टीम इंडियाचा सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्माने पुन्हा एकदा आपली स्फोटक फलंदाजी दाखवत सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये धुमाकूळ घातला आहे. मंगळवारी पंजाब आणि बडोदा यांच्यातील सामन्यादरम्यान त्याने १८ चेंडूत आक्रमक अर्धशतक झळकावून संघाला मजबूत सुरुवात करून दिली.
पंजाबकडून डावाची सुरुवात करताना अभिषेक शर्माने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतला. सलामीचा साथीदार प्रभसिमरन सिंग (१६) धावांवर लवकर बाद झाला असला तरी, अभिषेकने एका टोकाकडून चौकार आणि षटकारांची आतषबाजी सुरू ठेवली. त्याने २६२.१६ स्ट्राइक रेटने अवघ्या १८ चेंडूत अर्धशतकी खेळी केली, ज्यात पाच चौकार आणि चार षटकारांचा समावेश आहे. अर्धशतक झळकावल्यानंतर तो लगेच १९व्या चेंडूवर बाद झाला.
दरम्यान, तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या अनमोलप्रीत सिंगनेही आपला फॉर्म कायम राखला. त्यानेही जलद गतीने आपले अर्धशतक पूर्ण केले आणि संघासाठी महत्त्वपूर्ण खेळी सुरू ठेवली. अभिषेक आणि अनमोलप्रीतच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे पंजाब संघाने बडोदाविरुद्ध मोठी धावसंख्या उभारण्यात यश मिळवले.
द.आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत संधी मिळण्याची शक्यता
यापूर्वी, अभिषेक शर्माने १४८ धावांची दमदार खेळी खेळली. हरियाणा आणि हिमाचल प्रदेशविरुद्ध एकेरी धावसंख्येवर बाद झाल्यानंतर त्याने पुन्हा मिळवलेली गती कायम ठेवली आहे. लवकरच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा होण्याची शक्यता आहे. या मालिकेत अभिषेक शर्माची संघात निवड होण्याची दाट शक्यता आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतही त्याचा हा फॉर्म कायम राहील, अशी आशा क्रिकेटप्रेमी व्यक्त करत आहेत.