तो 'विराट' कोहली आहे; पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजमनं काही केलं तरी टीम इंडियाच्या कॅप्टनचे '५' विक्रम तोडूच शकत नाही!

भारताच्या वन डे व कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहलीशी ( Virat Kohli) पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आजम ( Babar Azam) याची सातत्यानं तुलना होत आली आहे.

भारताच्या वन डे व कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहलीशी ( Virat Kohli) पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आजम ( Babar Azam) याची सातत्यानं तुलना होत आली आहे. बाबरनं त्याच्या खेळीनं आतापर्यंत विराटचे अनेक विक्रमही स्वतःच्या नावावर केले. त्यात ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतही बाबरच्या नेतृत्वाखाली पाकिस्ताननं प्रथमच टीम इंडियाला पराभूत करण्याचा पराक्रम केला. म्हणून बाबर याला आता विराटपेक्षा भारी खेळाडू मानले जातेय. पण, बाबरनं काही केलं तरी आता विराटचे पाच विक्रम त्याला मोडणे आजन्म शक्य नाही.

इंडियन प्रीमिअर लीगमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोरकडून खेळणाऱ्या विराट कोहलीनं मोठमोठे पराक्रम केले आहे. बाबर आजमही जगभरातील काही लीगमध्ये खेळला आहे. पाकिस्तान सुपर लीगमध्ये कराची किंग्सचे प्रतिनिधित्व करणाऱ्या बाबरनं २०२०च्या पर्वात ५९.१२च्या सरासरीनं ४७३ धावा केल्या. पण, विराटानं २०१६च्या आयपीएलमध्ये सर्वाधिक ९७३ धावा केल्या आहेत. त्या पर्वात त्यानं १६ सामन्यात ८१.०८ च्या सरासरीनं धावा कुटल्या.

३३ वर्षीय विराट कोहलीनं २०११ मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पम केलं. त्यानं आतापर्यंत ९६ सामन्यांत ५१.०८ च्या सरासरीनं २७ शतकं व २७ अर्धशतकांसह ७७६५ धावा केल्या. २७ वर्षीय बाबरनं २०१६मध्ये पहिली कसोटी खेळली आणि आतापर्यंत ३५ सामन्यांत त्यानं ४२.९५च्या सरासरीनं २३६२ धावा केल्या. त्यात ५ शतकं व १८ अर्धशतकांचा समावेश आहे. विराटनं पाकिस्तानी कर्णधारापेक्षा अधिक कसोटी सामने खेळले आहेत आणि त्याच्या नावावर ७ द्विशतकं आहेत. बाबरला अद्याप एकही द्विशतक झळकावता आलेले नाही आणि १४३ ही त्याची सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी आहे.

विराट कोहलीनं नुकतंच वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद १२ हजार धावांचा विक्रम नावावर केला. २००८ पासून वन डे क्रिकेट खेळणाऱ्या विराटनं २५४ सामन्यांत ५९.०७च्या सरासरीनं धावा केल्या आहेत. त्यानं वन डेत १२ हजार धावा पूर्ण करण्यासाठी केवळ २४२ डाव खेळले आणि सचिन तेंडुलकर ( ३०० डाव), रिकी पाँटिंग ( ३१४ डाव) यांचा विक्रम मोडला. बाबरनं ८३ वन डे सामने खेळले आहेत आणि त्यानं ५६.९३च्या सरासरीनं ३९८५ धावा केल्या आहेत. पहिल्या ८० वन डे सामन्यांची तुलना केल्यास बाबर हा आघाडी घेतोय, परंतु १२ हजार धावांचा पल्ला कमी डावांत गाठणे बाबरला शक्य नाही.

सर्वोत्तम खेळाडू फक्त त्यानं किती धावा केल्यात यावरून नाही, तर संघाला खरी गरज असताना कसा खेळतो यावरून ठरतो. लक्ष्याचा पाठलाग करताना विराटची बॅट चांगलीच तळपते. त्यानं १४४ सामन्यांत धावांचा पाठलाग करताना ६८.०८च्या सरासरीनं ७१४९ धावा केल्या आहेत आणि त्यात २६ शतकं व ३३ अर्धशतकं आहेत. प्रथम फलंदाजी करताना विराटची सरासरी ही ४९.७० अशी आहे. बाबरची प्रथम फलंदाजी करताना सरासरी ६२.१० इतकी आहे आणि धावांचा पाठलाग करताना ५१.१२च्या सरासरीनं धावा केल्या आहेत. त्याला विराटचा हा विक्रम मोडण्यासाठई २२ शतकं झळकवावी लागतील.

आयसीसी वन डे क्रमवारीत विराट कोहली १२५८ दिवस म्हणजेच जवळपास साडेतीन वर्ष अव्वल स्थानावर होता.