उमेश यादवची कामगिरी प्रभावी ठरली, पारस म्हांब्रे यांच्याकडून कौतुक

Umesh Yadav: ‘न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीतील दुसऱ्या डावात वेगवान गोलंदाज उमेश यादवने प्रभावित केले. त्याने एका स्पेलमध्ये किवी कर्णधार केन विलियम्सला अनेकदा अडचणीत आणले.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2021 08:13 AM2021-12-02T08:13:53+5:302021-12-02T08:14:40+5:30

whatsapp join usJoin us
Umesh Yadav's performance was impressive, appreciated by Paras Mhambre | उमेश यादवची कामगिरी प्रभावी ठरली, पारस म्हांब्रे यांच्याकडून कौतुक

उमेश यादवची कामगिरी प्रभावी ठरली, पारस म्हांब्रे यांच्याकडून कौतुक

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : ‘न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीतील दुसऱ्या डावात वेगवान गोलंदाज उमेश यादवने प्रभावित केले. त्याने एका स्पेलमध्ये किवी कर्णधार केन विलियम्सला अनेकदा अडचणीत आणले. त्याच्याविरुद्ध केलेली ही विशेष कामगिरी ठरली आणि उमेशने आपल्याकडून पूर्ण योगदान दिले,’ असे सांगत भारताचे गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांब्रे यांनी उमेश यादवचे कौतुक केले. त्याचवेळी, ‘जास्त क्रिकेट न खेळल्याने इशांत शर्माच्या कामगिरीवर परिणाम झाला असून त्याला आणखी काही सामने खेळावे लागतील,’ असेही म्हांब्रे यांनी म्हटले. 
शुक्रवारपासून भारत-न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना वानखेडे स्टेडियमवर खेळविण्यात येईल. बुधवारी म्हांब्रे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी, ‘कानपूरच्या सपाट खेळपट्टीवर उमेश यादवने प्रभावी कामगिरी केली. त्याच्या नियंत्रित गोलंदाजीने आनंद झाला,’ असे म्हांब्रे म्हणाले. सध्याच्या भारतीय संघात शंभर कसोटी सामने खेळणारा इशांत एकमेव खेळाडू आहे. मात्र, पहिल्या कसोटीत त्याला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. 
पहिल्या कसोटीत भारतीय गोलंदाजांना ५१ चेंडूंमध्ये न्यूझीलंडचा अखेरचा बळी मिळवण्यात अपयश आले होते. यामुळे सामना अनिर्णित सुटला. याबाबत म्हांब्रे म्हणाले की, ‘आम्ही विजयी होऊ शकलो नाही; पण गेल्या सामन्यात अनेक गोष्टी सकारात्मक ठरल्या. त्या खेळपट्टीवर १९ बळी घेणे सोपी गोष्ट नव्हती.’ 

इशांतने दीर्घ काळापासून स्पर्धात्मक कसोटी क्रिकेट खेळलेले नाही. तो आयपीएलमध्ये आणि टी-२० विश्वचषकात खेळला नाही. इतक्या मोठ्या ब्रेकचा परिणाम होतोच. आम्ही त्याच्या लयवर काम करत असून त्याची आम्हाला माहिती आहे. काही सामन्यांनंतर इशांत नक्कीच आपल्या फॉर्ममध्ये येईल, असा विश्वास आहे.’ इशांतकडे मोठा अनुभव आहे. ड्रेसिंग रूममध्ये त्याच्या उपस्थितीने फरक पडतो. युवा वेगवान गोलंदाज त्याच्याकडून बऱ्याच गोष्टी शिकू शकतात. यामुळे त्यांना फायदा होईल. 
- पारस म्हांब्रे, गोलंदाजी प्रशिक्षक    

साहाबाबत नंतर निर्णय घेणार
- पहिल्या कसोटीत यष्टिरक्षक रिद्धिमान साहा मान दुखावल्याने पाचव्या दिवशी यष्टिरक्षणासाठी मैदानावर आला नव्हता. त्याच्याविषयी विचारले असता म्हांब्रे म्हणाले की, ‘दुसऱ्या कसोटीला सुरू होण्याआधी साहाच्या खेळण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. 
- संघाचे फिजिओ मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार विराट कोहली यांच्याशी सातत्याने संपर्कात आहेत. सामन्याची वेळ जशी जवळ येईल, त्याप्रमाणे साहाविषयी निर्णय घेण्यात येईल.’ 
- साहाने दुसऱ्या डावात झुंजार अर्धशतकासह भारताला भक्कम स्थितीत आणले होते. त्याच्याविषयी म्हांब्रे म्हणाले की, ‘त्याची स्थिती पाहता ही एक शानदार खेळी होती. त्याला वेदना होत होत्या, पण तरीही त्याने खेळण्याचा निर्णय घेतला होता. त्याने शानदार प्रदर्शन केले. 

पावसामुळे भारत-न्यूझीलंड संघाचा सराव रद्द
भारत आणि न्यूझीलंड संघांना पावसामुळे बुधवारी वानखेडे स्टेडियमवर सराव करता आला नाही.  सकाळपासून पाऊस असल्यामुळे खेळपट्टीवर आवरण टाकण्यात आले आहे. दोन्ही संघ कानपूर येथून मंगळवारी सायंकाळी चार्टर्ड विमानाने येथे दाखल झाले होते. पहिला सामना अनिर्णित राहिला.

वानखेडेवर अचूक गोलंदाजी करण्याची गरज : एजाज पटेल
- व्हर्च्युअल पत्रकार परिषदेत पटेल म्हणाला, ‘माझ्यामते कानपूरमध्ये आम्ही अचूकपणे थेट यष्टिवर मारा केला नाही. भारतीय फलंदाज फिरकी खेळण्यात तज्ज्ञ असल्याने त्यांनी आम्हाला अधिक संधी  दिल्या नाहीत.’ 
- पटेलने सामन्यात तीन गडी बाद केले तर रचिन आणि विलियम समरविले यांना एकही गडी बाद करता आला नाही. दुसरीकडे अक्षर पटेल, रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन या त्रिकूटाने सामन्यात तब्बल १७ गडी बाद केले. 
- पटेल म्हणाला, ‘आम्हाला अचूकपणे मारा करावाच लागेल. पहिल्या सामन्यापासून धडा घेत माझे सहकारी येथे वेगळ्या पद्धतीने मारा करतील, याची मला खात्री आहे.  
- फलंदाजांनी मात्र क्षमतेनुसार शानदार कामगिरी केली. आमचा संघ सांघिक योगदान देत असल्याचे समाधान वाटते,’ माझा जेथे जन्म झाला त्या शहरात आणि मूळ देशाविरुद्ध खेळणे हा माझ्यासाठी भावनात्मक क्षण आहे. 
- अनेकदा या विमानतळावरून गेलो मात्र आता न्यूझीलंडचे प्रतिनिधित्व करण्यासाठी येथे आलो आहे. आज मी विमानतळावर दाखल झालो त्यावेळी माझ्या डोळ्यापुढे सर्व घटनाक्रम जिवंत झाला. या आठवणी आयुष्यभर स्मरणात राहतील.’ 

‘माझ्यासह सहकाऱ्यांनी कानपूरमध्ये अचूक गोलंदाजी केलेली नाही. त्यासाठी स्वत:ला दोष द्यावा लागेल. मात्र वानखेडेवर होणाऱ्या दुसऱ्या कसोटीत योग्य लाईन आणि लेंग्थसह गोलंदाजी करावीच लागेल.     
    - एजाज पटेल, फिरकी गोलंदाज, न्यूझीलंड  

Web Title: Umesh Yadav's performance was impressive, appreciated by Paras Mhambre

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.