IPL 2022 : चेन्नई सुपर किंग्सनं रिलिज केल्यानंतर ड्वेन ब्राव्होनं घेतला मोठा निर्णय; महेंद्रसिंग धोनीबद्दल म्हणाला...

इंडियन प्रीमिअर लीग २०२२साठी जानेवारी महित मेगा ऑक्शन होणार आहे. अहमदाबाद व लखनौ फ्रँचायझीच्या समावेशामुळे आधीच्या ८ संघांनी आपापल्या ताफ्यात हव्या असलेल्या खेळाडूंना कायम राखले. यात काही धक्कादायक निर्णयही पाहायला मिळाले, परंतु बीसीसीआयनं ठेवलेल्या अटीनुसार फ्रँचायझींना निर्णय घ्यायचा होता. त्यामुळे इतकी वर्षाच्या मेहनतीनं तयार केलेल्या संघ असा तुटताना फ्रँचायझींना अनेक आव्हानात्मक निर्णय घ्यावे लागले.

गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्सनं ( Chennai Super Kings) फॅफ ड्यू प्लेसिस, ड्वेन ब्राव्हो, जोश हेझलवूड, टॉम कुरन या मॅचविनिंग खेळाडूंना रिलिज केले. त्यापैकी एक ड्वेन ब्राव्होनं ( Dwayne Bravo ) महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

चेन्नई सुपर किंग्सनं रवींद्र जडेजा ( 16 कोटी), महेंद्रसिंग धोनी ( 12 कोटी), ऋतुराज गायकवाड( 6 कोटी) , मोईन अली ( 8 कोटी) या चार खेळाडूंना आयपीएल २०२२साठी संघात कायम राखले.त्यांच्याकडे आता 48 कोटी शिल्लक रक्कम आहे आणि त्यातूनच ते आता पुढील १० वर्षांसाठी संघबांधणी करतील.

ब्राव्हो हा ट्वेंटी-२० फॉरमॅटमधील सर्वात यशस्वी अष्टपैलू आहे. त्याच्या नावावर ५१२ ट्वेंटी-२० सामन्यांत ६६२७ धावा व ५५३ विकेट्स आहेत. ट्वेंटी-२०त ५००+ विकेट्स घेणारा तो जगातील पहिलाच गोलंदाज आहे. ५०००+ धावा व ५००+ विकेट्स असा पराक्रम करणाराही पहिलाच खेळाडू आहे. त्यामुळे या फॉरमॅटसाठी त्याचे महत्त्व सर्वांनाच माहित्येय.

विशेषतः डेथ ओव्हरमध्ये त्याचा अनुभव चेन्नईच्या कामी अनेकदा आला आहे. ब्राव्होनं त्याचं श्रेयही महेंद्रसिंग धोनीला दिले. तो म्हणाला, मला CSKनं रिटेनं केलं नसलं तरी मी लिलावात सहभागी होणार आहे. मला कोणता संघ घेईल, याची मला कल्पना नाही. CSK किंवा कोणता संघ मला ताफ्यात घेईल, हेही माहीत नाही. पण, जो संघ संधी देईल त्यांच्यासाठी १०० टक्के योगदान देणार.''

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर ब्राव्होनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यामुळे CSKनं त्याला रिलिज केल्यानंतर तो आयपीएल २०२२ खेळणार की नाही, याबाबत शंका होती. पण, त्यानं IPL 2022 Mega Auction मध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.

''महेंद्रसिंग धोनीचं माझ्या मनात वेगळं स्थान आहे. मी त्याला दुसऱ्या आईच्या पोटातून जन्मलेला भाऊ असेच म्हणतो. आमच्यात घट्ट मैत्री आहे. त्यानं मला कारकीर्द घडवण्यात खूप मदत केली. आमच्यातही मैत्रीच दोघांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे.''असेही ३८ वर्षीय ब्राव्हो म्हणाला.