Lucknow Super Giants : भारतीय संघात खेळण्याचे स्वप्न पाहणारे खेळाडू लखनौ सुपर जायंट्स संघात नकोत; गौतम गंभीरचे फर्मान

Gautam Gambhir warns Lucknow Super Giants' players - लखनौ फ्रँचायझीनं त्यांचा कर्णधार, सपोर्ट स्टाफ आणि नावही जाहीर केले. लखनौ फ्रँचायझी IPL 2022 मध्ये लखनौ सुपर जायंट्स या नावानं मैदानावर उतरणार आहे. लोकेश राहुल ( KL Rahul) हा संघाचा कर्णधार असणार आहे, तर भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर ( Gautam Gambhir) संघाचा मेंटॉर आहे.

Gautam Gambhir warns Lucknow Super Giants' players - इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2022) १५व्या पर्वात १० संघांमध्ये टशन पाहायला मिळणार आहे. अहमदाबाद व लखनौ या दोन नवीन फ्रँचायझीच्या समावेशामुळे आयपीएलमधील थरार अधिक वाढणार यात शंका नाही.

लखनौ फ्रँचायझीनं त्यांचा कर्णधार, सपोर्ट स्टाफ आणि नावही जाहीर केले. लखनौ फ्रँचायझी IPL 2022 मध्ये लखनौ सुपर जायंट्स या नावानं मैदानावर उतरणार आहे. लोकेश राहुल ( KL Rahul) हा संघाचा कर्णधार असणार आहे, तर भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर ( Gautam Gambhir) संघाचा मेंटॉर आहे.

गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली कोलकाता नाइट रायडर्सनं ( KKR) दोन आयपीएल जेतेपदं पटकावली आहेत आणि त्याचा अनुभव लखनौ सुपर जायंट्ससाठी फायद्याचा ठरणार आहे. पण, आयपीएलच्या मेगा ऑक्शनपूर्वी गंभीरनं एक फतवा काढला आहे आणि तो खेळाडूंना संभ्रमात पाडणार आहे.

Backstage with Boria या कार्यक्रमात बोलताना गंभीरनं लखनौकडून खेळू इच्छिणाऱ्या खेळाडूंसाठी एक गंभीर संदेश दिला आहे. जे खेळाडू लखनौ सुपर जायंट्स संघाकडून खेळतील त्यांनी भारतीय संघाकडून खेळण्याचा विचार करू नये, हा अप्रामाणिकपणा ठरेल, असे मत गंभीरनं व्यक्त केलं.

तो म्हणाला,''जेव्हा मी आयपीएल टीमचा कर्णधार होतो तेव्हा मी खेळाडूंना एकच गोष्ट सांगायचो, ती म्हणजे भारताकडून खेळण्याचा विचार करणारे खेळाडू मला संघात नकोत. फ्रँचायझीचा विचार करून खेळणारे खेळाडू मला हवे होते. तुम्ही चांगली कामगिरी केली तर टीम इंडियाचे दरवाजे तुमच्यासाठी उघडले जातीलच.''

''तुमच्या डोक्यात भारताकडून खेळण्याचा विचार असेल आणि लखनौनं तुम्हाला ते व्यासपीठ दिलं, असं तुम्ही म्हणत असाल तर तुम्ही फ्रँचायझीशी प्रतारणा करताय. पण, तुम्ही लखनौसाठी खेळाल आणि कामगिरीत सातत्य राखाल, तर तुमच्यासाठी भारतीय संघाकडून खेळण्याची संधी चालून येईल,''असेही गंभीर म्हणाला.

आयपीएल स्पर्धेदरम्यान खेळाडूंचं पूर्ण लक्ष हे फ्रँचायझीसाठी चांगली कामगिरी करण्याकडे असायला हवं, असे गंभीरनं सांगितले. तो पुढे म्हणाला,''आयपीएलचे दोन महिने खेळाडूंचं संपूर्ण लक्ष हे फ्रँचायझीच्या चांगल्या कामगिरीकडे असायला हवं. मला भारताकडून खेळायचंय असं बोलणारे किंवा तसा विचार करणारे खेळाडू मला नकोत. या दोन महिन्यांत फ्रँचायझीला जेतेपेद जिंकून देण्याचे सर्वांनी लक्ष्य ठेवले पाहीजे. हा विचार करून खेळाडूंनी खेळ केल्यास त्यांना आपोआप भारतीय संघात संधी मिळू शकते.''

भारतीय संघात खेळण्यासाठी आयपीएल हे व्यासपीठ नाही. जगाला तुमचे टॅलेंट दाखवायचे हे व्यासपीठ आहे आणि खेळाडूंनी तसाच विचार करायला हवा, असेही गंभीरनं स्पष्ट केलं. IPL 2022च्या पर्वाला सुरुवात होण्यापूर्वी त्यांनी लोकेश राहुल ( १७ कोटी), मार्कस स्टॉयनिस ( ९.२ कोटी) आणि रवी बिश्नोई ( ४ कोटी) यांना करारबद्ध करून आयपीएल मेगा लिलावासाठी (IPL 2022 Mega Auction) लखनऊ संघाने ६० कोटींची रक्कम वाचवली.