भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार फलंदाज स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांचं २३ नोव्हेंबरला लग्न होणार होतं. पण अचानक लग्न अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आलं. स्मृतीचे वडील श्रीनिवास मानधना लग्नाच्या दिवशी अचानक आजारी पडले, ज्यामुळे हा मोठा निर्णय घेण्यात आला. याच दरम्यान सोशल मीडियावर अनेक अफवा पसरल्या. काही चॅट्सदेखील व्हायरल झाले, ज्यात पलाश मुच्छलने स्मृती मानधनाची फसवणूक केल्याचा दावा करण्यात आला. याच दरम्यान आता पुन्हा एकदा स्मृतीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर केलेल्या एका स्टोरीने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
स्मृतीने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये आता तिचं लग्न रद्द झाल्याची माहिती दिली आहे. "गेल्या काही आठवड्यांपासून माझ्या आयुष्याबाबत अनेक चर्चा सुरू आहेत आणि मला वाटतं की यावेळी मी याबद्दल बोलणं महत्त्वाचं आहे. मी एक अतिशय प्रायव्हेट पर्सन आहे आणि मी ते असंच ठेवू इच्छिते, परंतु मला हे स्पष्ट करायचं आहे की माझं लग्न रद्द करण्यात आलं आहे.”
![]()
“मला हे संपूर्ण प्रकरण इथेच संपवायचं आहे आणि तुम्हा सर्वांनाही तसंच करण्याची विनंती करते. मी तुम्हाला विनंती करते की, कृपया यावेळी दोन्ही कुटुंबांच्या प्रायव्हसीचा आदर करा आणि आम्हाला यातून बाहेर पडण्यासाठी थोडा वेळ द्या."
"आता पुढे जाण्याची वेळ आली आहे"
"मला सर्वोच्च पातळीवर माझ्या देशाचं प्रतिनिधीत्व करायचं आहे. मला आशा आहे की, मी शक्य तितका काळ भारतासाठी खेळत राहीन आणि ट्रॉफी जिंकत राहीन, माझं कायम लक्ष्य हेच असेल. तुम्ही सर्वांनी पाठिंबा दिल्याबद्दल धन्यवाद. आता पुढे जाण्याची वेळ आली आहे” असं स्मृती मानधनाने आपल्या स्टोरीमध्ये म्हटलं आहे. तिने काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवरून लग्नासंबंधित सर्व फोटो, व्हिडीओ डिलीट केले होते.