Hardik Pandya : हार्दिक पांड्या करतोय निवृत्तीचा विचार, बीसीसीआयला कळवलाय भविष्याचा प्लान, जाणून घ्या नेमकं काय

Hardik Pandya : इंडियन प्रीमिअर लीग २०२१च्या दुसऱ्या टप्प्यातील निराशाजनक कामगिरीनंतरही हार्दिक पांड्याला ( Hardik Pandya) ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या संघात कायम राखले गेले. साखळी फेरीतील पाच सामन्यांत हार्दिकची कामगिरी अत्यंत निराशाजनक झाली. त्यानंतर त्याला न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतून संघातून वगळले गेले.

Hardik Pandya : इंडियन प्रीमिअर लीग २०२१च्या दुसऱ्या टप्प्यातील निराशाजनक कामगिरीनंतरही हार्दिक पांड्याला ( Hardik Pandya) ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या संघात कायम राखले गेले. साखळी फेरीतील पाच सामन्यांत हार्दिकची कामगिरी अत्यंत निराशाजनक झाली. त्यानंतर त्याला न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतून संघातून वगळले गेले.

बीसीसीआयनं त्याला तंदुरुस्ती सिद्ध करण्यासाठी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत जाण्यास सांगितले. तंदुरुस्ती सिद्ध केल्यानंतरच त्याचा संघ निवडीसाठी विचार केला जाणार आहे. पण, वर्कलोड कमी करण्यासाठी आता हार्दिकनंच कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतल्याचे वृत्त समोर येत आहे.

पाठिच्या दुखण्यामुळे हार्दिकला कसोटी क्रिकेटमध्ये गोलंदाजी करणं जमणार नाही आणि त्यामुळे तो या फॉरमॅटमधून निवृत्तीचा विचार करत आहे आणि त्यानं तशी इच्छा औपचारिकरित्या बीसीसीआयला कळवली आहे. त्याला आता मर्यादित षटकांच्या क्रिकेटवर व आयपीएलवर लक्ष्य केंद्रीत करायचे आहे, परंतु याबाबत त्यानं अधिकृत घोषणा केलेली नाही. पांड्या २०१८मध्ये इंग्लंड दौऱ्यावर अखेरची कसोटी खेळला होता आणि त्यानंतर तो कसोटी क्रिकेटपासून दूरच आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी त्याच्या नावाचा विचारही केला गेलेला नाही.

''तो बराच काळ दुखापतीशी झगडत आहे आणि त्यानं अजूनही अधिकृतपणे कळवलेलं नाही, परंतु तो कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा विचार करतोय. यामुळे त्याला मर्यादित षटकांच्या क्रिकेटवर लक्ष केंद्रीत करण्यास मदत मिळणार आहे. तसंही तो कसोटी क्रिकेटच्या प्लानमध्ये नाही. त्याच्या या निर्णयानं मोठं नुकसान होईल हे नक्की आहे, परंतु आमच्याकडे पर्यायी खेळाडू तयार आहेत,''असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानं InsideSport ला सांगितले.

मागच्या वर्षी पाठीच्या दुखापतीवर शस्त्रक्रिया झाल्यानंतर हार्दिकला गोलंदाजी करण्यात मेहनत घ्यावी लागत आहे. आयपीएल २०२० व २०२१मध्येही त्यानं गोलंदाजी केलेली नाही. इंग्लंडविरुद्धच्या घरच्या मैदानावरील मालिकेत त्यानं गोलंदाजी केली, परंतु प्रभाव पाडू शकला नाही. श्रीलंका दौऱ्यावरही तो गोलंदाजी करताना चाचपडत होता. मागील १२ महिन्यांत त्यानं वन डे व ट्वेंटी-२०त मिळून ४६ षटकं फेकली आहेत.

''तो आता फक्त २८ वर्षांचा आहे आणि त्यानं कसोटी क्रिकेट सोडण्याचा निर्णय घेतल्यास तो संघासाठी मोठा धक्का असेल. पण, आम्हाला मर्यादित षटकांच्या क्रिकेटसाठी अष्टपैलू हार्दिक पांड्या हवाय, कारण पुढील दोन वर्षांत दोन वर्ल्ड कप होणार आहेत. त्यामुळे त्याचे गोलंदाजी करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे, ''असेही बीसीसीआय अधिकाऱ्यानं InsideSport ला सांगितले.

हार्दिकच्या अनुपस्थितीत शार्दूल ठाकूर याचा विचार केला जाऊ शकतो. त्यानं इंग्लंड दौऱ्यावर दोन अर्धशतकं झळकावली आहेत, तर ऑस्ट्रेलियातही महत्त्वपूर्ण खेळी केली आहे. बीसीसीआयच्या अधिकाऱ्याच्या मते शार्दूल ठाकूरचा कसोटी क्रिकेटसाठी अष्टपैलू खेळाडू म्हणून विचार केला जाईल.'' संघ व्यवस्थापन व निवड समितीची हार्दिकचा बॅक अप म्हणून विचार करेल. शार्दूल हा त्यापैकी एक आहेच, परंतु ट्वेंटी-२० क्रिकेटसाठी वेंकटेश अय्यरचाही विचार होईल. आम्ही आणखी काही पर्यायांवरही विचार करणार आहोत,''असेही त्यांनी सांगितले.

हार्दिकनं ११ कसोटीत ५३२ धावा केल्या आहेत. त्यात एक शतकाचा व ४ अर्धशतकांचा समावेश आहे. शिवाय त्यानं १७ विकेट्सही घेतल्या आहेत.