Virat Kohli Gautam Gambhir Viral Video, IND vs SA: दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात भारताने १७ धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना विराट कोहलीच्या दमदार शतकाच्या (१३५) जोरावर टीम इंडियाने ५० षटकांत ८ बाद ३४९ धावांपर्यंत मजल मारली. या आव्हानाचा पाठलाग करताना, दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी खूप प्रयत्न केले. पण अखेर भारताने सामना जिंकला. भारतीय संघाचा रनमशिन विराट कोहली गेल्या अनेक दिवसांपासून फक्त वनडे क्रिकेट खेळत आहे. ऑस्ट्रेलियाविरूद्ध झालेल्या वनडे सामन्यात त्याला केवळ एक अर्धशतक ठोकता आले. त्यामुळे आफ्रिकेविरूद्धच्या मालिकेत विराटच्या खेळीकडे लक्ष होते. विराटने आपल्या लौकिकाला साजेसा खेळ केला. त्याने १२० चेंडूत तब्बल १३५ धावांची धमाकेदार खेळी केली. त्याच्या खेळीत ११ चौकारांचा समावेश होता. त्यासोबतच विराटने ७ षटकारही मारले. त्यानंतर आता व्हायरल झालेल्या एका व्हिडीओची चर्चा रंगली आहे.
विराट कोहलीचे गौतम गंभीरसोबत मतभेद असल्याच्या सध्या चर्चा सुरू आहेत. या वृत्तांदरम्यान, चाहत्यांमध्ये पुन्हा एकदा कुजबूज सुरू झाली आहे की टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममधील वातावरण अनुकूल नाही. तशातच दुसऱ्या वनडे आधी विराट कोहली आणि निवड समिती सदस्य प्रज्ञान ओझा यांच्यात जोरदार संवाद रंगलेला दिसला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दुसरा सामना ३ डिसेंबरला रायपूरमध्ये खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी, विमानतळावर निवड समिती सदस्य प्रज्ञान ओझा याच्याशी कोहलीची दीर्घकाळ चर्चा रंगल्याचे दिसले. या व्हिडिओमध्ये, दोघे गंभीर संभाषण करताना दिसले. चाहते दोघांच्या अशा पद्धतीने संवाद साधण्याबद्दल विविध अंदाज लावत आहेत.
दैनिक जागरणच्या वृत्तानुसार, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याचे कोहली आणि रोहित शर्मा यांच्याशी असलेले संबंध तणावाचे झाले आहेत. अहवालात असा दावा केला आहे की दोन्ही अनुभवी खेळाडू आणि प्रशिक्षक यांच्यातील संबंध ताणले गेले आहेत. जागरणने 'बीसीसीआय'च्या एका सूत्राचा हवाला देत म्हटले आहे की, गौतम गंभीर आणि विराट-रोहित यांच्यातील संबंध तितकेसे चांगले नाहीत आणि दोन्ही खेळाडूंच्या भविष्याबाबत बैठक होऊ शकते. वनडे मालिका संपल्यानंतर ही बैठक होण्याची शक्यता आहे.