The opportunity to check some players before the big game | मोठ्या सामन्यांपूर्वी काही खेळाडूंना तपासण्याची संधी
मोठ्या सामन्यांपूर्वी काही खेळाडूंना तपासण्याची संधी

- सुनील गावसकर

दोन दिवसांआधी २५ जून १९८३ च्या ऐतिहासिक विश्वचषक जेतेपदाचा सोहळा साजरा झाला. ही अशी कामगिरी होती ज्यामुळे भारतीय क्रिकेटची प्रतिमा बदलली. एक लहानसे लक्ष्य गाठण्याच्या प्रयत्न करणाऱ्या दोनवेळेच्या विश्वविजेत्या वेस्ट इंडिजला लोळविणे चमत्कारापेक्षा कमी नव्हते. या जेतेपदानंतर भारतीय क्रिकेटने कधीही मागे वळून पाहिलेले नाही. भारत आज विश्व क्रिकेटचा मार्गदर्शक बनला आहे.

एकीकडे भारत ‘क्रिकेटचे सत्ता केंद्र’ बनत असताना कॅरेबियन क्रिकेटच्या पतनास सुरुवात झाली. कसोटी क्रिकेटमध्ये विंडीजने काही वर्षे स्वत: वर्चस्व गाजविले असेल, पण आयसीसी विश्वचषक विजेतेपदाच्या दावेदारीतून हा संघ बाहेर होत गेला. आयसीसी टी२० चॅम्पियनशिपमध्ये हा संघ दोनदा चॅम्पियन बनला हे खरे आहे, पण १९७० ते ९० च्या दशकातील त्यांचा दरारा आता कधीही पहायला मिळत नाही.

कॅरेबियन क्रिकेटपटूंना जगात सर्वत्र होणाºया टी२० लीगमध्ये सातत्याने मागणी होते. टी२० प्रकारात फिटनेसला अत्याधिक मागणी असते. याचे मूर्तिमंत उदाहरण आंद्रे रसेल आहे. तो चार षटकांची गोलंदाजी आणि धडाकेबाज फलंदाजीत चपखल फिट बसतो. या विश्वचषकात विंडीजच्या खेळाडूंनी चांगला खेळ केला, पण संघाच्या विजयासाठी त्यांच्या या कामगिरीचा उपयोग झाला नाही.

अफगाणविरुद्ध विजयामुळे भारतीयांचा विश्वास उंचावला. अफगाणला लहान धावसंख्या ओलांडता आली असती. त्यांचे खेळाडू त्या दिशेने प्रयत्न करताना दिसले. तथापि अनुभव कमी पडला. भुवनेश्वर कुमार फिट झाल्याची आनंदी बातमी आहे. त्याला आणखी विश्रांती देत अन्य खेळाडूला संधी देण्याची शक्यता आहे. अफगाणविरुद्ध हॅट्ट्रिक घेणाºया मोहम्मद शमीला बाहेर बसविण्याचा निर्णय घेणे व्यवस्थापनासाठी कठीण ठरेल.

दुसरीकडे विजय शंकरला आणखी एक संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. भारताचा विंडीजविरुद्ध होणारा हा सामना म्हणजे २५ जून १९८३ आणि २ एप्रिल २०११ च्या विजेत्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी काही खेळाडूंना तपासून पाहण्याची चांगली संधी ठरू शकतो.


Web Title: The opportunity to check some players before the big game
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.