Women's Cricket Team Head Coach Amol Muzumdar Grand Welcome At His Andheri Residence Home : भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक अमोल मुझुमदार यांच्या मार्गदर्शनाखाली हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघानं महिला वर्ल्ड कप स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी करून दाखवली. नवी मुंबईतील डॉ. डी. वाय. पाटील स्पोर्ट्स अकादमीच्या स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेच्या संघाला पराभूत करत भारतीय महिला संघाने पहिली वहिली ICC ट्रॉफी जिंकली. भारताच्या लेकी जगात भारी आहेत, हे या विजयानं सिद्ध झालं. संघाचे प्रशिक्षक आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये खोऱ्यानं धावा काढून टीम इंडियाकडून एकही सामना खेळण्याची संधी न मिळालेल्या अमोल मुझुमदार यांच्यासाठी हा क्षण खास आहे. भारतीय महिला संघाच्या विजयापासून पडद्यामागचा हा हिरो चर्चेचा विषय ठरत आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
ढोल, तुतारी अन् महिला मंडळींनी बॅट उंचावत दिला 'गार्ड ऑफ ऑनर'
भारतीय महिला संघाला जगजेत्ता करून घरी परतल्यावर अमोल मुझुमदार यांचं शाही थाटात स्वागत करण्यात आले. विले पार्ले येथील ते ज्या सोसायटीत राहतात तिथं वर्ल्ड चॅम्पियन कोचच्या स्वागतासाठी मोठी गर्दी जमली होती. अमोल मुझुमदार यांची कार सोसायटीमध्ये पोहचल्यावर "इंडिया इंडिया...आणि अमोल.. अमोल.." या अशा घोषणाबाजींनी परिसर दुमदुमल्याचे पाहायला मिळाले. ढोल, तुतारी वादन आणि पुष्पवर्षाव करत त्यांचं जंगी स्वागत करण्यात आले. भारताच्या लेकींना जगात भारी ठरण्यासाठी तयार करणाऱ्या कोचला यावेळी महिला मंडळींनी बॅट उंचावून 'गार्ड ऑफ ऑनर'ही दिल्याचे पाहायला मिळाले. अमोल मुझुमदार यांच्या जंगी स्वागताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
वाढदिवसाआधी कोचला भारतीय महिला संघानं दिलं मोठं गिफ्ट
अमोल मुझुमदार हे ११ नोव्हेंबरला आपला वाढदिवस साजरा करतात. त्याआधीच २ नोव्हेंबरला भारतीय महिला संघानं आपल्या कोचला जबरदस्त गिफ्ट दिले आहे. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अमोल मुझुमदार म्हणाले की, आम्ही २० ऑक्टोबरची नव्हे तर २ नोव्हेंबरची तयारी केली होती. हा दिवस माझ्यासाठी खास आणि अविस्मरणीय ठरला, असेही ते म्हणाले आहेत.