकते," असं ट्वीट आकाश चोप्रानं केलं आहे.

सध्या केएल राहुल हा उत्तम फॉर्ममध्ये आहे. त्यानं खेळलेल्या मागील पाच टी २० आंतरराष्ट्रीय सामन्यांकडे पाहिलं तर त्यानं पाच पैकी ४ सामन्यांमध्ये अर्धशतक ठोकलं आहे. यावरून तो सध्या उत्तम फॉर्ममध्ये आहे हे दिसून येत आहे.

आयपीएल २०२२ मध्ये यावेळी १० संघ भाग घेताना दिसून येणार आहेत. यावेळी आयपीएलमध्ये लखनौ आणि अहमदाबादचे दोन नवे संघही खेळणार आहेत. नुकतंच केएल राहुलनं पंजाबची साथ सोडण्याचे संकेत दिले होते.

केएल राहुलनं पंजाबची साथ सोडल्यास त्याला लखनौ किंवा अहमदाबादचा संघ हा कर्णधारपद देण्याची दाट शक्यता आहे. तर दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेचा माजी गोलंदाज डेल स्टेननं केएल राहुल हा आरसीबीमध्ये पुनरागमन करू शकतो असं म्हटलं होतं.

यापूर्वी केएल राहुल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी खेळला आहे. विरोट कोहलीनं आपला राजीनामा दिल्यानंतर आरसीबीनं आपल्या नव्या कर्णधाराच्या नावाची घोषणा केलेली नाही. अशात आरसीबी केएल राहुलच्या नावाचाही विचार करू शकते असं म्हटलं जातंय.

इंडियन प्रीमिअर लीगच्या पुढील पर्वात १० संघ मैदानावर उतरणार आहेत. RP Sanjiv Goenka आणि CVC Capital यांनी अनुक्रमे लखनौ व अहमदाबाद फ्रँचायझी खरेदी केली आहे. त्यामुळे आयपीएल २०२२चा थरार आणखी वाढणार आहे.

पण, आयपीएल २०२०चा पूर्ण हंगाम आणि आयपीएल २०२१चा दुसरा टप्पा यूएईत खेळवल्यानंतर आयपीएल २०२२ कुठे होईल, याची सर्वांना उत्सुकता होती आणि बीसीसीआय सचिव जय शाह (Jay shah) यांनी अखेर हे जाहीर केले.

इंडिया सिमेंटच्या ७५व्या वर्षपूर्ती निमित्तानं चेन्नईत एका कार्यक्रमाचे आयोजन केले गेले होते. त्या कार्यक्रमात चेन्नई सुपर किंग्सच्या ( CSK) आयपीएल २०२१च्या जेतेपदाचा आनंदही साजरा केला गेला. CSKच्या खेळाडूंचा गौरव करण्यात आला. यावेळी जय शाह यांनी आयपीएल २०२२ भारतातच होणार असल्याचे जाहीर केले.

२०११मध्ये १० संघ खेळले होते आणि तोच फॉरमॅट २०२२मध्येही असेल. दहा संघांनी दोन प्रत्येकी पाच-पाच अशा दोन गटांत विभागणी करण्यात येईल. गटातील प्रत्येक संघ एकमेकांशी दोन आणि दुसऱ्या गटातील संघाशी एक असे सामने खेळतील. साखळी फेरीत प्रत्येक संघ १४ सामने खेळतील. विजयी संघाला दोन गुण मिळतील, तर सामना अनिर्णीत राहिल्या दोन्ही संघांना प्रत्येकी १-१गुण दिला जाईल.

Read in English