ICC ट्वेन्टी-२० रँकिंगमध्ये विराट 'टॉप-१०' मधून बाहेर; फक्त एकाच भारतीय फलंदाजाला स्थान, रोहितही १३ व्या स्थानी!

ICC T20 Ranking Batting: आयसीसी ट्वेन्टी-२० फलंदाजांच्या क्रमवारीत मोठा बदल झाला आहे. विराट, रोहित टॉप-१० च्या बाहेर आहेत. फक्त एकच फलंदाज टॉप-१० मध्ये आहे.

ICC T20 Ranking Batting: न्यूझीलंड विरुद्धची ट्वेन्टी-२० मालिका संपली असून भारतीय संघानं ३-० नं मालिका जिंकली. रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघानं जबरदस्त कामगिरी करत मालिका खिशात घातली. रोहित शर्मानं मालिकेत चांगली फलंदाजी केली आणि त्याचा फायदा आयसीसी फलंदाजी क्रमवारीतही झालेला पाहायला मिळतो आहे.

आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं (ICC) नुकतंच जाहीर केलेल्या ट्वेन्टी-२० क्रिकेटमधील फलंदाजांच्या क्रमवारीत रोहित शर्माच्या स्थानात सुधारणा झाली आहे.

रोहित शर्मा आता ट्वेन्टी-२० क्रमवारीत १३ व्या स्थानावर पोहोचला आहे. न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेआधी रोहित शर्मा १५ व्या क्रमांकावर होता. रोहित शर्मानं तीन सामन्यांच्या ट्वेन्टी-२० मालिकेत दोन अर्धशतकं ठोकली आहेत. तिन्ही सामन्यांत रोहितनं अनुक्रमे ५६,५५ आणि ४८ धावा केल्या आहेत. रोहितला मालिकावीराच्या पुरस्कारानंही सन्मानित करण्यात आलं.

आयसीसीच्या ट्वेन्टी-२० क्रमवारीत फलंदाजांच्या यादीत केवळ एकाच भारतीला टॉप-१० मध्ये आपलं स्थान टिकवता आलेलं आहे. तो म्हणजे केएल राहुल. आयसीसीच्या क्रमवारीत केएल राहुल पाचव्या क्रमांकावर आहे.

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम पहिल्या क्रमांकावर आहे. न्यूझीलंड विरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेत विराट कोहलीला आराम देण्यात आला होता. याचा परिणाम त्याच्या क्रमवारीवरही झाला आहे. विराट कोहली आता टॉप-१० मधून बाहेर फेकला गेला आहे.

विराट कोहली ट्वेन्टी-२० फलंदाजांच्या क्रमवारीत ११ व्या स्थानावर आहे. बाबर आझम पहिल्या, तर इंग्लंडचा डेव्हिड मलान दुसऱ्या क्रमांकावर आहे. दक्षिण आफ्रिकेचा मार्करम तिसऱ्या क्रमांकावर आहे.

विशेष म्हणजे, आयसीसीच्या ट्वेन्टी-२० गोलंदाजी आणि अष्टपैलूंच्या यादीत टॉप-१० क्रमवारीत एकाही भारतीय खेळाडूचा समावेश नाही. ट्वेन्टी-२० क्रिकेटमधील सर्वोत्तम संघांची क्रमवारी पाहायची झाल्यास भारत सध्या दुसऱ्या क्रमाकांवर आहे. तर इंग्लंड पहिल्या स्थानावर आहे.

रोहित शर्मानं न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेत अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर केले आहेत. रोहित शर्मा आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४५० हून अधिक षटकार ठोकणारा फलंदाज ठरला आहे. याशिवाय ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक अर्धशतकं ठोकण्याचा पराक्रमही रोहित शर्माच्या नावावर आहे. विराट कोहलीचा विक्रम त्यानं मोडीस काढला आहे.